Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. सी. व्ही. धांडोरे

पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जनावरांमध्ये संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. हे टाळण्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन करावे.

१) गळणाऱ्या गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या प्रजनन व कार्यक्षमतेवर परिणाम होतो. गोठ्यात जर पावसाची झडप येत असेल किंवा छतामधून गोठ्यामध्ये पाणी येत असेल तर जनावर बैचेन होते. पाणी, शेण आणि जनावराचे मलमूत्र यामुळे अमोनियाचे प्रमाण वाढते. विषारी वायूची निर्मिती होऊन जनावरांच्या डोळ्यावर सूज येते, शरीराची आग होऊन खाज सुटते. यामुळे जनावर स्वस्थ राहत नाही. शेळ्या ओलसर जागी बसत नाहीत शेळ्यामध्ये तणाव दिसून येतो. ओलसर वातावरणात विशेषतः कोंबड्यामध्ये कॉक्सीडायोसिस रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. हे लक्षात घेऊन गोठा नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.

२) पावसाळ्यामध्ये गवताची उगवण क्षमता तसेच वाढ अधिक प्रमाणात असते. या चाऱ्याकडे जनावरे आकर्षित होतात. जनावरांना पोटभर आणि भरपूर खाद्य मिळते. परंतु हे जनावरांसाठी अपायकारकसुद्धा आहे. पावसाळ्यात उगवणारे गवत मऊ असल्याने जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात व कोरडा चारा कमी खातात. पावसाळ्यात उगवणाऱ्या गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते व तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडते, जनावरांना हगवण लागते.

३) जनावरांचे खाद्य जर भिजले तर खाद्यामध्ये बुरशी निर्माण होते, त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.

४) अस्वच्छ गोठ्यात कासेचे आजार बळावतात. दुधाचे उत्पादन कमी होते.

५) पावसाळी वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने विविध प्रकारच्या जिवाणू तसेच विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते. यामुळे जनावरे जिवाणूजन्य व विषाणूजन्य आजारास बळी पडतात. कृमींना सुद्धा पावसाळ्यातील वातावरण पोषक ठरते. परिणामी, जनावरे वेगवेगळ्या कृमींना बळी पडतात. माशांचे प्रमाण वाढते, माशा जनावरांना चावतात जनावर बैचेन होते. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो.

६) खुरांमध्ये चिखल राहिल्यामुळे खुरामध्ये जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊन खुरांचे आजार दिसून येतात. काही वेळेस जनावर लंगडते.

उपाययोजनाः

१) गोठ्याची स्वच्छता करून आतील भिंती आणि गोठ्याचा परिसर चुन्याने रंगवून घ्यावा.

२) गोठा कोरडा ठेवावा. गोठ्याचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. जेणेकरून भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश आत येऊ शकेल.

३) गोठ्याच्या स्वच्छतेसाठी दिवसातून एकदा जंतुनाशक फवारावे.

४) गोठ्यामध्ये माशा आणि डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सीताफळ किंवा पेरूच्या पानाची धुरी करावी.

५) गोठ्याच्या आजूबाजूला गवत किंवा झाडेझुडपे वाढू देऊ नयेत. त्यांचा नायनाट करावा. त्यामुळे माशांचे प्रमाण कमी होईल.

६) पशुतज्ज्ञांच्या मदतीने लसीकरण करून घ्यावे. याकाळात कासदाह, हगवण, अपचन, पोटफुगी इत्यादी आजार होतात. अशा जनावरांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषधोपचार करून घ्यावेत.

७) कृमीपासून वाचविण्यासाठी प्रत्येक पशुपालकांनी पावसाळा सुरू होण्याअगोदर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना कृमिनाशकाची मात्रा द्यावी. पावसाळा संपल्यानंतर सुद्धा वर्षभर ठरावीक अंदाजपत्रकानुसार कृमिनाशक औषधे देत राहावे.

८) पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करून पाणी भरावे आणि त्यामध्ये तुरटी फिरवावी.

९) जनावरांना फक्त ओली वैरण देत असाल तर दिवसातून एकदा २० ग्रॅम खाण्याचा सोडा खाऊ घालावा.

शरीरातील तापमान आणि पाण्याचा समतोल टिकून राहण्यासाठी दररोज ५०-६० ग्रॅम मीठ खाऊ घालावे. जनावरांना त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी दररोज १०० ग्रॅम गूळ खाऊ घालावा. जनावरे जास्त अशक्त आणि कुपोषित असल्यास बायपास फॅट पावडर प्रतिदिन ५० ते ६० ग्रॅम खाऊ घालावी.

१०) बुरशी आलेला चारा, मुरघास, पशुखाद्य जनावरांना खाऊ घालू नये. खाद्य पावसाने ओले होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात हिरव्या गवतासोबत वाळलेला चारा देणे आवश्यक असते.

संपर्कः डॉ. सी. व्ही. धांडोरे ९३७३५४८४९४

(पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT