Poultry Management Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Management : पावसाळ्यातील पोल्ट्री व्यवस्थापन

Poultry Farming : पावसाळी हंगामात कोंबड्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी, योग्य ते व्यवस्थापन कशाप्रकारे करता येते, ते या लेखातून पाहुयात.

Team Agrowon

डॉ. विजयसिंह लोणकर, डॉ. अविनाश कदम

Poultry Business : पावसाळी हंगामात कोंबड्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी, योग्य ते व्यवस्थापनीय बदल न केल्यास त्याचा परिणाम कोंबड्यांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो.

पावसाळ्यामधील परिणाम

पिण्याचे पाणी गढूळ व शेवाळयुक्त होते. त्यात निरनिराळ्या रोगकारक जंतूंची वाढ होते.

कॉक्सिडिऑसिस रोगाच्या एकपेशीय जंतूंचे प्रमाण वाढते. कोंबड्यांना रक्ती हगवण येते.

शेडमध्ये तसेच जवळपास माशांचा प्रादुर्भाव होतो.

शेडमधील वाढलेल्या अमोनियामुळे डोळ्यांना त्रास होतो, श्‍वसन संस्थेचे आजार होतात.

ओल्या व दमट लिटरमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.

पावसाचे पाणी शेडमध्ये आल्याने लिटर ओले होते. आर्द्रतेचे प्रमाण वाढते.

व्यवस्थापनाचे तंत्र

पोल्ट्री शेड

मॉन्सूनची दिशा व वाऱ्या वेग याचा विचार करूनच शेड पूर्व-पश्‍चिम बांधलेले असावे. शेडवरील पत्रा मजबूत बांधून घ्यावा. जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस आला तरी हलू नयेत किंवा उडू नयेत.

भिंतीच्या भेगा बुजवून पावसाचे पाणी शेडमध्ये गळणार नाही याची काळजी घ्यावी.

पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकावे. परिसराची स्वच्छता ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून ते वाहून जाण्यासाठी खड्डे बुजवून घ्यावेत. जमल्यास शेडच्या बाजूने चर खोदावेत.

पडदे छिद्रे नसलेले असावेत. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्याची बांधणी छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने हवा खेळती राहून वातावरण खेळते राहण्यास मदत होते.

लिटर

लिटर दिवसातून किमान एक वेळतरी चांगली खालीवर हलवून घ्यावे. ओल्या लिटरमुळे शेडमधील वातावरण दूषित होते. ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ होते. कोंबड्या आजारास बळी पडण्याची शक्यता असते. चुकून लिटर जास्त प्रमाणात ओले झाले असेल तर तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा. त्या ठिकाणी नवीन लिटर टाकावे.

पावसाळ्यात लिटरमधील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास शेडमध्ये माश्‍यांचा प्रादुर्भाव वाढतो. या माशा लिटरमध्ये अंडी घालतात. त्या अंड्यांमधून बाहेर पडणाऱ्या अळ्यांमुळे जखमा होऊन कोंबड्या दगावतात. गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सिडिऑसिसचे एकपेशीय जंतूंचे प्रमाण वाढते. कॉक्सिडिऑसिसची लागण झाल्यास अ‍ॅम्प्रोलियम सोल्यूबल पावडर ३० ग्रॅम प्रति २५ लिटर पिण्याच्या पाण्यामधून कोंबड्यांना द्यावी.

कोंबडी खाद्य

खाद्याची साठवणूक फक्त एक आठवड्यांसाठी करावी. जास्त दिवस खाद्य साठवून ठेवल्यास त्यामध्ये बुरशी होण्याचा धोका संभवतो. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. खाद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गाठी झाल्यास असे खाद्य कोंबड्यांना देऊ नये. खाद्यामध्ये बुरशीजन्य विषबाधा विरोधक (टॉक्सिन बायंडर) व रक्ती हगवण (कॉक्सिडिसिस विरोधक कॉक्सिडिओस्टॅट) औषधी योग्य प्रमाणात मिसळून घ्यावीत. खाद्य तपासून घ्यावे.

पिण्याचे पाणी

पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर निरनिराळ्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरिन किंवा ब्लिचिंग पावडर यांसारखी जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत. पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून आतून व बाहेरून रेड ऑक्साइड लावावे. टाकी सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून व बाहेरून अधूनमधून चुना लावावा. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असू नये, अन्यथा पावसाचे पाणी टाकीत जाऊ शकते, त्यापासून कोंबड्यांना बाधा होऊ शकते.

जैवसुरक्षा

शेडच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण औषध मिसळलेले पाय बुजविण्याचे भांडे (फूट डीप्स) ठेवावे. फार्मवर काम करणाऱ्या कामगारांना स्वच्छ व निर्जंतुक कपडे, पादत्राणे वापरून प्रवेश द्यावा.

आपल्या फार्मवर काम करणाऱ्या कामगारांशिवाय इतर नवीन माणसांना येण्यास प्रतिबंध घालावा. वाया गेलेले खाद्य, खराब झालेली गादी, विष्ठा इत्यादी शेडजवळ टाकू नये. यासाठी प्रक्षेत्रावर वेगळा खड्डा करून त्यामध्ये टाकावे.

शेडच्या बाहेरील जागेत किमान ३० फूट अंतरापर्यंत निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. रोगनिदानासाठी आजारी कोंबडी किंवा मृत झालेली कोंबडी जवळच्या प्रयोगशाळेत पाठवावी. मृत कोंबडी जाळून किंवा पुरून टाकावी. शक्यतो आपल्या फार्मवर एकावेळी वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या असू नयेत. यासाठी एकाच वयाच्या कोंबडीपालनाची पद्धत (ऑल इन ऑल आउट) जास्त सोईस्कर असते. वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या एकाचवेळी पाळल्यास एका वयाच्या कोंबड्यांकडून दुसऱ्या वयाच्या कोंबड्यांना आजार होण्याची शक्यता असते.

डॉ. विजयसिंह लोणकर, ७८७५५७०३९२

(सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT