Sunflower Cultivation
Sunflower Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

सूर्यफुल पेरणीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?

Team Agrowon

यंदा देशभरात सूर्यफुलाला (Sunflower) मागणी वाढली आहे. रशिया-युक्रेन (Russia - Ukrane) युध्दामुळे जागतिक पातळीवर सूर्यफुल तेलाचा पुरवठा (Oil Supplay) घटला आहे. कारण युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर सूर्यफुलाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे भारतातही सूर्यफुलाला चांगला उठाव मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात सूर्यफुल लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. एरवी आपत्कालीन दुरुस्ती पीक म्हणून सूर्यफुलाचा विचार केला जातो. खरीपात पावसाने ओढ दिली तर ज्वारीला पर्या म्हणून सूर्यफुलाची लागवड केली जाते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार सूर्यफुलाची लागवड करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

जमीन
सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

पूर्वमशागत
जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी दहा ते बारा टन चांगले कुजलेले शेण खत घालावे.

पेरणीची वेळ
जुलैच्या पहिला पंधरवड्यात पेरणी करता येते. पेरणीचे अंतर मध्यम ते खोल जमिनीत ४५ सेंटीमीटर बाय ३० सेंटिमीटर भारी जमिनीत ६० सेंमी बाय ३० सेंमी तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधीच्या वाणाची लागवड ६० सेंमी बाय ३० सेंमी अंतरावर करावी. कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाडाच्या पाभरीने करावी. म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे ५ सेमी पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी.

बियाणे
सूर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे आठ ते दहा किलो बियाणे आणि संकरित वाणाचे पाच ते सहा किलो बियाणे प्रति हेक्‍टरी वापरावे. मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. अझॅटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

वाणाची निवड
सुधारित जातीपैकी फुले भास्कर, एस एस ५६, मॉर्डेन ६८४१४, भानू या जातींची निवड करावी. तर संकरित वाणापैकी के बी एस एच १, एल एफ एस एच १७१३५, एल एस एफ एच ४४, फुले रविराज, एम एस एफ एच १७ या वाणांची निवड करावी.

रासायनिक खते
कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाडाच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रती हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खातात मिसळून द्यावे.

आंतरमशागत
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपातील अंतर ३० सेंटीमीटर ठेवून विरळणी करावी. पेरणीनंतर पंधरा दिवसांनी एक खुरापणी करावी. तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी. रोप अवस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहून उत्पादनात घट येते.

पीक संरक्षण
विषाणूजन्य रोग हा रस शोषणाऱ्या फुल किड्यांमार्फत होतो. नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) एस एल २ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर पंधरा दिवसाच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्यात. केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी अळ्यांचे पुंजके वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.

काढणी
सूर्यफुलाची पाने देठ व फुलांची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगले वाळवून नंतर मळणी करावी. कोरडवाहू पिकापासून प्रतिहेक्टरी आठ ते दहा क्विंटल संकरित वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती संकरित वाणापासून प्रतिहेक्टरी १७ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.

विशेष बाब
पीक फुलोऱ्यात असताना सकाळी सात ते अकरा या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळुवार हात फिरवावा म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. परागीभवन होण्यासाठी प्रति हेक्टरी चार ते पाच मधमाशांच्या पेट्या ठेवाव्यात. सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. दरवर्षी त्याच जमिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादन क्षमता कमी होते. रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो त्यासाठी कमीत कमी तीन वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये.

कडधान्य, सूर्यफूल किंवा तृणधान्य, सूर्यफूल याप्रमाणे पिकाची फेरपालट करावी. पीक फुलोऱ्यात असताना किटकनाशकाची फवारणी करू नये. अगदी आवश्यकता असेल तरच किटकनाशके वापरावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT