कमी कालावधीमध्ये, कमी पाण्यामध्ये शेवगा लागवडीतून चांगले उत्पादन मिळू शकते.
कमी कालावधीमध्ये, कमी पाण्यामध्ये शेवगा लागवडीतून चांगले उत्पादन मिळू शकते. 
ॲग्रो गाईड

तंत्र शेवगा लागवडीचे

अंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच. पठाण

महाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. अशा अशा क्षेत्रात कमी कालावधीमध्ये व कमी पाण्यामध्ये येणारे शेवग्यासारखे पीक अत्यंत उपयुक्त ठरू शकते. पूर्वी बांध किंवा परसदारापुरती मर्यादित असलेली शेवग्याची झाडे आता व्यावसायिकदृष्‍ट्या महत्त्वाची ठरू शकतात.  

सध्या तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये शेवग्याची व्यावसायिक लागवड वाढत आहे. महाराष्ट्रातील शेतकरीही शेवगा पिकाकडे वळत असून, राज्यातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव, सोलापूर, सांगली, मिरज इ. जिल्ह्यामध्ये शेवग्याची लागवड वाढत आहे. या पिकासाठी राज्यातील समशीतोष्ण व ढगाळ हवामान पोषक आहे.  हलक्या, डोंगर उताराच्या मुरमाड अथवा मध्यम जमिनीमध्ये शेवगा लागवडीद्वारे शाश्वत उत्पन्न मिळू शकते. फळबाग योजनेमुळे पेरू, सीताफळ, मोसंबी, लिंबू अशा विविध फळबागांखालील क्षेत्र वाढत आहे. अशा फळझाडांची वाढ सुरुवातीला संथ गतीने होत असल्याने आंतरपीक म्हणूनही शेवगा घेता येतो. 

लागवडीचा हंगाम 

  • कोरडवाहू किंवा कमी पावसाच्या क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यानंतर जूनअखेर किंवा     जुलै महिन्यामध्ये शेवगा पिकाची लागवड  करावी. या काळात बियांची उगवण चांगली   होते. पोषक वातावरणामुळे झाडांची वाढ जोमाने होते.
  • लागवड पद्धत 

  •   अभिवृद्धी ः बियांपासून, रोपाद्वारे व छाट कलमाद्वारे शेवग्याची अभिवृद्धी केली जाते. 
  •   व्यापारी दृष्ट्या मोठ्या क्षेत्रावर लागवडीसाठी बियांपासून शेवगा लागवड ही एक सोपी व कमी खर्चाची पद्धत आहे. 
  •   नियोजित जागेवर ४५x४५x४५ सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. त्यात एक घमेले शेणखत, २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५०० ग्रॅम निंबोळी खत व १० ग्रॅम दाणेदार कीटकनाशक मातीत चांगले मिसळून खड्डा भरुन घ्यावा. 
  •   हलक्या, मुरमाड जमिनीत लागवडीसाठी दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ मी x २.५मी (प्रतिहेक्टरी ६४० रोपे ) व मध्यम जमिनीसाठी ३ x३ मी ( प्रतिहेक्टरी ४४४ रोपे) अंतर ठेवावे. 
  •   आपणास हव्या त्या सुधारित वाणाचे बियाणे निवडावे. या पद्धतीत एकरी ५०० ते ६०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. बियाणे टोकण्यापूर्वी ते रात्रभर (१२ तास) पाण्यात भिजवावे. यामुळे उगवण चांगली व लवकर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बियाणे पाण्यातून काढून लागवडीपूर्वी त्यास थायरम अथवा ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. मर रोगापासून बचाव होतो. 
  •   प्रत्येक खड्ड्यात ठरावीक अंतरावर दोन - दोन बियाणे एक इंच खोलीवर टोकावे व मातीने अलगद झाकावे. 
  •   रोपाद्वारे शेवगा लागवड करणार असल्यास आवश्यकतेपेक्षा २५ टक्के पिशव्या जास्त भराव्यात. तयार झालेली रोपे काळजीपूर्वक लावावीत. लागवडीस उशीर झाल्यास रोपांची मुळे पिशवीत गुंडाळले जाणे, पिशवी बाहेर येणे किंवा मोडणे अशा बाबी संभवतात. याच कारणामुळे बियांद्वारे शेवगा लागवड अधिक फायदेशीर ठरते. 
  • काढणी  व उत्पादन 
  •   लागवडीनंतर शेंगाच्या जातीप्रमाणे ५ ते ६ महिन्यात तोडणीस येतात. पुढे  ३ ते ४ महिने तोडणी चालते. 
  •   फुले लागल्यानंतर आणि शेंगाची जाडी वाढल्यानंतर सर्वसाधारणपणे अडीच ते तीन महिन्यात शेंगा काढणीस येतात. 
  •   शेंगा मांसल व मध्यम अवस्थेत तोडाव्यात. शेंगाची काढणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी. 
  •   काढणी नंतर शेंगाची लांबी, पक्वता व जाडीनुसार प्रतवारी करावी. 
  •   काढणीनंतर शेंगाचा ताजेपणा टिकवण्यासाठी ओल्या गोणपाटात गुंडाळून ठेवाव्यात. विक्रीसाठी पाठवाव्यात. एक वर्षानंतर पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून २५ ते ३० किलो शेंगा मिळतात.
  • सुधारित जाती 

  •  राज्यामध्ये पी.के.एम-१ (कोईमतूर-१), पी.के.एम -२ (कोईमतूर-२), कोकण रुचिरा, भाग्या (के.डी.एम-०१), ओडीसी इ. जातींची लागवड होते. त्यातील भाग्या ही कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठाने बारमाही उत्पादनासाठी विकसित केलेली जात आहे. 
  •  ओडिसी ही जात वर्षातून दोनदा बहार येणारी, लागवडीनंतर अवघ्या ४ ते ५ महिन्यात गुच्छामध्ये फुले येणारी, १.५ ते २ फूट लांबीच्या शेंगा घोसाने देणारी जात आहे. तिच्या शेंगात गराचे प्रमाण जास्त असून, चवीला रुचकर व स्वादिष्ट असल्याने देशांतर्गत व निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. 
  •  पी.के.एम-१ ही जात दोन वर्षातून तीन वेळा शेंगा उत्पादन देते. या जातीच्या शेंगा दोन ते अडीच फूट लांब, पोपटी रंगाच्या, भरपूर प्रथिनयुक्त गराच्या स्वादिष्ट व चवदार असतात.  
  • - अंबादास मेहेत्रे (आचार्य पदवी), ९५४५३२३९०६  - डॉ. एस. एच. पठाण (सहयोगी प्राध्यापक), ८१४९८३५९७० (कृषिविद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT