Aromatic Plants  Agrowon
ॲग्रो गाईड

Trade In Aromatic Plants : भारतात १२ हजार सुगंधी वनस्पती; परंतु २५ वनस्पतींचाच व्यावसायिक कारणांसाठी उपयोग

सुगंधी वनस्पतींपासून मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती आणि व्यापार हा कृषी व्यापार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे. सुगंधी वनस्पतींच्या लागवड क्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे.

Team Agrowon

भागवत माने

भारतामध्ये प्राचीन काळापासून सुगंधी वनस्पतीचे अर्क व तेल यांचा वापर केला जातो. सण समारंभ, धार्मिक विधी यावेळी वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी सुगंधी पदार्थांचा वापर केला जातो. साबण, अगरबत्ती, अत्तरे, मेवामिठाई, आइस्क्रीम या उत्पादनांमध्ये सुगंधी वनस्पतींचा अर्क व तेलाचा वापर केला जातो.

सुगंधी पदार्थांची निर्मिती आणि व्यापार हा कृषी क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे. सुगंधी वनस्पतींपासून उत्पादने तयार करण्यासाठी सुगंधी वनस्पतींच्या लागवड क्षेत्रात वाढ करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात सुगंधी वनस्पतींची लागवड व त्यापासून अर्क व तेल काढणे, अत्तर निर्मिती या उद्योगाला फार वाव आहे. भारतात सुमारे १२ हजार प्रकारच्या सुगंधी वनस्पती आढळून येतात. त्यातील फक्त २० ते २५ वनस्पतींचा वापर मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीसाठी केला जातो.

गुलाब

गुलाब फुलाला फुलांचा राजा असे म्हणतात. रंग, सुगंध आणि आकार हे गुलाब फुलाचे मुख्य आकर्षण आहे. गुलाबापासून अत्तर, गुलाबपाणी, अर्क, गुलकंद अशी विविध उत्पादने तयार केली जातात.

अलीकडच्या काळात गुलाबापासून वाइन निर्मिती देखील होऊ लागली आहे. वेगवेगळी सौंदर्यप्रसाधने व खाद्य पदार्थांमध्येही गुलाबाचा उपयोग केला जातो.

गवती चहा

या वनस्पतींपासून तेल काढले जाते. त्याला देशात व परदेशात मोठी मागणी आहे. या तेलापासून महागडी परफ्युम तयार केली जातात. यात जीवनसत्त्व ‘अ’ भरपूर प्रमाणात असते.

वाळा

वाळा ही सुगंधी वनस्पती असून वाळ्याच्या मुळांपासून सुगंधी तेल काढले जाते. तेलाचा अत्तर, साबण, सौंदर्य प्रसाधने यामध्ये उपयोग केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्यात वाळ्याच्या मुळ्या टाकल्यास पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते. याची ठोंबापासून लागवड केली जाते.

मोगरा

मोगऱ्याच्या अर्काचा वापर अत्तर, साबण, सौंदर्य प्रसाधने यामध्ये केला जातो. चांगल्या सुगंधामुळे पुष्प सजावट, हार, वेणी, गजरा यासाठी उपयोग करतात. कलम करून लागवड करतात.

चंदन

चंदनाची विविध उत्पादने व सुगंधी पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय साबण, सौंदर्य प्रसाधने, स्वच्छता साहित्य, अगरबत्ती यामध्ये चंदनाचा उपयोग केला जातो. चंदनाच्या खोडाला बाजारात मोठी मागणी आहे. चंदनाची लागवड बियांपासून केली जाते.

निलगिरी

निलगिरी तेलाचा उपयोग अत्तर, सौंदर्य प्रसाधने व विविध औषधांमध्ये केला जातो. डासांना पळवून लावण्यासाठीही उपयोग होतो. वेगवेगळी मलम तयार करण्यासाठी देखील निलगिरीचा वापर केला जातो.

दवणा

या वनस्पतीपासून सुगंधी तेल काढली जाते. पानांचा वापर पुष्पहार निर्मितीसाठी होतो. कापडात दवण्याची फुले ठेवण्याची प्रथा आहे. यामुळे कपडे सुगंधी राहतात.विविध पेये तयार करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करतात. औषधांमध्ये उपयोग केला जातो. जलोदर, वांती, रक्तदोष, पोटसुळ यासाठी उपयोग करतात. लागवड कंदापासून केली जाते.

सिट्रोनेला

ही गवतवर्गीय वनस्पती असून यापासून सुगंधी तेले व अर्क काढले जाते. याचा उपयोग स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या निर्मितीमध्ये केला जातो. सुगंधी साबण व तेल निर्मितीसाठीही उपयोग केला जातो. या वनस्पतीची लागवड ठोंबापासून करतात. सिट्रोनेला ही वनस्पती गवतीचहा सारखी दिसते.

फळांमधील औषधी गुणधर्म

आवळा

हे आंबट व तुरट फळ आहे. पित्त आजारावर गुणकारी आहे. स्वरभेदीसाठी आवळा कंठी चूर्ण गायीच्या दुधातून देतात. उचकी लागल्यावर आवळा रस मध व पिंपळी मिसळून दिली जाते. मोरावळा पित्तनाशक आहे.

त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा आणि बेहडा यांच्या मिश्रणापासून तयार केले जाते. त्रिफळा चूर्ण हे पोटाच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

फळांमधील औषधी गुणधर्म

जांभूळ

जांभूळ फळ मधुर आणि आम्ल असून मधुमेहात जांभळाच्या बियांचे चूर्ण देतात. या चुर्णामुळे यकृताची क्रिया सुधारते. अतिसार व आव यावर जांभूळाचा रस देतात. रक्ती आव, रक्तपदर यावरही जांभूळ उपयुक्त आहे. तोंड आल्यास, सालीच्या काढाच्या गुळण्या करतात.

पपई

पपई फळ त्वचा रोगनाशक आहे. पिकलेल्या पपईमध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे असतात. पपईच्या कच्च्या फळाला चिरा पाडून निघालेला चीक गजकर्ण झालेल्या जागी लावल्यास गजकर्ण बरा होते. भूक वाढीसाठी पिकलेल्या पपईचे रोज सेवन करावे.

पक्व पपई खाल्यास शौचास साफ होते. पपईमध्ये जीवनसत्त्व अ मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांचे आरोग्य राखण्यास उपयुक्त आहे. कच्च्या पपईपासून पेपेन तयार केले जाते.

केळी

केळी फळांमध्ये कर्बोदके, खनिजे व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. कावीळ लवकर बरी करण्यासाठी पिकलेले केळ एरंडाच्या पानांचा रस १० ग्रॅम प्रमाणे घ्यावे. रोज किमान २ ते ३ केळी खाल्यास शक्ती संचय होतो. सर्व मुत्रविकारांसाठी केळी सालीचा रस व गोमूत्र मिसळून दिले जाते.

पेरू

हे फळ थंड व मधुर आहे. जळवातावर पेरूच्या पानांचा उपयोग केला जातो. पेरूमध्ये असलेले जीवनसत्त्व क अनेक आजारांवर उपयुक्त आहे. जॅम, सॉस, सरबत बनविण्यासाठी पेरूचा वापर केला जातो. पेरूपासून उत्तम जेली तयार करता येते.

द्राक्ष

द्राक्ष हे स्निग्ध बलकारक आहे. याचा उपयोग आम्लपित्त, घशातील जळजळ, मंदाग्नी व आमवात यासाठी होतो. द्राक्षापासून मनुके तयार केले जातात. श्रमपरिहारासाठी मनुका उपयुक्त आहेत. बाळहिरडे व द्राक्ष एकत्र घेतल्यास सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

चिक्कू

चिक्कू मधुर व पौष्टिक आहे. चिकूच्या दोन बिया पाण्यासोबत घेतल्यास लघवीच्या समस्या दूर होतात. लघवी अडचणी येत असल्यास चिकू बियांचे १ ते २ ग्रॅम चूर्ण दिले जाते. चिक्कू पित्तनाशक, पौष्टिक, ज्वर शामक आहे.

भागवत माने - ९८९०६४२४४२ (लेखक प्रगतशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT