Millet Processing
Millet Processing  Agrowon
ॲग्रो गाईड

Millet Processing : भरडधान्यांतील व्यावसायिक संधी

टीम ॲग्रोवन

भरडधान्यांना तृणधान्य, श्रीधान्य, देवधान्य अशा (Millet) नावाने संबोधले जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात राज्यामध्ये, आदिवासी व कोरडवाहू भागांत या पिकांची लागवड (Millet Cultivation) आहे.

भरडधान्यांमध्ये नऊ प्रकारच्या धान्यांचा समावेश होतो. यामध्ये ज्वारी (Jowar), नाचणी (Ragi), बाजरी (Pearl Millet) ही न्यूट्रल धान्ये आहेत. सावा, सामा, वरई, भगर, कोद्रा, राळ ही धान्ये सकारात्मक धान्ये आहेत; कारण या धान्यांचा आहारात दररोज समावेश केल्याने वेगवेगळ्या आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.

विशेषतः मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदय व रक्त वाहिन्या अशा आजारांवर खूप चांगला फरक पडतो. भारतीय भरडधान्य संशोधन संस्था, हैदराबाद तसेच केंद्रीय खाद्य प्रौद्योगिक संशोधन संस्था, म्हैसूर या ठिकाणाहून भरडधान्यांवरील प्रक्रियेसाठी प्रशिक्षण उपलब्ध आहे.

आहारातील महत्त्व

इतर धान्यांच्या तुलनेत जास्त पौष्टिक.

लेसिथिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते पचनास सोपे असते, चेतासंस्था बळकट राहतात.

कुपोषणावर मात करण्यासाठी आवश्यक लोह, जस्त आणि कॅल्शिअमची उपलब्धता.

कार्बोहाइड्रेट्स, तंतुमय घटक, फिनोलिक संयुगे आणि औषधी गुणधर्म असलेले फायटोकेमिकल्सची उपलब्धता.

नाचणीमध्ये दुधापेक्षा तीन पट कॅल्शिअम. (३००-३५० मिलिग्रॅम/१०० ग्रॅम)

तंतुमय घटकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे चिकटपणा व पाणी धरण्याची क्षमता असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त.

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी उपयुक्त.

भरडधान्यांमधील प्रक्रिया

प्राथमिक प्रक्रिया ः पीक शेतीमधून काढल्यानंतर प्रथम त्यामध्ये असलेले दगड, गवत, काड्या आणि त्यानंतर त्यावरील आवरण हे एका विशिष्ट यंत्राच्या साह्याने काढले जाते. त्यानंतर धान्याची विक्री होते.

द्वितीय प्रक्रिया ः प्राथमिक प्रक्रियेमधून जे धान्य येते त्यापासून विविध प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ बनवले जातात. उदा. बिस्किटे, केक, ब्रेड. त्याचबरोबर पोहे, रवा, पीठ, शेवया, नूडल्स, लाडू, खाकरा.

तृतीय प्रक्रिया ः भरडधान्य पदार्थावर फ्राय, ब्लांचिंग आणि कुकिंग अशा प्रक्रिया केल्या जातात.

व्यावसायिक संधी

प्राथमिक प्रक्रिया ः भरडधान्य काढणीनंतर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी बचत गट, शेतकरी गट व शेतकरी कंपनी किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांना चांगली संधी आहे. यामध्ये चार प्रकारच्या यंत्रणा येतात. त्यासाठी साधारण सहा लाखांची गुंतवणूक करावी लागते. या यंत्रणांची प्रति ताशी ५०० किलोपर्यंतची प्रक्रिया क्षमता आहे.

बेकरी उत्पादने ः सध्या बाजारामध्ये भरडधान्यापासून बनवलेल्या बेकरी उत्पादनांना मोठी मागणी आहे. बचत गट किंवा वैयक्तिक व्यावसायिकांना ही चांगली संधी आहे. सुरुवातीला एक लाखांची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी ओव्हन, मिक्सर, बिस्कीट कटर अशा यंत्रणांची गरज असते.

 पीठ, रवा ः भरडधान्य पिठाला परदेशातही मागणी आहे. बचत गट व वैयक्तिक व्यावसायिक हा उद्योग सुरू करू शकतात. यासाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. यंत्राच्या माध्यमातून पीठ व रवा निर्मिती करता येते.

पोहे, लाह्या ः शेतकरी गटांनी ‘स्मार्ट’ या शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन पोहे, लाह्या निर्मिती व्यवसायाला सुरवात करता येते. यासाठी साधारण ५० लाखांची गुंतवणूक आहे. या उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

लाडू, पापड, चिवडा ः बचत गटांना लाडू, पापड, चिवडा निर्मिती व्यवसायात संधी आहे. घरगुती सामग्री वापरून हा व्यवसाय करता येतो.

हॉटेलमधील पदार्थ ः इडली, डोसा, अप्पे तसेच पोहे, उपमा, शिरा असे पदार्थ बनवून विक्री करणे शक्य आहे. त्याचबरोबर पुलाव, लेमन व टोमॅटो राइस सोबत भरड धान्यांचे विविध पदार्थ आपण ग्राहकांना देऊ शकतो. यामध्ये महिला बचत गटाला संधी आहे.

 शेवया, नूडल्स ः आपल्याकडे गहू, मैद्याच्या शेवया तयार करतात. यामध्ये भरडधान्याचे प्रमाण वाढवून शेवया व नूडल्स तयार करता येतात. या व्यवसायासाठी कमीत कमी ७० ते ८० हजारांची गुंतवणूक लागते.

खाकरा निर्मिती ः साधारणतः १० ते १२ लाखांची गुंतवणूक करून खाकरा निर्मिती व्यवसाय सुरू करता येतो. विविध प्रकारच्या स्वादांमध्ये खाकरा निर्मिती करता येते.

 बीजोत्पादन ः पारंपरिक पद्धतीने भरडधान्यांचे उत्पादन कमी होत आहे. हे लक्षात घेऊन नवीन जातींचे बीजोत्पादन करण्याची चांगली संधी शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनीला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ः मूल्यवर्धित पदार्थ बनवण्यासाठी भरडधान्यांची मागणी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी ब्लॉकचेन तसेच यांत्रिकीकरणाचा वापर शक्य आहे. यामुळे भरडधान्यांची गुणवत्ता वाढवणे शक्य आहे. तसेच ग्राहकांना उत्पादनांचा योग्य वेळी पुरवठा करणे शक्य आहे.

- महेश लोंढे, ८७९९९९६२५४, (लेखक भरडधान्य प्रक्रिया उद्योजक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT