Animal Husbandry Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry Advice : पशुपालन सल्ला

Animal Care : वातावरणातील तीव्र बदलापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी करून ठेवावी.

Team Agrowon

डॉ. सी. व्ही. धांडोरे

Animal Husbandry : स्थानिक हवामानाच्या अंदाजाची अद्ययावत माहिती ठेवावी. वातावरणातील तीव्र बदलापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी करून ठेवावी. जनावरांचे थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या खिडक्यांना बारदानाचे पडदे लावावेत. पत्र्याचे छत असल्यास त्यावर वाळलेले गवत किंवा कडब्याचा थर पसरावा. गोठ्यातील जमीन थंड होऊ नये यासाठी वाळलेल्या चाऱ्याचा थर अंथरावा.

अशक्त व आजारी जनावरास थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या अंगावर बारदान टाकावे. जनावरांना रात्री उबदार निवाऱ्यात ठेवावे.

जनावरांना ओलाव्यापासून दूर ठेवावे. तसेच उष्णतेसाठी शेकोटी पेटविली असेल तर त्यापासून निघणाऱ्या धूरापासून त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.ओलावा आणि धूर यामुळे जनावरांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.

जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी विशेष करून लहान वय आणि अशक्त जनावरांना पेंड व गूळ आहारात द्यावा. त्यांना उबदार ठेवण्याची सोय असावी.

जनावरांना उच्च दर्जाच्या चारा व पशुखाद्याचा मुबलक साठा असावा.

सुधारित पशुपोषण पद्धती व पूरक खाद्य वापरावेत. जनावरांना जनावरांना जंतनाशक द्यावे.

जनावरांचे बाह्यपरजीवी कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवावी. निरगुडी, तुळस, गवती चहा यांच्या जुड्या गोठ्यात लटकवाव्या. त्या वासाने बाह्य परजीवी कीटक जनावरांच्या गोठ्यात येण्याची शक्यता कमी होते. गोठा स्वच्छतेसाठी कडुलिंबाचे तेल असलेले निर्जंतुकीकरण द्रावण वापरावे.

जनावरांच्या संवर्गानुसार रोगप्रतिबंधक लस द्यावी.

पशुखाद्य आणि पाण्यातून पुरेसे क्षार पुरविण्यात यावेत. दुभत्या जनावरांना संतुलित आहार आणि पूरक स्निग्ध खाद्य पुरविण्यात यावेत.

जनावरांच्या पाणी पिण्याची भांडी स्वच्छ असावीत. जनावरांना दिवसातून चार वेळेस कोमट पाणी पिण्यास द्यावे.

सहा महिन्यांपुढील गर्भधारणा असलेल्या जनावरांना वाढीव खाद्य द्यावे. 

मृत जनावरांच्या विल्हेवाटीची जागा ही सार्वजनिक जागा व पाणवठ्यापासून दूर असावी. तसेच ती जागा काटेरी कुंपणाने संरक्षित असावी आणि तेथे फलक लावण्यात यावा.

जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना धुवावे. जनावरांना धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तत्काळ उपचार करावेत. दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी गरम कोमट पाण्याचा वापर करावा.

बहुवर्षीय चारा पिकांची वाढ अति थंडीमुळे हळूहळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.

संध्याकाळचा जनावराचा चारा सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान द्यावा कारण दिलेल्या आहाराचे चयापचन होऊन ऊर्जा निर्मितीसाठी कमीत कमी सहा ते आठ तास लागतात. म्हणजेच तयार होणारी ऊर्जा त्यांच्या तापमान नियमानासाठी रात्री थंडीच्या काळात दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान वापरता येईल, कारण या वेळी थंडीचा ताण जास्त प्रमाणात पाहावयास मिळतो. हिवाळ्यात जनावरांना जास्त खाद्य देणे गरजेचे असते, त्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया वाढते. शरीरात अधिक ऊर्जा उष्णता निर्माण होऊन शरीराचे तापमान नियमित ठेवले जाते.

शेळ्या, मेंढ्यांची काळजी

स्थलांतर करणाऱ्या आणि रानात शेळी, मेंढी बसवणाऱ्या पशुपालकांनी विशेष खबरदारी घ्यावी. जनावरांना बंदीस्त उबदार निवारा मिळेल याची दक्षता घ्यावी.शेळ्या, मेंढ्यांना रानात बसवले असेल तर उबदार आच्छादने पांघरावीत.

शरीरात लवकर ऊर्जा निर्माण होण्यासाठी कर्बोदके युक्त खाद्य प्राधान्याने देण्यात यावे परंतु अॅसिडॉसिस होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

मेंढयांची लोकर कापणी थांबवावी.

वेळापत्रकानुसार लसीकरण करावे.

आवश्यक औषधी आणि जीवनसत्त्वांचा साठा ठेवावा.

कोंबड्यांची काळजी

शेडमध्ये दोन्ही बाजूंच्या जाळ्यांना पडदे लावून रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावे. उन्हाच्या वेळी, दुपारी पडदे उघडावेत. शेडमध्ये तपमान नियंत्रणाची सोय असावी.

शेडमधील तापमान ( २१ ते २३ अंश सेल्सिअस) नियंत्रित राहणे आवश्यक असते. त्यामुळे शेडमध्ये विजेचे बल्ब, शेगडी किंवा ब्रुडरचा वापर करावा.

हवामानातील बदलामुळे कोंबड्यांवर ताण येवू नये म्हणून त्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाइटस, जीवन सत्त्व, इत्यादींचा वापर करावा.

अति थंडीमुळे हवेतील आर्द्रता वाढून लिटर, खाद्य यामध्ये बुरशीची वाढ होऊन कोंबड्यांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेडमधील लिटर स्वच्छ व कोरडी राहील याची खबरदारी घेण्यात यावी.

कोंबड्यांना पिण्यासाठी कोमट पाणी पुरवावे.

ऊर्जेची गरज वाढल्यामुळे आवश्यकतेनुसार पोषण तज्ञांच्या सल्ल्याने खाद्य तयार करून घ्यावे.

वेळापत्रकानुसार लसीकरण करावे.

पुरेसा औषधी, क्षार मिश्रणे आणि जीवनसत्वे यांचा साठा ठेवावा.

हे टाळा...

थंडीच्या काळात जनावरांना उघड्यावर बांधू नये, तसेच मोकाट सोडू नये.

थंडीमध्ये जनावरांच्या मेळाव्यांचे आयोजन टाळावे.

जनावरांना पिण्यास थंड पाणी देऊ नये.

जनावरांच्या निवाऱ्यात ओलसरपणा व धूर टाळावा.

रात्री व थंडीत जनावरांना उघड्यावर बांधून ठेऊ नये.

डॉ. सी. व्ही. धांडोरे, ९३७३५४८४९४

(पशुधन विकास अधिकारी, सांगोला,जि.सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT