Taro plantation
Taro plantation 
ॲग्रो गाईड

कंदपिकांच्या दर्जेदार बेण्यांची उपलब्धता

डॉ. संकेत मोरे, डॉ. नम्रता गिरी

हवामानबदलाच्या काळात कंदपिके अन्नसुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत. अन्न, चारा व इंधन असे अनेक उपयोग असलेली ही पिके अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. विविध कंद पिकांचे बेणे केंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेमध्ये उपलब्ध आहे.  

जगातील एकूण खाण्यालायक पिकांपैकी १५ प्रजाती या कंदपिके  वर्गात मोडतात. कंदपिके ही महत्त्वाची अन्न पिके आहेत. जगभरातील उष्ण कटिबंधीय देशातील लोकांचे कंदपिके हे मुख्य अन्न आहे. अन्न, चारा व इंधन असे अनेक उपयोग असलेली ही पिके अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. या व्यतिरिक्त कंदपिकांचे औद्योगिकीकरणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्टार्च, रुपांतरीत स्टार्च, कसावाचे पीठ हे प्रक्रिया उद्योग तसेच  बेकरी पदार्थ निर्मितीमध्ये वापरले जाते. हवामानबदलाच्या काळात ही पिके अन्नसुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत. या पिकांना दुष्काळ निवारणारी पिके म्हणून देखील ओळखले जाते. जगातील ३० टक्के लोकसंख्येचे मुख्य अन्न असलेल्या कंद पिकांबाबत संशोधन महत्त्वाचे आहे. येत्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये कंद पिकांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. केंद्रीय कंदपिके संशोधन संस्था  

  • केंद्रीय कंदपिके संशोधन संस्था संस्थेची स्थापना १९६३ साली तिसऱ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत झाली. या संस्थेचे एक क्षेत्रीय केंद्र भुवनेश्‍वर येथे आहे. 
  • साधारणपणे १९६८ मध्ये कंद पिकांच्या नवीन जाती व सुधारित उत्पादन तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी अखिल भारतीय कंदपिके संशोधन योजना सुरू करण्यात आली. साधारणपणे पन्नास वैज्ञानिक कार्यरत असलेल्या या संस्थेत पिकाच्या लागवडीपासून ते अन्नप्रक्रियेपर्यंत सर्व मुद्द्यांवर संशोधन केले जाते. ‘कंदपिके लावा, उपासमार मिटवा' असे या संस्थेचे घोषवाक्‍य आहे. संस्थेत एकूण पाच विभाग कार्यरत आहेत. कंदपिकांना मुख्य पिकांचा दर्जा देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच पर्यावरणाचा समतोल साधून देशाची अन्नसुरक्षा मजबूत करणे,  लोकांची उपासमार मिटवणे असे  संस्थेचे ध्येय धोरण आहे. 
  • संस्थेच्या प्रक्षेत्रावर पंधरा कंदपिकाच्या एकूण ५,५७९ प्रजातींचे संवर्धन करण्यात आले आहे. कसावाच्या १,३२४, रताळी १,४९७, घोरकंद आणि कणगराच्या १,१६१, सुरण, भाजी आणि वडीचा अळू १,२३५ आणि इतर कंदपिकांच्या ३६२ प्रजातींचे संवर्धन करण्यात आले आहे. 
  • संस्थेने आत्तापर्यंत कंदपिकांच्या ६७ जाती विकसीत केल्या गेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने  कसावाच्या १९, रताळ्याच्या २१, घोरकंदच्या १६, सुरणच्या २, अळूच्या ८ आणि चीनी बटाट्याच्या एका जातींचा समावेश आहे. 
  • संस्थेने कसावाची मोझॅक विषाणू प्रतिकारक जात विकसित केली आहे. तसेच कंद पिकांच्या लागवडीचे सुधारित तंत्र विकसित केले आहे.  
  • संस्थेने मिनीसेट लागवड तंत्रज्ञान विकसीत केले गेले आहे. माती परीक्षणानुसार कंद पिकांसाठी खत वापराचे तंत्रज्ञान संस्थेने शेतकऱ्यांना दिले आहे. खतांचा वापर कमी व्हावा आणि माती परीक्षणाधारित योग्य खतांचा वापर होण्यासाठी  स्थान विशिष्ट पोषक तत्त्व प्रणाली संस्थेने तयार केली आहे. याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने कंद उत्पादनाचे तंत्रज्ञान संस्थेमध्ये उपलब्ध आहे. 
  • कंद पिकातील कीड,रोग नियंत्रणासाठी संस्थेने तंत्रज्ञान विकसित केले आहे. कसावाच्या पानांपासून जैविक कीटकनाशक संस्थेने तयार केले आहे. 
  • कंद पिकांपासून पापड, वेफर्स, चिवडा, नुडल्स, पास्ता, पीठ, ब्रेड, शिरा, भजी, साबुदाणा, चिप्स, बिस्किटस्‌  अशा पदार्थांच्या निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. 
  • संस्थेच्या टेक्‍नो इन्क्‍युबेशन केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी कंद आणतात. त्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ अल्पदरात बनवून घेतात. या पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.  
  • संस्थेच्या माध्यमातून शेतकरी,महिला, विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने कंदपिकांची लागवड आणि उत्पादन तंत्रज्ञान, रोग व कीड नियंत्रण, प्रक्रिया तंत्र, बेकरी पदार्थ प्रक्रिया इत्यादींचा समावेश होतो. गेल्या वर्षी संस्थेमध्ये तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि  बिहारमधील ८७४ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
  • संस्थेच्या माध्यामातून रताळे, कसावा, सुरण, याम बीन, कणगर, घोरकंद, अळू आणि चीनी बटाटा या कंदपिकांचे मोठ्या प्रमाणात बेणे शेतकऱ्यांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येते.
  • कंद पिकातील संशोधन 

     कंद पिकांवर संशोधन करणाऱ्या मोजक्या संस्था आहेत. यामध्ये केंद्रीय उष्ण कटिबंधीय कृषी संशोधन संस्था (कोलंबिया, दक्षिण अमेरिका), आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय कृषी संशोधन संस्था (नायजेरिया, आफ्रिका खंड) आणि  केंद्रीय कंदपिके संशोधन संस्था(त्रिवेंद्रम, केरळ) यांचा समावेश होतो. या संस्था कंदपिकांवर प्रामुख्याने संशोधन करतात. या संस्थापैकी त्रिवेंद्रम येथे असलेली केंद्रीय कंदपिके संशोधन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे जी पूर्णतः कंदपिकांमध्ये संशोधनाचे काम करते. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत या संशोधन संस्थेचे काम चालते. बटाटा पिकाव्यतिरिक्त इतर कंद पिकांवर संशोधन करणारी भारत  आणि जगातील ही एक मात्र संस्था आहे.  

    -डॉ. संकेत मोरे, ९६०१२६६६३६ -डॉ. नम्रता गिरी,७०१२०२७९२७ (केंद्रीय कंदपिके संशोधन संस्था, त्रिवेंद्रम, केरळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT