Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : संसर्गजन्य आजारावर ठेवा लक्ष...

टीम ॲग्रोवन

डॉ.एस. एस. वानखडे, डॉ. एस. एस. व्यवहारे

---------------

वातावरण बदलाचा (Climate Change) परिणाम जनावरांची वागणूक, आरोग्य तसेच प्रजननावर (Animal Breeding) प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या होतो. पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. दूषित पाणी, डास प्रादुर्भाव, हवेतील आर्द्रता यामुळे जनावरांमधील रोग प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे जनावरे अनेक संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. हे टाळण्यासाठी या काळात जनावरांची योग्य काळजी घ्यावी. (Animal Infectious Diseases)

जंतनिर्मूलन ः

- पावसाळ्यापूर्वी, तसेच पावसाळ्यात जनावरांना जंतनिर्मूलन करून घेणे आवश्यक आहे. जंतनाशके शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत.

- शिफारशीत प्रमाणात जंतनाशक तोंडावाटे द्यावे. जंतांचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताचे प्रमाण वाढून शरीरावरील ताण कमी होतो. जनावरे आजारांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.

पोट फुगणे ः

- हिरवा, कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांचे कोठी पोट फुगते. पोटाकडची डावी बाजू फुग्यासारखी दिसते. पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटातच साठून राहतो. अशा वेळी जनावर खाली पडून उठू शकत नाही. फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर व फुफ्फुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्यता असते.

उपाय ः

पोटफुगी टाळण्याकरिता जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर दोन ते तीन किलो सुका चारा द्यावा. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते व पोटफुगीची समस्या टाळता येते.

- जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर उपचार करावेत.

- पोटफुगीवर प्रथमोपचार म्हणून अर्धा लिटर गोडेतेलात ३० मि.लि. टर्पेंटाईन (पशू उपचारासाठी शिफारस असलेले), १०० ग्रॅम सोडा आणि ५ ग्रॅम हिंग मिसळावे. हे मिश्रण आजारी जनावराला ठसका न लागता हळूहळू पाजावे.

बुळकांडी ः

- हा संसर्गजन्य आजार पॅरामिक्सो विषाणूमुळे होतो.

- आजारामध्ये दुर्गंधीयुक्त जुलाब, जिभेवर, आतड्यांवर तसेच त्वचेवर बारीक पुटकुळ्यांसारखे फोड येतात. ताप येऊन डोळ्यांतून व नाकातून पाणी वाहते. डोळे लालसर होतात. तोंड येते, पातळ चिकट दुर्गंधीयुक्त शेण पडते.

- शरीरातील पाणी कमी होऊन जनावरांना तीव्र अशक्तपणा येतो. शरीराचे तापमान शेवटी थंड पडणे, नाडी व श्‍वसनास कमी होतो, हा आजाराचा शेवटचा टप्पा मानला जातो.

उपाय ः

- जनावरांना वेळेवर लसीकरण करावे. गोठ्यांची नियमित स्वच्छता करावी. प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे बांधावे.

- आजारी जनावरांची विष्ठा गोठ्यापासून दूर ठेवून खोल पुरावी. प्रतिजैविकांचा वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात वापर करावा.

खुरातील जखमा ः

- पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे किंवा त्यात चिखल गेल्यामुळे खुरांमध्ये जखमा होतात.

- सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माशा बसतात, जखमेत किडे होतात. असे झाल्याने जनावर लंगडते.

- चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. दुग्धोत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

- शेळ्या, मेंढ्यामध्ये जखमा झाल्यास त्यांना धनुर्वात होतो.

उपाय ः

- जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. जखम पोटॅशिअम परमॅंगनेटने स्वच्छ करून मलमपट्टी करावी.

पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार ः

- पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प हे संसर्गजन्य आजार होतात.

- जनावरांच्या छातीत पाणी होते, खालच्या जबड्याखाली सूज येते, श्‍वासोच्छ्वास करायला त्रास होतो, जनावरास १०४ ते १०५ अंश फॅरनहाइट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांपैकी ९० टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात.

उपाय ः

- पावसाळ्याच्या सुरुवातीला आजार प्रतिबंधात्मक लस टोचावी.

- फऱ्या, पायलाग, काळरोग, धनुर्वात नियंत्रणासाठी लसीकरण करावे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना ः

१) पावसाळ्यात गोठ्यातील स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. गोठ्यात जर खड्डे असतील, तर ताबडतोब ते मुरूम टाकून बुजवावेत. मलमूत्राचा योग्य निचरा करावा. गोठ्यात थोडा उतार करावा.

२) गोठ्यातील जमीन कोरडी करण्यासाठी चुन्याची पावडर, गव्हाच्या किंवा ज्वारीच्या तुसात मिसळून त्याचा पातळ थर गोठ्यात अंथरावा, यामुळे हवेतील आर्द्रता शोषून घेण्यास मदत होईल.

३) गोठा जंतुनाशक द्रावणाने अधून-मधून स्वच्छ करावा, त्यामुळे माश्यांचा प्रादुर्भाव कमी होईल.

४) पावसाचे पाणी गोठ्यात साचणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्याच्या बाहेरील बाजूस गोणपाटाचे पडदे लावावेत, यामुळे जास्त गारव्याचा सुद्धा त्रास होणार नाही.

५) पावसाळ्यात अस्वच्छता, ओलाव्यामुळे जनावरांना आजार होतात.पावसाळ्यात तापमान कमी असले, तरी हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे वातावरणात ओलसरपणा कायम राहतो. अशा वातावरणात सूक्ष्म जिवाणू व बुरशीची वाढ चांगली होत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते.

६) जनावरांना विविध आजार हे जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवीजन्य असतात. पावसाळ्यात बाह्यपरजीवींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्यामुळे जनावरांना सरा, बॅबेसिऑसिस, तसेच लहान जनावरांमध्ये ब्लू टंग यासारखे आजार होतात.

७) लहान-मोठ्या जनावरांमध्ये आंतरपरजीवींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशके पाजावीत.

८) या वातावरणात कासदाह आजार होतो. यासाठी दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर काळजी व स्वच्छता बाळगावी. दूध काढण्यापूर्वी व दूध काढल्यानंतर पोटॅशिअम परमँगनेटच्या द्रावणाने कास स्वच्छ धुवावी. जनावरांच्या विशेषतः दुधाळ जनावरांची बसण्याची जागा गोठ्यात अतिशय स्वच्छ असावी.

९) पावसाळ्यात वासरे बऱ्याच आजारांना बळी पडतात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी. लहान वासरांना पावसाळ्यात न्यूमोनिया हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये वासरांना श्‍वास घेताना त्रास होतो, घसा व छातीतून श्‍वास घेताना खरखर असा आवाज येतो, ताप येतो. या रोगामुळे पावसाळ्यात वासरे दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. वासरांना कोरड्या जागेत बांधावे. भरपूर हवा व सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी बांधावे. स्वच्छ पाणी प्यावयास द्यावे.

१०) पावसाळ्यात जनावरे माजावर येण्याचेसुद्धा प्रमाण जास्त असते. त्यामुळे माजाच्या योग्य वेळी जनावरांचे कृत्रिम रेतन करावे.

११) पावसाळ्यात जनावरांचे खाद्य ज्या ठिकाणी साठवून ठेवले आहे, तेथे पावसाचे पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी; कारण खाद्य ओले झाल्यास बुरशी लागते. जनावरांना असा चारा दिल्यास जनावरे आजारी पडतात.

-----------------------------------------------------------------------

संपर्क ः

- डॉ. एस. एस. वानखडे, ८९८३४६६८८०

(पशुविकृती विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

- डॉ. एस. एस. व्यवहारे, ९५५२५३२२४०

(पशू प्रजनन व प्रसूती विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT