बारव्हा, जि. नागपूर : सुधाकर रामटेके यांनी सूर्यफूल लागवडीमध्ये परागीकरणासाठी ठेवलेल्या मधमाश्‍यांच्या पेट्या.
बारव्हा, जि. नागपूर : सुधाकर रामटेके यांनी सूर्यफूल लागवडीमध्ये परागीकरणासाठी ठेवलेल्या मधमाश्‍यांच्या पेट्या. 
कृषी पूरक

शेतीला दिली मधमाशीपालनाची जोड

Vinod Ingole

परिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड दिल्यास आर्थिक नफ्यात चांगली वाढ होऊ शकते हे बारव्हा (ता. उमरेड, जि. नागपूर) येथील सुधाकर रामटेके यांनी दाखवून दिले आहे. गाव शिवारात सूर्यफुलाची वाढती लागवड लक्षात घेऊन त्यांनी मधमाशीपालनास सुरवात केली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेत मध विक्रीमध्ये बदल केले. राज्य, परराज्यांत ‘सिद्धार्थ शेतकरी  हनी गोल्ड’ या ब्रॅन्ड नेमने ते  मधाची विक्री करतात.

सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला मधमाशीपालनाची जोड दिली. आत्माअंतर्गत रामटेके यांनी ॲफिस मेलिफेरा मधमाशीपालनाचे प्रशिक्षणही घेतले. सध्या रामटेके ५०० पेट्यांच्या माध्यमातून मधसंकलनाचे काम करतात. पूर्वी त्यांना सूर्यफुलाचे एकरी नऊ क्‍विंटल उत्पादन मिळायचे, ते आता मधमाशीपालन आणि सुधारित पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून १३ क्‍विंटलवर पोचले आहे.

  सूर्यफूल लागवड क्षेत्रात झाली वाढ दहा ते पंधरा वर्षांपासून उमरेड तालुक्‍यातील बारव्हा परिसरात रब्बी हंगामात सूर्यफुलाची लागवड वाढली आहे. २००७-०८ मध्ये हे क्षेत्र ३०० हेक्‍टरवर होते ते आता सुमारे १६०० हेक्‍टरवर पोचले आहे. बामणी, पिपळा, खुडगाव, ठोबर, निरवा, पारवा, बेलचाकरा, अकोला या भागातील शेतकरीदेखील सूर्यफूल लागवडीकडे वळले आहेत. उमरेड परिसरात सूर्यफुलाचा पेरा वाढलेल्या या भागात आत्माच्या पुढाकाराने मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्यात आले. आत्माचे तत्कालीन प्रकल्प संचालक मिलिंद शेंडे, उपसंचालक प्रभाकर शिवणकर यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. 

हंगामानुसार पेट्यांचे स्थलांतर पेट्यांच्या स्थलांतराबाबत रामटेके म्हणाले, की विदर्भातील सूर्यफुलाचा हंगाम संपल्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत महाबळेश्‍वर (जि. सातारा), मुंडगाव (अकोला), इटावा (उत्तर प्रदेश) या ठिकाणी पेट्यांचे स्थलांतरण केले जाते. पेट्या हलविण्याकरिता दहा रुपये प्रतिकिलोमीटरप्रमाणे ट्रकचे भाडे द्यावे लागते. स्थलांतरित ठिकाणी ५०० पेट्यांच्या देखभालीसाठी तीन कामगार ठेवतो. यासाठी महिन्याला सरासरी १८ हजार रुपयांचा खर्च होतो. गडचिरोली जिल्ह्यात जांभूळ लागवड, पंजाब राज्यात निलगिरी लागवड आणि नागपूर जिल्ह्यात खैर लागवड असलेल्या परिसरात मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्या जातात.  सध्याच्या काळात रामटेके यांनी २५० मधमाश्‍यांच्या पेट्या नागपूर जिल्‍ह्यातील उमरगाव परिसरात ठेवल्या आहेत. सध्या या भागात बोरीची झाडे फुलधारणेवर आहे. मुंडगाव (जि. अकोला) भागात ओव्याचे पीक आहे. त्या भागात रामटेके यांनी २०० पेट्या ठेवल्या आहेत.

