Dr. Bharat Raskar Agrowon
ॲग्रो गाईड

Sugarcane Cultivation : पूर्वहंगामी उसामध्ये बटाटा आंतरपीक

पूर्वहंगामी उसामध्ये बटाटा (Potato) घेताना १ः१ या प्रमाणात घ्यावा. सुरुवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी पुरेसे मोकळी जागा असते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च बटाटा आंतरपिकाच्या माध्यमातून निघून जातो.

डॉ. भरत रासकर

ऊस (Sugarcane) लावल्यानंतर उगवण पूर्ण होण्यास ३ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर फुटवे फुटण्यास सुरुवात होते. फुटव्यांची पूर्ण वाढ होण्यास आणि संपूर्ण रिकामे क्षेत्र झाकण्यासाठी ३ ते ४ महिने लागतात. फुटव्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत दोन सरींतील जागा रिकामी राहाते. आंतरपिकासाठी ऊस लागवड ५ फुटांपेक्षा जास्त अंतरावर केल्यास मधल्या रिकाम्या जागेत आंतरपीक घेणे फायदेशीर आहे. दोन सऱ्यांमध्ये असलेली ७० टक्के रिकामी जागा, जमिनीतील ओलावा आणि दीर्घकाळ मिळणारा सूर्यप्रकाश या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लाभ घेण्यासाठी आंतरपीक घेणे शक्य आहे.

पूर्वहंगामी उसात आंतरपीक

आंतरपिके ऊस पिकाशी स्पर्धा न करणारी, उथळ मुळांची ठेवण असणारी आणि बुटकी असावीत. सर्वसाधारणपणे उसाच्या मोठ्या बांधणीपूर्वी आंतरपिकाची काढणी होईल असे पीक घ्यावे. आंतरपिकाची वाढ व उंची, अन्नघटक शोषण करण्याची पध्दत उसापेक्षा वेगळी असावी. स्थानिक बाजारपेठेत खात्रीशीर मागणी, रोग व किडींना बळी न पडणारे पीक असावे.

उसाची सरी

वरंबा पद्धतीने लागवड करताना सरीमध्ये ऊस लावला जातो. वरंब्याच्या मध्यभागी बटाट्याची लागवड केली जाते. त्यामुळे उसाची मुळे आणि पानांची वाढ सरीमध्ये तर बटाट्याची मुळे आणि पानांची वाढ वरंब्यामध्ये वेगवेगळ्या भागांत होत राहते. या दोन्ही पिकांची आपापसांत जमिनीकरिता आणि सूर्यप्रकाशाकरिता कोणत्याही प्रकारची स्पर्धा न होता ते एकमेकांच्या वाढीस पूरक ठरतात. ऊस पिकाच्या मशागतीच्या कामातच बटाट्याची लागवड व काढणी करणे सहज शक्य होते.

ऊस जातींची निवड

को ८६०३२, फुले १०००१, को.एम.०२६५ या पैकी कोणत्याही एका जातीची निवड करावी.

बटाटा जातींची निवड

१) कुफरी चंद्रमुखी, २) कुफरी ज्योती, ३) कुफरी जवाहर, ४) कुफरी पुखराज, ५) कुफरी लवकर, ६) कुफरी सुर्या, ७) कुफरी चिपसोना-१, ८) कुफरी चिपसोना-२, ९) कुफरी सिंदूरी, १०) कुफरी बादशहा.

बटाटा बेणे निवड

बटाट्याचे प्रमाणित कीड, रोगमुक्त बेणे वापरावे. शक्यतो राष्ट्रीय बियाणे महामंडळ किंवा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ या सरकारी यंत्रणांच्या प्रतिनिधींकडे सत्यप्रत किंवा पायाभूत बेण्याची आगाऊ नोंदणी करून खरेदी करावी. बेण्याचा बटाटा पूर्ण वाढलेला व फुगीर, जाड चांगल्या पोसलेल्या कोंबांचा असावा.

शक्यतो बेणे बटाटा अंड्याच्या आकाराचा, ५ सेंमी व्यास आणि २५ ते ३० ग्रॅम वजनाचा असावा. बटाट्याचा आकार मोठा असल्यास त्याच्या २० ते ३० ग्रॅम वजनाच्या फोडी कराव्यात. प्रत्येक फोडीवर किमान २ ते ३ डोळे असावेत. फोडी करताना विळा कॉपर ऑक्सिक्लोराइडच्या (३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणात वरचेवर बुडवून वापरावा. अशा फोडी किमान १० ते १२ तास सावलीत सुकवून वापराव्यात. बटाटा बेण्यास कार्बेन्डाझिमची (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) ५ मिनिटे प्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन

पूर्वहंगामी उसाला हेक्टरी ३४० किलो नत्र, १७० किलो स्फुरद व १७० किलो पालाश द्यावे. त्यापैकी १० टक्के नत्र (३४ किलो नत्र), ५० टक्के स्फुरद आणि पालाश (८५ किलो स्फुरद व पालाश) लागणीच्या वेळी द्यावे.नत्राचा दुसरा हप्ता म्हणजे ४० टक्के नत्र (१३६ किलो नत्र) ऊस लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी तर नत्राचा तिसरा हप्ता म्हणजे १० टक्के नत्र (३४ किलो नत्र) ऊस लागणीनंतर १२ ते १६ आठवड्यांनी द्यावा.

रासायनिक खतांचा उर्वरित चौथा हप्ता म्हणजेच राहिलेले ४० टक्के नत्र (१३६ किलो नत्र), ५० टक्के स्फुरद आणि पालाश (८५ किलो स्फुरद व पालाश) मोठ्या बांधणीच्या वेळी बटाटा पिकाची काढणी झाल्यानंतर उसाच्या सरीत द्यावा. तत्पूर्वी रिजरच्या साहाय्याने बटाट्याची काढणी केल्याने उसासाठी वरंबा तयार होईल. बटाट्याकरिता हेक्टरी १५० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व १२० किलो पालाश द्यावे. अर्धा नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीस द्यावा. उर्वरित अर्धा नत्र बटाट्याची बांधणी करताना द्यावा.

पाणी व्यवस्थापन

उसाच्या लागणीनंतर चौथ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदूरानुसार ८ ते १२ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी देत राहावे. उसाच्या उगवणीकरिता सुरवातीच्या काळात फार थोडे पाणी लागते. यावेळी भिजवलेल्या वरंब्यातील पाण्याचा उपयोग बटाटा पीक करते. बटाट्याची उगवण दोन आठवड्यात पूर्ण होते.

त्यानंतर उसाची उगवण ३ ते ४ आठवड्यांपर्यंत होत राहाते. तोपर्यंत वरंबे बटाट्याच्या पिकाने झाकले जातात. त्यामुळे पाण्याचा ताण कमी होतो. बटाटा आंतरपीक घेताना पाण्याचा जास्त वापर करणे टाळावे. लागणीनंतर एक महिन्याने आंतरपिकातील तण खुरपून घ्यावे.

बटाटा काढणीनंतरचे व्यवस्थापन

लागवडीपासून तीन महिन्यांमध्ये बटाटा काढणीस तयार होतो. एक महिन्यानंतर उसाला मातीची भर द्यावी लागते. तत्पूर्वी रासायनिक खतांची राहिलेली मात्रा सरीत द्यावी. त्यानंतर वरंब्यातून बैलचलीत नांगर किंवा छोट्या ट्रॅक्टरचा रिजर चालवावा. अशाने बटाटा पिकाची काढणी होऊन उसाला मातीची भर दिली जाते.

रिजर चालविताना जमिनीतून बाहेर पडलेले बटाटे वेचून घ्यावेत. उसाकरिता चांगली सरी तयार होण्याकरिता पुन्हा एकदा त्याच सरीतून रिजर चालवावा म्हणजे जमिनीत शिल्लक राहिलेले बटाटेही निघून येतील. उसास भरपूर भर लागेल. उसाची बांधणी करून लगेच पाणी द्यावे.

- डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७

(ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता.फलटण, जि.सातारा)

ऊस आणि बटाटा लागवड

पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत केली जाते. पूर्वहंगामी उसाचा कालावधी १५ महिन्यांचा असतो. उसाची लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात केली असल्यास बटाट्याची लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बटाट्याचे हेक्टरी २० क्विंटल बेणे लागते. उसाच्या सरीतील अंतर ४.५ ते ५ फूट आणि बटाट्याच्या दोन डोळ्यांतील अंतर १५ सेंमी ठेवावे.

लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी ६ ते ७ आठवड्यांचा कालावधी लागतो. उसामध्ये बटाटा घेताना १ः१ या प्रमाणात घ्यावा. सुरुवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी पुरेसे मोकळी जागा असते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च बटाटा आंतरपिकाच्या माध्यमातून निघून जातो.

आंतरपीक घेतल्याने तणांचा नैसर्गिक बंदोबस्त होऊन प्रमाण कमी होते. या पद्धतीमध्ये प्रथम तिफणीने १५० सेंमी अंतरावर उथळ सऱ्या पाडाव्यात. यामध्ये खते टाकून बटाटा बेण्याची लागवड करावी किंवा बटाटा पेरणी यंत्राने लागवड करावी. नंतर त्यामधील अंतरात उसासाठी सरी पाडावी म्हणजे बटाटा बेणे आपोआप झाकले जाईल. पडलेल्या सरीमध्ये उसासाठी खते देऊन कोरडी लागण करून पाणी द्यावे. अशाप्रकारे बटाट्याचे आंतरपीक घेता येईल.

पूर्वहंगामी उसात बटाटा अधिक फायद्याचा

उसाच्या उत्पादनातील संभाव्य घट टाळण्यासाठी बटाट्याचे आंतरपीक घ्यावे. बटाटा हे आंतरपीक पूर्वहंगामी उसाकरिता घेतल्याने फुटव्यांची जोमदार वाढ होते. बटाटा पिकास जास्त पाणी मानवत नाही. उसास पाणी देताना आपोआप भिजलेल्या वरंब्यावर तीन महिने इतक्या अल्प मुदतीत बटाट्याचे आंतरपीक भरघोस उत्पादन देते. तणांची वाढ रोखली जाते आणि तणांचे प्रमाण कमी होते.

जमिनीची सुपीकता वाढते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात वाढ होते. आंतरपिकामुळे जमीन, पाणी, खते व सूर्यप्रकाशाचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो. पूर्वहंगामी उसात बटाट्याची लागवड केल्यास ऊस उत्पादन १५ ते २० टक्के जास्त मिळते. साखर उतारा इतर हंगामापेक्षा अर्धा युनिटने जास्त मिळतो. बटाटा आंतरपिकाचे हेक्टरी २५ ते ३० टन आणि उसाचे २०० टन उत्पादन मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य

Agrowon Podcast: गहू-करडईची आवक घटली, आल्याचे दर स्थिर; पपई-फ्लॉवर दर टिकून व तेजीत

Leopard Terror : खानदेशात पर्वतीय भागात बिबट्यांची दहशत

Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र सुरू करावे

SCROLL FOR NEXT