The udder should be inspected from time to time during milking to prevent Mastitis.
The udder should be inspected from time to time during milking to prevent Mastitis.  
कृषी पूरक

गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजना

डॉ. राऊत आकाश, डॉ. काकासाहेब खोसे

कासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन प्रकार पडतात. सुप्त कासदाहात गायी-म्हशींची कास अतिशय घट्ट होते. गोठ्यामध्ये हा आजार येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.   कासदाह म्हणजे ‘कासेला येणारी सूज’ होय. हा दुधाळ गायी-म्हशींमध्ये होणारा जिवाणूजन्य आजार आहे. यामध्ये जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास दूध उत्पादनात घट व दुधाचा दर्जा खालावतो. हा आजार म्हशींपेक्षा गायींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.  कारणे 

  • जनावरे, गोठ्याची अस्वछता ही कासदाह होण्यामागची कारणे आहेत. त्याचबरोबर जनावराची प्रकृती, संगोपन पद्धत व आहार या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 
  • अस्वच्छता, असंतुलित आहार आणि जनावरांना येणारा ताण यामुळे कासदाह होण्याची शक्यता वाढते. 
  • दूध काढून झाल्यानंतर सडाची छिद्रे बंद होण्यासाठी अर्ध्या तासाचा कालावधी लागतो. या काळात जनावरांचा गोठ्यातील अस्वच्छतेशी संपर्क आल्यास किंवा जनावरे अस्वच्छ जागेवर खाली बसल्यास बाहेरील जंतू सडाच्या छिद्रातून कासेत प्रवेश करतात. जंतूंचा सडामध्ये प्रवेश झाल्यानंतर तिथे स्थिरावून वाढतात. त्यामुळे लक्षणे दिसणे सुरू होते.
  • दूध काढतेवेळी कासेतील पूर्ण दूध काढले न जाणे. सडाला झालेल्या जखमांमुळे देखील कासदाह होतो.
  • लक्षणे 

  • जनावरांना ताप येतो. कासेला सूज येते. सुजेमुळे कासेला हात लावल्यास जनावरांना प्रचंड वेदना होतात. 
  • दूध उत्पादन कमी होते. दुधाचा रंग व चव बदलते. 
  • दुधामध्ये गाठी तयार होतात. बाधित सडांतून गुठळ्या किंवा पू येतो. 
  • जनावरांची हालचाल तसेच भूक मंदावते.
  • उपचार 

  • बाधित जनावरांना पशुवैद्यकाकडून योग्य वेळी योग्य उपचार करावेत. उपचार किमान ३ ते ५ दिवस करावेत.
  • योग्य प्रतिजैविकांचा वापर करावा. प्रतिजैविके वापराच्या नोंदी ठेवाव्यात.
  • प्रतिजैविकांचा शरीरामधून निघून जाण्याच्या कालावधीपर्यंत दुधाचा वैयक्तिक तसेच व्यावसायिक वापर करू नये.
  • उपचाराला जनावर प्रतिसाद देत नसल्यास, बाधित जनावराच्या दुधाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. तपासणीअंती उपचारासाठी योग्य ते प्रतिजैविक निवडून योग्य ते उपचार करावेत.
  • प्रतिजैविकांसोबत वेदनाशामक औषधे वापरावीत.
  • प्रतिबंधात्मक उपाय

  • दूध काढण्याची भांडी, यंत्रे नेहमी स्वच्छ व कोरडी करून ठेवावीत. 
  • दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर जनावरांची कास व दूध काढणाऱ्याचे हात जंतुनाशक द्रावणाने स्वच्छ धुवावे. कास स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यावी.
  • दूध काढल्यानंतर सडांमध्ये दूध नसल्याची खात्री करून घ्यावी. 
  • दूध काढल्यानंतर सडांची छिद्रे अर्धा तास उघडी असतात. या वेळेत जनावरांना खाद्य द्यावे, जेणेकरून जनावरे खाली बसणार नाहीत.
  • निरोगी जनावरांचे व निरोगी सडांतून दूध सर्वप्रथम काढून घ्यावे. बाधित जनावरे व बाधित सडांतील दूध शेवटी व पूर्ण काढून नष्ट करावे.
  •  दूध काढण्यापूर्वी आणि काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. नखे नियमित कापावीत. त्यामुळे सडाला इजा होण्याची शक्यता कमी होते. 
  • धार काढताना खोकणे किंवा थुंकणे टाळावे. 
  • दुभत्या जनावरांना दिवसातून एक वेळेस स्वच्छ धुवावे. गोठा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा. 
  • व्यायल्यानंतर गाई, म्हशीस स्वच्छ पाण्याने धुऊन वेगळे ठेवावे. गोठ्यात खाली मऊ गवत किंवा रबर मॅट टाकाव्यात.
  • गाभण जनावरांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आटविणे गरजेचे आहे. सामान्यपणे आठव्या महिन्यापासून दररोज दोन वेळा धार काढण्याऐवजी एकच वेळ धार काढावी. काही दिवसांनंतर २  दिवसांतून एकदा धार काढावी आणि त्यानंतर काही दिवसांनी धार काढणे बंद करावे. 
  • जनावर आटल्यानंतर सडाच्या छिद्रांमध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकाचा वापर करावा. त्यामुळे जिवाणू आतमध्ये प्रवेश करत नाहीत. जनावरांची वारंवार कासदाह व इतर आजारांसाठी चाचणी करावी.
  • - डॉ. आकाश राऊत,  ९८२२९६२२५० (पीएच. डी. स्कॉलर, पंडित दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्‍वविद्यालय एवं गो-संशोधन संस्था (दुवासु), मथुरा. डॉ. खोसे हे परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

    Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

    Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

    Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

    Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

    SCROLL FOR NEXT