mawa disease in goat and sheep
mawa disease in goat and sheep 
कृषी पूरक

शेळ्या-मेंढ्यामधील मावा आजार

डॉ. प्रदिप घळसासी

मावा हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. एका शेळी,मेंढीपासून दुसऱ्यांना संसर्ग होतो. यामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी त्या अशक्त होतात. औषधोपचार जास्त खर्च होतो. त्यांची उत्पादनक्षमता कमी होते.  शेळी व मेंढीमधील मावा हा त्वचा आजार आहे. सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना होऊ शकतो. लहान वयाच्या शेळ्या मेंढ्यांमध्ये आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी बाधित शेळ्या-मेंढ्या अशक्त होतात. अशक्तपणा, पौष्टिक आहाराचा अभाव तसेच लहान करडांना दूध पिता न आल्यामुळे ताण येतो. त्यामुळे अशक्त शेळ्या,मेंढ्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे जिवाणू व बुरशीजन्य आजारांना बळी पडून मरतात. आजाराची तीव्रता मेंढ्यांपेक्षा शेळ्यांमध्ये अधिक असते. हा रोग कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतो. नारी संस्थेने सन २००९ ते २०२० या कालावधीत या आजाराचा अभ्यास केला. त्यावेळी आजाराचा जास्त प्रादुर्भाव शेळ्या आणि करडांना झाल्याचे आढळून आले. त्यापैकी उन्हाळ्यात १८ टक्के, पावसाळ्यात ५२ टक्के, हिवाळ्यात ३० टक्के शेळ्या आणि करडे मावा आजाराला बळी पडली होती. मावा आजाराचा जास्त प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो.      आजाराची कारणे आणि लक्षणे 

  • हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. एका शेळी,मेंढीपासून दुसऱ्यांना याचा संसर्ग होतो. 
  • ओठ,नाकपुडीच्या बाजूला आणि तोंडामध्ये सुरवातीला पुरळ येतात. नंतर जखमा होऊन खपल्या दिसतात. 
  • कोणत्याही प्रकारचा ताण, इतर आजार, पुरसे खाद्य न मिळणे, निकृष्ट दर्जाचा चारा, तोंडाला चरताना लागलेले काटे व इतर कारणांमुळे झालेल्या जखमांमधून विषाणूचा संसर्ग होतो. 
  • आजारी शेळ्या, मेंढ्यांना ओठ व हिरड्यांना झालेल्या जखमांमुळे खाद्य खाता येत नाही. त्यामुळे त्या कमजोर व अशक्त होतात. या आजारामध्ये मरतूकीचे प्रमाण  असणारा ताण आणि त्यांची प्रतिकारशक्ती यांवर अवलंबून असते. 
  • बाधित शेळी,मेंढी बरी होण्यासाठी १ ते २ महिन्यांचा कालावधी लागतो. हा विषाणू थंड व कोरड्या हवामानात जास्त काळ तग धरू शकतो. मात्र, अति जास्त व अति कमी तापमानात मरतो.
  • मावा आजार झालेल्या पिल्लांमध्ये सुरवातीला हिरड्यांवर पुरळ येतात. नंतर पुरळ फुटून हिरड्या लालसर होतात. त्याठिकाणी  प्लॉवरसारख्या गाठीसुद्धा येऊ शकतात. तोंडातील व तोंडावरील लक्षणांमुळे पिल्लांना शेळीच्या कासेतील दूध पिणे अवघड जाते. 
  • रोगग्रस्त करडांमार्फत दूध पिताना शेळीच्या सडाला देखील संसर्ग होऊ शकतो. त्या जागी पुटकुळ्या येऊ शकतात. सडाला बाहेरून रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेळ्या करडांना दूध पिऊ देत नाहीत. काही वेळी शेळ्या व मेंढ्यांना कासदाह सुद्धा होतो. 
  • हा आजार प्राण्यांमधून मानवाला होणाऱ्या रोगसमूहात येतो. हा आजार प्राणी प्रसारित आहे. सडाला प्रादुर्भाव झालेल्या शेळ्यांचे दूध काढल्यास याच प्रकारचा संसर्ग दूध काढणाऱ्याच्या हाताला व बोटांना देखील होऊ शकतो. दूध काढणाऱ्या व्यक्तीच्या तळहातावर व बोटांवर अशाप्रकारचे पुरळ येतात. 
  •     नुकसान 

  • आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी शेळ्या,मेंढ्या अशक्त होतात. औषधोपचावर जास्त खर्च होतो.
  • उत्पादनक्षमता कमी होते. काही वेळा कासदाह होऊन दूध कमी होते. त्यामुळे पिल्लांची जोपासना व्यवस्थित होत नाही. 
  • पिल्लांचा वाढीचा दर कमी होऊन बाजारात योग्य किंमत मिळत नाही.
  • काही शेळ्या,मेंढ्यांमध्ये कायमस्वरूपी वंधत्व येते.
  • प्रसार 

  • बाधित जनावरांचा प्रत्यक्ष संपर्क किंवा त्यांच्यामुळे दूषित झालेल्या चाऱ्याच्या गव्हाणी, पाण्याचे टब इत्यादींमार्फत होतो. 
  • शेळ्या व मेंढ्यांच्या वाडग्यातील दाटीवाटी व अस्वच्छता हे मावा प्रसाराचे मुख्य कारण आहे. बाधित व निरोगी शेळ्या,मेंढ्या एकत्र ठेवल्यास  प्रसार वाढतो. 
  • लहान करडे व कोकरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लहान पिल्ले मावा संसर्गास लवकर बळी पडतात.
  • आठवडी बाजारांतील एखाद्या मावा बाधित शेळ्या,मेंढ्यांच्या संपर्क आल्यास, एका जागेवरून दुसऱ्या निरोगी कळपात प्रसार होऊ शकतो.
  • एखाद्या शेळ्या,मेंढ्यांना आजाराचा प्रादुर्भाव होऊन गेल्यानंतर किमान २ ते ३ वर्षे पुन्हा प्रादुर्भाव होत नाही.
  • जमिनीवर पडलेल्या आजाराच्या खपल्यांपासून निरोगी शेळ्या,मेंढ्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो. अशा खपल्या सूर्यप्रकाशात राहिल्यास जास्त काळ संसर्गजन्य राहतात.  
  •  उपचार  

  • विषाणूजन्य आजार असल्यामुळे यावर कोणत्याही प्रतिजैविकाचा वापर होत नाही. यावर सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नाही.
  • जखमा सकाळी आणि संध्याकाळी पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या पाण्याने धुवून साफ कराव्यात.
  • तोंड व ओठांवरील जखमांवर हळद व लोणी किंवा दुधाची साय यासारखे मऊ पदार्थ लावावेत. जखमा लवकर बऱ्या होतात.
  • बोरो ग्लिसरीन सारखे  औषध लावावे.
  • खाद्यामध्ये मऊ, लुसलुशीत चारा, कोथिंबीर, मेथी घास द्यावे.
  • अशक्तपणा दूर करण्यासाठी लापशी, गूळ पाणी यांसारखे पौष्टिक पदार्थ द्यावेत.
  • - डॉ. प्रदिप घळसासी, ७५८८६८५८६७,

    (सहयोगी संचालक, निंबकर कृषी संशोधन संस्था, फलटण,जि.सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

    Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

    Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

    Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

    Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

    SCROLL FOR NEXT