Vegetable
Vegetable  Agrowon
ॲग्रो गाईड

Vegetable : शेतकरी नियोजन ः वेलवर्गीय भाजीपाला

टीम ॲग्रोवन

शेतकरी ः दत्तात्रय रतन सोनवणे

गाव ः आंबेगाव, ता. येवला, जि. नाशिक

एकूण क्षेत्र ः ९ एकर

काकडी लागवड ः अडीच एकर

---------------

नाशिक जिल्ह्यातील आंबेगाव येथील दत्तात्रय सोनवणे यांची ९ एकर शेती आहे. त्यात अडीच एकरावर काकडी लागवड (Cucumber Cultivation), तर उर्वरित क्षेत्रामध्ये कांदा (Onion), टोमॅटो, मका पिकांची लागवड (Maize Cultivation) केली जाते. दत्तात्रय यांचा वेलवर्गीय भाजीपाला (Vegetable Cultivation) पिकांच्या लागवडीकडे विशेष कल असतो. त्यात कारले, गिलके व काकडी या पिकांचा समावेश असतो. यासह टोमॅटो उत्पादनही ते घेतात.

भाजीपाला पिकांमध्ये योग्य व्यवस्थापन, बाजारपेठेचा अंदाज व गुणवत्तापूर्ण मालाचे उत्पादन हे तीन मुद्दे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मात्र या सर्व बाबी हवामानावर अवलंबून असतात. बदलत्या हवामानाचा पिकावर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बदलत्या हवामानात योग्य निरीक्षणे नोंदवून पीक व्यवस्थापन करणे व कीड-रोगांची जोखीम कमी करून त्याचा वेळेस प्रादुर्भाव करणे गरजेचे असते. त्यामुळे दर्जेदार पीक उत्पादन मिळून चांगले दर मिळण्यास मदत होते, असे दत्तात्रय सांगतात. सिंचनासाठी त्यांच्याकडे ४ विहिरी, १ शेततळे आहे. त्यातील उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो. संपूर्ण लागवडीत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो. जेणेकरून तणांच्या प्रादुर्भाव आणि बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.

लागवड नियोजन ः

- दत्तात्रय सोनवणे मागील ३ वर्षांपासून काकडी लागवड करत आहेत. लागवड दोन टप्प्यांत करण्याचे त्यांचे नियोजन असते. त्यानुसार सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन केले जाते.

- या वर्षी पहिल्या टप्प्यात जून महिन्यात आणि जुलैअखेर काकडी लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सिमला मिरची पीक घेतलेल्या १ एकरावर आणि दुसऱ्या टप्प्यात कारले पीक घेतलेल्या दीड एकरावर दोन्ही पिके निघाल्यानंतर काकडी लागवड केली आहे.

- दोन्ही लागवडींत आधीच्या पिकास शेणखत आणि रासायनिक खतांच्या मात्रा दिल्यामुळे बेसल डोस देण्याची आवश्यकता भासली नाही.

- नियोजनानुसार जून लागवडीत ट्रॅक्टरच्या मदतीने चार फूट अंतराची सरी पाडून २ ते अडीच फूट अंतरावर बियाणे टोकून घेतले. त्यानंतर जुलैअखेर लागवडीत आधी कारले पिकासाठी काढलेल्या सरींमध्येच काकडी बियाणे टोकून घेतले. जुलैअखेरची लागवड ही झिगझॅग पद्धतीने २ फुटांच्या सरीत अडीच ते ३ फुटांवर बियाणे टोकून केली. संपूर्ण लागवडीसाठी खासगी कंपनीचे बियाणे वापरले आहे.

- सरीमध्ये पॉलिमल्चिंग पेपरचा वापर केला आहे. पॉलिमल्चिंगच्या वापरामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे खुरपणीच्या खर्चात बचत होते. तसेच पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते, असा त्यांचा अनुभव आहे.

- सिंचनासाठी ठिबकचा वापर केला आहे. बियाणे टोकल्यानंतर लगेच सिंचन केले.

सिंचन व्यवस्थापन ः

- पावसाचा कालावधी आणि जमिनीचा वाफसा स्थिती पाहून सिंचनाचे नियोजन केले जाते. पाऊस नसेल तेव्हा दिवसाआड सिंचन केले तर पावसाच्या काळात वाफसा स्थिती पाहून ४ ते ५ दिवसांनी सिंचन केले.

- फुले येण्‍यास सुरुवात झाल्‍यापासून ते काढणीपर्यंत पिकास नियमित आणि पुरेसे पाणी देणे आवश्यक असते. त्यानुसार सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. फळांची वाढ होत असताना पाण्‍याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्‍यास फळांना तडे पडण्याची शक्यता असते. तसेच फळगळ होते. त्यासाठी पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेतली जाते.

खत व्यवस्थापन ः

वेलवर्गीय पिकास खतांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे काकडी पिकाचे उत्पादन कमी येते.

- पूर्वमशागत केल्यानंतर निंबोळी, एरंडी पेंड ४० किलो, सल्फर २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा ५५ किलो प्रति एकर प्रमाणे दिली.

- सततच्या पावसामुळे झाडाची कूज होण्याची शक्यता असते. त्यासाठी विशेष खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर दिला. कुज टाळण्यासाठी ठिबकद्वारे नत्राची मात्रा पूर्णपणे बंद करून पोटॅशची मात्रा अधिक प्रमाणात देण्यावर भर दिला. त्यामुळे फुलगळ आणि कुज आढळून आली नाही.

- वाढीच्या अवस्थेत ३ ते ४ वेळा ह्युमिक ॲसिड, १२:६१ः०० आणि १३:०:४५ यांची आळवणी केली. ह्युमिक ॲसिडच्या वापरामुळे पांढरी मुळीची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत होते.

पीक व्यवस्थापन ः

- फुलधारणा होण्यासाठी पोषकद्रव्ये आणि बुरशीनाशकांच्या शिफारशीनुसार फवारण्या केल्या.

- दोन सरींमध्ये ९ फूट अंतर राखल्यामुळे वखरणीद्वारे आंतरमशागतीची कामे करणे अधिक सोयीचे झाले.

- नागअळी व पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिफारशीप्रमाणे आळवणी केली.

- सततच्या पावसामुळे पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेण्यावर अधिक भर दिला.

काढणी उत्पादन ः

- सध्या काकडी जून लागवडीतील काढणीची कामे पूर्ण झाली आहेत तर जुलै लागवडीमध्ये ४ तोडे झाले आहेत. सुरुवातीच्या तोड्यांमध्ये कमी उत्पादन मिळाले, मात्र नंतर त्यात वाढ होत गेली.

- जून लागवडीत साधारण ३० तोड्यांमधून ६०० ते ८०० क्रेट काकडी उत्पादन मिळाले. साधारण एक ते दीड महिना काढणीची सुरू होती. काढणीच्या काळात पिकाचे सिंचन आणि खत व्यवस्थापनावर विशेष भर दिला.

- जुलै लागवडीत आतापर्यंत ४ तोडे झाले आहेत. येत्या काळातील तोड्यांमध्ये अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

- अधिक दर मिळण्यासाठी काढणीपश्चात मालाची हाताळणी आणि प्रतवारी अत्यंत महत्त्वाची असते. त्यावर मालाची गुणवत्ता आणि दर अवलंबून असतो. संपूर्ण मालाची विक्री लासलगाव आणि नाशिक येथील मार्केटमध्ये विक्री केली जाते.

----------

- दत्तात्रय सोनवणे, ९८२३१२४०९३

(शब्दांकन ः मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT