चंदगड, जि. कोल्हापूर : जिल्ह्याच्या काही भागांत जनावरांमध्ये ‘लम्पी’ची लागण (Lumpy Infection) होत असताना चंदगड तालुक्यातील पशुवैद्यकांची धास्ती वाढली आहे. अपुरे मनुष्यबळ (Manpower Shortage) हे त्याचे कारण आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन (Livestock) असलेल्या तालुक्यात पशुवैद्यकांची वानवा आहे. तालुक्यासाठी नऊ पशुधन अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत; मात्र दुर्गमता या एकाच कारणास्तव दहा वर्षांपासून यापैकी सात पदे रिक्त आहेत.
यासंदर्भात प्रशासन कधीतरी कठोर भूमिका घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोकण आणि कर्नाटक सीमेवरील या तालुक्यात पशुधन चांगले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून उत्तम जातीची जनावरे पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. बारमाही ओल्या चाऱ्यामुळे दुधाचे उत्पन्न चांगले आहे. केवळ दूध व्यवसायावर अवलंबून असलेली अनेक कुटुंबे आहेत. परंतु जनावरांमध्ये एखादा असाध्य रोग आला तर त्याला रोखण्यासाठी पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ नाही, हे वास्तव आहे.
तालुक्यात चंदगड, तुर्केवाडी, अडकूर, कोवाड, माणगाव, हलकर्णी, तुडये येथे श्रेणी एकचे, तर कानूर बुद्रुक, पाटणे, दाटे, ढोलगरवाडी व कुदनूर येथे श्रेणी दोनचे दवाखाने आहेत. त्याशिवाय चंदगड येथे एक फिरता दवाखाना आहे. परंतु तेथे काम करण्यासाठी सक्षम पशुवैद्यकीय अधिकारी नाही, अशी स्थिती आहे. अनेक वर्षांपासून हा विषय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या बैठकीत गाजतो. परंतु तो सभागृहातच विरून जातो. सुरुवातीला या प्रश्नावर नवीन भरती नाही, हे कारण सांगितले जात होते.
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये झालेल्या भरतीत जिल्ह्याला वीस अधिकारी मिळाले. चंदगडचे पशुधन विचारात घेता किमान चार अधिकारी मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेने केवळ एकच अधिकारी दिला. नऊपैकी सात पदे रिक्त ठेवून प्रशासनाने हा प्रश्न पुन्हा लटकत ठेवला आहे. कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, लसीकरण, खच्चीकरण, वांझ तपासणी, शस्त्रक्रिया या विशिष्ट शैक्षणिक पदवीप्राप्त डॉक्टरांनीच केल्या पाहिजेत, अशी नियमावली आहे. परंतु त्या अर्हतेचे डॉक्टरच नसल्याने कामाचा उरक होत नाही. अशातच ‘लम्पी’सारखी साथ फैलावल्यास त्याला कसे तोंड द्यायचे, हा इथल्या पशुवैद्यकांपुढे मोठा प्रश्न आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.