बाटलीमध्ये मधाचे पॅकिंग मध काढण्यासाठी रामटेके सयंत्राचा वापर करतात. या सयंत्रामध्ये आठ फ्रेम आहेत. मानवचलित हे यंत्र असून, त्या माध्यमातून दिवसाला १५० पेट्यांमधील मध संकलित करता येतो. मध विक्रीबाबत रामटेके म्हणाले, की पहिल्या टप्प्यात मधाची खुल्या बाजारात विक्री केली. त्यानंतर बाजारपेठेत ग्राहकांची मागणी लक्षात घेत बाटलीमध्ये मध पॅकिंग करण्यास सुरवात केली. बाटली, लेबल, सिलिंग यावर सरासरी १७ ते २० रुपयांचा खर्च होतो. सुरवातीला व्यवसाय नवा असताना वर्षभरात सुमारे ४० क्‍विंटल मधाची विक्री होत होती. आता मागणी वाढल्याने वर्षभरात १२ टन मधाची विक्री होते. यामध्ये प्रामुख्याने सूर्यफूल, मल्टीफ्लोरा (मिक्‍स फुले) पासून मिळणारा मध ३०० रुपये प्रतीकिलो दराने विकला जातो. याचबरोबरीने उपलब्धतेनुसार जांभूळ परिसरातील मध ५०० रुपये किलो, निलगिरी परिसरातील मध ५०० रुपये किलो, खैराच्या परिसरातील मध ५०० रुपये किलोप्रमाणे विकला जातो. मी प्रयोगशाळेतून मधाची तपासणी केली आहे. या अहवालातील नोंदीची माहिती प्रत्येक बाटलीवर दिली जाते. ‘सिद्धार्थ शेतकरी हनी गोल्ड` या ब्रॅन्ड नेमने मध विक्री केली जाते.

असे आहे मधमाशीपालन

  • सध्या ५०० पेट्यांतून मधमाशीपालन.
  • २०० पेट्यांसाठी ३५ टक्‍के शासकीय अनुदान.
  • एका पेटीतून सरासरी एकावेळी ३ किलो मधाची उपलब्धता.
  • खादी ग्रामोद्योगकडून १६० रुपये किलोने खरेदी.
  • राज्य, परराज्यांतील कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यात मधाची विक्री.
  • नागपूरमध्ये नातेवाइकांच्या दुकानातून ग्राहकांना थेट विक्री.
  • शेतकरी गटाची सुरवात  सुधाकर रामटेके हे सिद्धार्थ शेतकरी स्वयंसाह्यता समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या गटामध्ये साहेब सोमकुंवर, कैलास सोमकुंवर, शुद्धोधन रामटेके, संघरत्न रामटेके, रोहिणी रामटेके, जगदीश रामटेके, शकुंतला रामटेके, पारिसनाथ रामटेके, सुकेशनी रामटेके व कोमल रामटेके यांचा समावेश आहे. हा गट आत्माअंतर्गत नोंदणीकृत आहे. आत्माचे तत्कालीन प्रकल्प संचालक मिलिंद शेंडे यांच्या पुढाकाराने  सदस्यांना ८० मधमाशीसाठीच्या पेट्या अनुदानावर पुरविण्यात आल्या. प्रत्येक पेटीसाठी १५०० रुपये अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून या अनुदानाची तरतूद करण्यात आली. वसाहतीसह ५ हजार ५०० रुपयांना ही पेटी मिळते. गटातील शेतकऱ्यांकडे २०० मधमाश्यांच्या पेट्या आहेत. पंतप्रधान रोजगार योजनेतून सुधाकर रामटेके यांनी मधमाशीपालन व्यवसायाकरिता ११ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील ३५ टक्‍के अनुदान मिळाले. जळगाव भागात मधमाश्यांच्या पेट्यांची बांधणी व दुरुस्ती करणारे कुशल कारागीर आहेत. गरजेनुसार पेट्यांच्या दुरुस्तीसाठी या कारागिरांची मदत घेतली जाते. 

    - सुधाकर रामटेके, ७३८७२६७३२७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT