अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञान 
ॲग्रो गाईड

अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो प्रति हेक्‍टरी आहे. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३३१८ किलो/ हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे.

डॉ. शरद जाधव, डॉ. तानाजी वळकुंडे, डॉ. भरत रासकर

महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो प्रति हेक्‍टरी आहे. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३३१८ किलो/ हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे. महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणे म्हणजे कोरडवाहू गव्हाची लागवड, पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार न करणे, सुधारित वाणांचा वापर न करणे, पीक संरक्षणाचा अभाव, मशागत तंत्राचा अवलंब न करणे आणि गव्हाची उशिरा पेरणी करणे ही आहेत. जमीन बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा संतुलित वापर केल्यास अपेक्षित उत्पादन घेता येईल. जिराईत गहू मात्र ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीतच घ्यावा. शक्यतो हलक्‍या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे. हवामान

  • गहू पिकाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त हवामान चांगले मानवते.
  • गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.
  • फुटवे फुटण्याच्या वेळी थंडी पडल्यास फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होते.
  • दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस तापमान असल्यास ओंबीची लांबी, दाण्यांची संख्या आणि दाण्यांचा आकार वाढण्यास मदत होते.
  • थंडीचा कालावधी वाढल्यास उत्पादनात भर पडते आणि थंडीचा कालावधी कमी झाल्यास उत्पादनात घट येते.
  • मशागत

  • गहू पिकाच्या मुळ्या जमिनीत ६० ते ७० सें.मी. खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुशीत जमिनीची निवड करावी.
  • खरीप हंगामाचे पीक निघाल्यानंतर नांगरट व कुळवणी करून जमिनीची मशागत करावी.
  • शेवटच्या कुळवणीच्या अगोदर २० ते २५ बैलगाड्या (८ ते १० टन) चांगले कुजलेले शेणखत /कंपोस्ट खत पसरून टाकावे. पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडी कचरा वेचून घ्यावा.
  • सुधारित वाण मशागतीचे तंत्रज्ञान व पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर यामुळे राज्यातील गव्हाचे हेक्टरी सरासरी उत्पादन ४८२ किलोवरून १७६१ किलोपर्यंत वाढले आहे. पेरणीच्या कालावधीनुसार वाणांची शिफारस केलेली आहे. (तक्ता १) तक्ता १ : शिफारस केलेले सुधारित गव्हाचे वाण

    वाण पेरणीची परिस्थिती उत्पादनक्षमता (क्विंटल/हेक्टर) वैशिष्ट्य
    पंचवटी (एन.आय.डी.डब्ल्यू: १५) जिराईत पेरणी १२ ते १५ १.दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक. २. तांबेरा रोगास प्रतिकारक ३. रवा, शेवया,कुरड्या साठी उत्तम. ४. पीक १०५ ते ११० दिवसांत कापणीस तयार होते.
    नेत्रावती (एन आय ए डब्ल्यू: १४१५) जिराईत किंवा मर्यादित सिंचनाखाली जिराईत १६ ते १८, मर्यादित सिंचन २५ ते २८ १. तांबेरा रोगास प्रतिकारक २. जिरायती क्षेत्रात १०५ ते १०८ व मर्यादित सिंचनाखाली १०८ ते १११ दिवसात कापणीस तयार होतो.
    फुले समाधान (एनआयए डब्ल्यू: १९९४) बागायत वेळेवर किंवा उशिरा पेरणी वेळेवर पेरणी ४५ ते ५० , उशिरा पेरणी ४२ ते ४५. १. तांबेरा रोगास तसेच मावा किडीस प्रतिकारक २.चपाती साठी उत्तम ३.प्रचलित वाणापेक्षा नऊ ते दहा दिवस लवकर कापणीस तयार होतो. ४.वेळेवर पेरणी केल्यास १०५ ते ११०दिवसांत पक्व होतो. ५.उशिरा पेरणी केल्यास ११० ते ११५ दिवसात फक्त होतो.
    त्र्यंबक (एन आय ए डब्ल्यू: ३०१) बागायत वेळेवर पेरणी ४५ ते ५० १. दाणे टपोरे आणि आकर्षक. २. तांबेरा रोगास प्रतिकारक ३. चपाती साठी उत्तम ४. पीक ११० ते ११५ दिवसांत कापणीस तयार होते
    तपोवन (एन आय ए डब्ल्यू :९१७) बागायती वेळेवर पेरणी ४५ ते ५० १. दाणे मध्यम परंतु ओब्यांची संख्या जास्त २. तांबेरा रोगास प्रतिकारक ३. चपाती साठी उत्तम ४. पीक ११० ते ११५ दिवसांत कापणीस तयार होते.
    गोदावरी (एन आय डी डब्ल्यू: २९५) बागायती वेळेवर पेरणी ४५ ते ५० १. दाणे टपोरे, चमकदार, आकर्षक २. तांबेरा रोगास प्रतिकारक ३.रवा,शेवया,कुरड्या यासाठी उत्तम वाण ४. पीक ११० ते ११५ दिवसात कापणीस तयार होते.
    निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू: ३४) बागायती उशिरा पेरणी ३५ ते ४० १. दाणे मध्यम आकर्षक २. तांबेरा रोगास प्रतिकारक. ३ चपाती साठी उत्तम वाण ४. पीक १०५ ते ११० दिवसांत कापणीस तयार होते.

    पेरणीची वेळ

  • जिराईत गव्हाची पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.
  • बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत गव्हाची पेरणी केल्यास उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते. १५ डिसेंबरनंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.
  • बियाणे गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता हेक्टरी २० ते २२ लाख रोपांची संख्या शेतात असावी.यासाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी दर हेक्‍टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. बीज प्रक्रिया

  • पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम (७५% डब्ल्यू.एस.) या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर अझोटोबॅक्टर २५ ग्रॅम व पीएसबी २५ ग्रॅम -प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
  • गहू पिकावरील मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी गहू बियाण्याला थायामिथोक्झाम (३० % एफएस) ०.७५ मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करावी.
  • पेरणी

  • पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास जमीन ओलवावी व वाफसा आल्यावर जमीन कुळवावी.
  • बागायती गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत २० सें.मी. व उशिरा पेरणी १८ सें.मी. अंतर ठेवून करावी. संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत २० सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोल करावी, त्यामुळे उगवण चांगली होते.
  • पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी. आंतर मशागत करणे सोयीचे होते. -बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. -जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.
  • खत व्यवस्थापन माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्याचे प्रमाण कमी अधिक असल्यास त्याप्रमाणे खते कमी करावीत किंवा वाढवावीत. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी हेक्‍टरी १० टन पूर्ण कुजलेले शेणखत आणि लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीत २० किलो हिराकस १०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून नंतर द्यावे. जिरायती पेरणी करताना संपूर्ण नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. (तक्ता २ व तक्ता ३ ) तक्ता २: अन्नद्रव्य व्यवस्थापन (किलो /हेक्टरी)

    पेरणीची वेळ नत्र स्फुरद पालाश झिंक सल्फेट कमी असल्यास फेरस सल्फेट कमी असल्यास
    वेळेवर पेरणीसाठी १२० ६० ४० २५ २०
    उशिरा पेरणी साठी ८० ४० ४० -- --
    जिराईत पेरणीसाठी ४० २० -- -- --

    तक्ता ३ ः गव्हाच्या बागायत वेळेवर पेरणीसाठी सरळ खते किंवा मिश्रखते यांचे उपलब्धतेनुसार हेक्‍टरी खतमात्रा (किलो/हेक्टरी)  

    खताचे नाव मिश्र खते युरिया सिंगल सुपर फॉस्फेट पोटॅश
      पेरणीच्या वेळी पेरणीच्या वेळी २१ दिवसांनी पेरणीच्या वेळी पेरणीच्या वेळी
    सरळ खते -- १३० १३० ३७५ ६७
    २०:२०:०० ३०० १३० -- -- ६७
    १५:१५:१५ २६७ ४४ १३० १२५ --
    १०:२६:२६ १५४ ९७ १३० १२५ --
    १९:१९:१९ २१० ४४ १३० १२५ --

    महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात १९:१९:१९ या विद्राव्य खताची २% किंवा डीएपी २% (म्हणजेच २० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या खताची फवारणी पेरणीनंतर ५५ व ७० दिवसानंतर करावी. या फवारणीमुळे उत्पादनात १७% वाढ झाल्याचे प्रयोगात आढळून आले आहे. माती परीक्षणाद्वारे गहू पिकातील खत व्यवस्थापन नत्र (किलो /हेक्टर)=(७.५४ x अपेक्षित उत्पादन) - (०.७४ x जमिनीतील उपलब्ध नत्र किलो /हेक्टर) स्फुरद (किलो /हेक्टर)=(१.९० x अपेक्षित उत्पादन) - (२.८८ x जमिनीतील उपलब्ध स्फुरद किलो /हेक्टर) पालाश (किलो /हेक्टर)= (२.४९ x अपेक्षित उत्पादन)- (०.२२ x जमिनीतील उपलब्ध पालाश किलो /हेक्टर) आंतर मशागत गव्हात चांदवेल, हराळी, जंगली ओट, चिमणचारा, घोडा घास, चिलू आणि गाजर गवत यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरीप्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतर मशागतीमुळे तणांचा नाश होतो. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. डॉ. शरद जाधव- ९९७०९९६८९० (विषय विशेषज्ञ -कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT