Cow Abortion
Cow Abortion Agrowon
ॲनिमल केअर

Animal Care : दुधाळ जनावरांतील गर्भपात

टीम ॲग्रोवन

गाई, म्हशींची दूध उत्पादन (Milk Production) क्षमता वाढवण्यासाठी आरोग्य निरोगी असणे अत्यावश्यक आहे. विशिष्ट ऋतूमध्ये काही ठरावीक आजार जनावरांमध्ये (Animal Disease) होतात. हवामानातील बदलानुसार (Climate Change) दुधाळ जनावरांच्या (Milch Animal) नियोजनात ठरावीक बदल करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात दुधाळ जनावरामध्ये गर्भपाताची समस्या दिसते.

गर्भधारणेचा कालावधी पूर्ण होण्याअगोदर गर्भ बाहेर फेकला जातो. गर्भपात हा गाभण कालावधीमध्ये कोणत्याही वेळी होऊ शकतो. गर्भधारणेच्या सुरवातीच्या काळात गर्भ (भ्रूण) हा अतिशय लहान आकाराचा असतो, अशा वेळेस गर्भपात झाल्यास तो सहसा लक्षात येत नाही. गर्भपात हा नंतरच्या कालावधीत झाला, तर लाल मांसाचा गोळा योनीमार्गातून बाहेर फेकलेला आढळून येतो. काही वेळेस गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर गर्भपात झाल्यास गर्भ बाहेर फेकण्यास अडचण निर्माण होते.

गर्भपाताची कारणे :

नियोजनाचा अभाव, पोषण-तत्त्वे किंवा खनिज मिश्रणाची कमतरता, जंतुसंसर्ग आजार, चाऱ्यावर कीटकनाशक किंवा तणनाशकांचा अति वापर, विषारी वनस्पतींचे सेवन, स्त्रीजन्य संप्रेरकांचा प्रभाव असलेला चारा किंवा आनुवंशिकता.

नियोजनाचा अभाव

- जनावरांतील गर्भावस्थेमध्ये कृत्रिम रेतन करणे, गर्भाशयामध्ये औषध सोडणे, गर्भाची चुकीच्या पद्धतीने हाताळणी करणे, त्याचबरोबर अधिकचा प्रवास किंवा शारीरिक तणाव.

पोषक घटकांचा अभाव

- गर्भावस्थेमध्ये दुधाळ जनावरांच्या तसेच गर्भाच्या वाढीसाठी काही आवश्यक घटकांची गरज असते. त्यामध्ये खनिजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे घटक जनावरांना दैनंदिन चाऱ्यातून मिळत नाहीत किंवा अतिशय कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे गर्भावस्थेमध्ये त्यांची कमतरता निर्माण होते. त्याचबरोबर काही जीवनसत्त्वे जसे की जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ई किंवा जनावरांची उपासमार या सर्वांमुळे दुधाळ जनावरांत गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.

विषारी वनस्पतींचा परिणाम, चाऱ्यावर कीडनाशकांची फवारणी ः

- पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु या हिरव्या वनस्पतींमध्ये काही विषारी वनस्पतीदेखील असतात. ज्यांचे सेवन केल्याने विषबाधा किंवा दुधाळ जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.

- पावसाळ्यात बहुतांश शेतकरी आपल्या जनावरांसाठी संपूर्ण हिरवा चारा देतात. स्त्रीजन्य संप्रेरके असलेल्या वनस्पतींचे सेवन केल्याने होणाऱ्या गर्भपाताची संख्या अधिक दिसून येते.

- बहुतांश वेळी शेतकरी शेतीमध्ये तणनाशक तसेच कीडनाशकांचा वापर करतात. कीडनाशकांची फवारणी केलेला चारा खाल्ल्याने विषबाधा किंवा गर्भपात होतो.

- गर्भावस्थेमध्ये काही औषधे, जसे की स्टेरॉइडचा वापर केल्याने गर्भपात झाल्याचे निदर्शनास येते.

जंतुसंसर्ग आजारांचा प्रादुर्भाव

- जंतुसंसर्ग आजारामुळे होणाऱ्या गर्भापाताचे प्रमाण सर्वांत अधिक आहे. विशिष्ट जिवाणू, विषाणू, बुरशी किंवा रक्तातील आदिजीवांमुळे आजार होतात.

- उष्ण दमट वातावरणात गोचीड, माश्या, डास यांचे प्रमाण वाढते.

याबरोबरच दुसऱ्या आजारी जनावरांचा इतर निरोगी जनावरांत समावेश करणे, हे सर्व घटक जंतुसंसर्ग आजार पसरविण्यासाठी कारणीभूत ठरतात.

- जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या गर्भापातामध्ये ब्रूसेल्लोसीसमुळे होणाऱ्या गर्भपाताचे प्रमाण वाढलेले आहे. ब्रूसेल्लोसीस हा आजार इतर आजारी जनावरांच्या संपर्कात आल्याने होतो. यामध्ये गर्भपात प्रामुख्याने गर्भधारणेच्या शेवटच्या कालावधीत म्हणजे सहाव्या ते नवव्या महिन्यामध्ये दिसतो.

गर्भपाताची लक्षणे :

- गर्भापाताच्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी लक्षणे असू शकतात. लक्षणांवरून निदान होऊ शकते.

- गर्भधारणेच्या कालावधीमध्ये योनीमार्गातून स्राव येतो. हा स्राव चिकट पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा असू शकतो. सुरुवातीच्या काळात गर्भपात झाल्यास तो सहसा लक्षात येत नाही. अशा वेळेस कृत्रिम रेतन करूनदेखील वारंवार माजावर येण्याचे प्रमाण हे अधिक असते. हा माज अनियमित असतो.

- जंतुसंसर्ग आजारांमुळे होणाऱ्या गर्भापातामध्ये प्रामुख्याने चारा न खाणे, ताप येणे, पाठीला ताण देणे अशी लक्षणे आढळून येतात.

- गर्भधारणेच्या शेवटच्या कालावधीत गर्भपात झाल्यास बऱ्याच वेळेस नैसर्गिकरीत्या गर्भ बाहेर फेकण्यास अडचण निर्माण होते. गर्भधारणेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नैसर्गिकरीत्या गर्भ बाहेर पडण्यासाठी गर्भ जिवंत असणे गरजेचे असते. गर्भाचा मृत्यू झाल्याने काही शारीरिक प्रकियाखंडित होते ज्यामुळे प्रजननास अडथळा निर्माण होतो. अशा वेळेस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत.

- गर्भपात झाल्यानंतर बहुतांश वेळेस वार अडकणे, चारा न खाणे, योनीमार्गातून येणाऱ्या स्त्रावाचा घाण वास येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.

प्रतिबंधात्मक उपाय :

- पावसाळ्यात दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ओला व निसरडा गोठा असल्यास दुधाळ जनावर घसरून पडल्यामुळे गर्भाला इजा पोहोचून गर्भपात किंवा अस्थिभंग होण्याची शक्यता असते.

- दमट वातावरणामुळे गोठ्यात गोचीड, पिसवा आणि गोमाश्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरांमध्ये बाह्यपरजीवीपासून होणारे विविध आजार उद्‌भवतात. अशा वेळेस गोठ्यात योग्य ती काळजी घेऊन पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतुनाशके फवारून घ्यावीत.

- स्त्रीजन्य संप्रेरके असलेला चारा जसे की सोयाबीन, क्लोवर (तीन पानी गवत), इत्यादी यांचा आहारातील समावेश कमी करून सुका, ओला चाऱ्याचा प्रमाणात वापर करावा.

- गर्भाच्या वाढीसाठी अतिरिक्त पोषण तत्त्वांची गरज असते. अशा वेळेस दुधाळ जनावरांच्या खाद्यामध्ये खनिज मिश्रणांचा समावेश करावा.

- काही वेळेस दुधाळ जनावरांत गर्भावस्थेमध्ये देखील माजावर येण्याची लक्षणे दिसून येतात. अशा वेळेस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गर्भधारणेची पुष्टी केल्याशिवाय कृत्रिम रेतन करू नये.

- जंतुसंसर्ग आजार होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. दुधाळ जनावरांचे पूर्ण लसीकरण करावे.

- ब्रूसेल्लोसीसने आजारी जनावर हे पूर्णपणे वेगळे ठेवावे. त्यासाठी वापरलेले साहित्य वेगळे ठेवावे. त्यांचा शिल्लक चारा जाळून टाकावा. या जनावरांची हाताळणी केल्यानंतर हात हे जंतुनाशक द्रावणाने स्वच्छ धुवावेत.

- गर्भपात झालेल्या जनावरांचा वार इतर जनावरे खाण्याची शक्यता असते. यामुळे हा आजार इतर जनावरांना होऊ शकतो.

- काही पक्षी, भटकी कुत्री हा आजार पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर वार, मृत गर्भाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

संपर्क ः डॉ. अनुजकुमार कोळी, ९१४५०५०२३७

(पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT