Janardan Shende and their Cows Agrowon
काळजी पशुधनाची

Cow Rearing: गोपालनात खाद्य, आरोग्याचे काटेकोर नियोजन

Dairy Farming Success: अहिल्यानगर जिल्ह्यातील आडगाव येथील जनार्धन शेंडे यांनी पारंपरिक गोपालनाला वैज्ञानिक पद्धतीने आधुनिक व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. दर्जेदार खाद्य, मुक्त गोठा, चारा व्यवस्थापन आणि आरोग्य नियंत्रण यांमुळे त्यांच्या गोपालन व्यवसायाला प्रगतीचा मार्ग मिळाला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Animal Health:

शेतकरी नियोजन । गोपालन

शेतकरी : जनार्धन मन्याबापू शेंडे

गाव : आडगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर

एकूण शेती : १० एकर

एकूण गाई : २२ गाई व पाच कालवडी.

अहिल्यानगर जिल्ह्यातील आडगाव (ता. पाथर्डी) येथील जनार्धन मन्याबापू शेंडे यांनी वडिलोपार्जित शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. कुटुंबातील पारंपरिक पशुपालनाला व्यावसायिक स्वरूप दिले आहे. जनार्धन यांची १० एकर शेती आहे. २०१७ मध्ये त्यांनी एक एचएफ गाय खरेदी करत दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. गोठ्यात पैदाशीवर भर देत हळूहळू गाईंच्या संख्येत वाढ केली. सध्या शेंडे कुटुंबाकडे २२ गाई आणि ६ कालवडी आहेत. दररोज दोनशे लिटरपर्यंत दूध संकलन होते.

मागील तीन वर्षांपूर्वी गाईंसाठी ५ गुंठे क्षेत्रावर मुक्तसंचार गोठा उभारला आहे. गाईंना दर्जेदार चाऱ्याची उपलब्धता व्हावी यासाठी शेतामध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. दुग्ध व्यवसाय आणि शेती कामांमध्ये पत्नी नंदा, बंधू बाळासाहेब, त्यांच्या पत्नी प्रयागा यांचीही मदत मिळते. त्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसह शेती समृद्धी झाली आहे. पशुपालन व्यवसायाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सुयोग बेहळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते, असे जनार्धन शेंडे सांगतात.

व्यवस्थापनातील बाबी

गोठ्यात दैनंदिन कामांना दररोज सकाळी पाच वाजता सुरुवात होते. प्रथम मिल्किंग मशिनच्या मदतीने गाईंचे दूध काढले जाते. दूध काढणी पूर्ण झाल्यानंतर गाईंना चारा व खुराक दिला जातो.

सकाळी दूध काढणी, गोठा स्वच्छता, चारा पाणी आदी सर्व कामे साधारण दीड तासामध्ये उरकली जातात.

संध्याकाळी पुन्हा चार वाजता दूध काढणी, चारा व अन्य कामांना सुरुवात होते. सकाळप्रमाणेच सायंकाळी चारा, खुराक दिला जातो.

मुक्तसंचार गोठ्यात दावणी तयार केल्या आहेत. त्यात चारा दिला जातो. शिवाय पाणी पिण्यासाठी हौद केला आहे.

जनावरांना दर्जेदार पोषक घटकांनी युक्त खाद्य उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. एका गाईला साधारण सतरा ते वीस किलोपर्यंत सकाळी चारा दिला जातो. त्यात गिन्नी गवत, ऊस, मुरघास आणि गव्हाचा भुस्सा याचे प्रमाण साधारण असते. गाईंना सकाळी द्यावयाची चारा कुट्टी ही रात्रीच करून ठेवली जाते.

दुभत्या गाईंना दूध देण्याच्या क्षमतेनुसार दररोज सकाळी व संध्याकाळी पशुखाद्य दिले जाते. त्यात प्रामुख्याने वालीस, सरकी पेंड आदींचा समावेश असतो.

चारा पिकांची लागवड

पाच एकर क्षेत्र चारा पिकांच्या लागवडीसाठी राखीव ठेवले जाते. त्यात लसूण घास, ऊस, मका, गिन्नी गवत व इतर पिकांची लागवड केली जाते. दर्जेदार चारा जनावरांना उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. दर सहा महिन्यांनी घरच्या शेतीतील मका लागवडीपासून २० ते २२ टन मुरघास तयार केला जातो. मुरघासामुळे टंचाईच्या काळात दर्जेदार खाद्य जनावरांना उपलब्ध करणे शक्य होते. शेतीमध्ये चारा पिकांची लागवड केल्यामुळे चाऱ्यावरील खर्च नियंत्रित करण्यात यश आले आहे.

शेणखतामुळे आर्थिक बचत

पशुपालनातून वर्षभरात सुमारे ४५ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. दर सहा महिन्यांनी मुक्त गोठ्यातून शेणखताची उचल केली जाते. शेणखताची विक्री केली जात नाही. मागील सात वर्षांपासून गोठ्यातील सर्व शेणखताचा वापर शेतीमध्ये केला जात असल्याने रासायनिक खतांवरील खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे दर्जेदार पीक उत्पादन तसेच चारा उपलब्ध होत आहे. मातीचा सेंद्रिय कर्ब वाढीस चालना मिळाली आहे.

आरोग्य व्यवस्थापन

गोठ्यातील गाभण गाईंची विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या आरोग्य आणि खाद्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. पशुवैद्यकीय तज्ज्ञांद्वारे वेळोवेळी तपासणी केली जाते. आरोग्यविषयक सर्व नोंदी ठेवल्या जातात.

नवजात वासरांची विशेष काळजी घेतली जाते. नवजात वासरांना सुरुवातीचे तीन महिने नियमितपणे दूध पाजले जाते. साधारण तीन महिन्यानंतर दूध पिण्याची सवय कमी करून हळूहळू चारा खाण्याची सवय लावली जाते. यामुळे वासरे, कालवडीच्या वाढीला मोठी मदत मिळते.

लाळ्या खुरकूत, लम्पी त्वचा या आजारांचे पशुवैद्यकाकडून लसीकरण केले जाते. प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

जनावरांची रोगप्रतिकारकशक्ती उत्तम राहण्यासाठी आहार व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. गोठ्यात स्वच्छता राखण्यास विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गोचिड, माश्या यांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.

- जनार्धन शेंडे, ९३०७३६२९०२

(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology: कंपोस्ट खते देण्यासाठी साइड ट्रेंचर, कंपोस्ट ॲप्लिकेटर

Jansuraksha Kayda: जनसुरक्षा कायदा नक्की कुणासाठी?

Maharashtra Logistic Park: ड्राय पोर्ट : नकोत कोरड्या घोषणा

Climate Change: हवामान बदलाचा विषय राजकीय अजेंड्यावर यावा 

Kharif Crop Damage: उसासह खरीप पिके ‘हुमणी’च्या विळख्यात

SCROLL FOR NEXT