निपाह विषाणूला प्रतिबंध
निपाह विषाणूला प्रतिबंध 
कृषी पूरक

प्रतिबंधात्मक उपायातून रोखता येतो निपाह विषाणू संसर्ग

डॉ. वैभव सानप, डॉ. प्रवीर दामले

निपाह विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने वराहामध्ये होताे, परंतु वराह व मानव यांच्याव्यतिरिक्त कुत्रे, मांजरी, शेळ्या, मेंढ्या व घोडे यांसह अनेक प्राण्यांच्या प्रजातींमध्ये निपाह संक्रमणाचे पुरावे उपलब्ध आहेत. निपाह विषाणूच्या संसर्गाची लक्षणे जनावरामध्ये आढळून आल्यास ताबडतोब नोंदणीकृत पशुवैद्यक अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. निपाह विषाणू (NiV) हा प्राण्याकडून मानवामध्ये संक्रमित होणारा नवीन उदयोन्मुख विषाणू आहे. फळे खाणारी वटवाघुळे ही या विषाणूसाठी नैसर्गिक स्राेत किंवा यजमान आहेत. सर्वप्रथम सिंगापूर व मलेशिया या देशांमध्ये १९९९ साली वराह व त्यांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या रोगाची लक्षणे दिसून आली होती. मलेशियातील निपाह या गावातील आजारी व्यक्तीमध्ये हा विषाणू सर्वप्रथम आढळला होता, तेव्हापासून या विषाणूस या नावाने ओळखतात. सद्यःस्थितीत मानव किंवा प्राणी यांच्यापैकी कुणासाठीही या रोगाविरुद्ध औषधोपचार किंवा लसीकरण उपलब्ध नाही. परंतु प्रतिबंधात्मक उपाय करून या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो.

निपाह विषाणूचा प्रसार कसा होतो? फळझाळावर आढळणारी वटवाघळे या विषाणूचा नैसर्गिक स्राेत असतात. वटवाघळांचे मूत्र, विष्ठा, थुंकी इत्यादी शरीरस्त्रावांमध्ये या विषाणूंची वाढ होते व याचा संपर्क जनावरांशी विशेषतः डुकरांशी आल्यास त्यांना या रागोचा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव झालेल्या जानावरांमधून निपाह विषाणू मानवामध्ये व इतर प्रभावशील जनावरामध्ये प्रसारित होतो. या विषाणूचा प्रसार हा प्रादुर्भावित जनावरामधून निरोगी जनावर व मानवामध्ये आणि मानवामधून निरोगी मानवामध्ये होतो.

जनावरांमधील रोगाची लक्षणे

  • गंभीर स्वरूपाचा खोकला दिसून येतो.
  • जास्त ताप येणे, थरथरणे.
  • श्वास घेण्यास त्रास होणे.
  • मेंदूज्वर व माज्जासंस्थे संबंधीची इतर लक्षणे.
  • स्नायूमध्ये तणाव तसेच कमजोरपणा.
  • आकस्मिक मृत्यू होणे.
  • मानवामधील रोगाची लक्षणे

  • प्रादुर्भाव झाल्यानंतर साधारण २ ते १४ दिवसांदरम्यान रोगाची लक्षणे दिसू लागतात.
  • प्रारंभी ताप, खोकला, डोकेदुखी, थकवा येणे, जीभ बेचव होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.
  • त्यानंतर डोकेदुखी, जास्त ताप, तंद्री, मानसिक गोंधळ, कोमा इत्यादीसारखी लक्षणे तसेच परिणामी मृत्यूसुद्धा होऊ शकतो.
  • रोगनिदान

  • केवळ लक्षणांवरून रोगनिदान करणे कठीण असते.
  • निपाह विषाणूच्या चाचणीसाठी अनेक चाचण्या अस्तित्वात आहेत.
  • रोगनिश्‍चिती करण्याकरिता आजारी जनावराचे रक्त, लघवी किंवा इतर शरीर स्त्रावाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत त्यातून विषाणू वेगळे करून निदान केले जाते.
  • प्रतिबंधात्मक उपाय

  • जनावरांचा संपर्क वटवाघळाशी किंवा त्यांनी खाल्लेल्या फळांसोबत येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • वराह किंवा इतर जनावरांच्या फार्मवर संसर्ग टाळण्यासाठी चांगल्या प्रतीची जैविक सुरक्षा (Biosecurity) असणे महत्त्वाचे आहे.
  • गोठ्याच्या किंवा जनावरांच्या आहार साठवणुकीच्या ठिकाणी फळझाडांची लागवड करणे टाळावे.प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची लवकर ओळख करून इतर प्राणी आणि मानव यांना प्रादुर्भाव होण्यापासून संरक्षित करण्यास मदत करू शकतात, त्यासाठी पशुवैद्यकाची मदत घ्यावी.
  • प्रभावित भागात प्रादुर्भाव झालेल्या जनावरांशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रोगाचे नियंत्रण कुठलाही उपचार उपलब्ध नसल्याने प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना त्वरित वेगळे करून त्यांना मारले जाते. मेलेल्या जनावराचे शव खोल खड्ड्यामध्ये पुरावे. प्रादुर्भाव झालेल्या जनारांच्या संपर्कात आलेला चारा, शेण व इतर गोष्टींची योग्य विल्हेवाट लावली जाते. पुरलेल्या जागेवर क्लोराइडयुक्त चुना टाकावा.   जनवरांसाठी वापली जाणारी भांडी जंतुनाशकाने व गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत.

    संपर्क : डॉ. वैभव सानप, ९४५५१४८१७२ (सानप भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर, उत्तर प्रदेश येथे कार्यरत अाहेत, तर दामले चंद्रपूर येथे पशुधन विकास अधिकारी अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

    Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

    Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

    Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

    Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

    SCROLL FOR NEXT