Inter cropping system
Inter cropping system 
ॲग्रो गाईड

एकात्मिक शेती पद्धती हाच हवामान बदलावर उपाय

डॉ. रामचंद्र साबळे

एकात्मिक शेती व्यवस्थापनानुसार काही क्षेत्र तृणधान्य व कडधान्य पिके, भाजीपाला, फळबाग पिके आणि काही क्षेत्र चारा पिकाखाली असले पाहिजे. याचबरोबरीने पूरक  उद्योगाची जोड देणे गरजेचे आहे.

जागतिक तापमान वाढ आणि त्या अनुषंगाने होणारे हवामान बदल आणि त्यास कृषी क्षेत्राने कसे सामोरे जावे हा विषय जगाच्या, देशाच्या आणि आपल्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा बनला आहे. २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात त्याचे परिणाम स्पष्टपणे जाणवले. 

  • २०१२, २०१५ आणि २०१८ मधील भीषण दुष्काळ आपण पाहिला. महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्‍यांची संख्या ८४ वरून १३५ पर्यंत गेली. 
  • पिण्यासाठी, जनावरे आणि शेतीसाठी पाणी अत्यंत अपुरे पडल्याने अन्नसुरक्षा धोक्‍यात आली. 
  • २०१४-१५ मध्ये विदर्भ, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील गारपीट आणि त्यामुळे झालेली जनावरे आणि मनुष्य हानी आपण पाहिली. 
  •  २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील अतिवृष्टी आणि त्या अनुषंगाने महापुराची परिस्थिती आणि त्याच वेळी मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती होती.
  • २०२० मध्ये मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. 
  • जून, २०२० च्या सुरुवातीस निसर्ग वादळाने झालेले कोकणातील मानवी वस्ती आणि शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
  • डिसेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळे आणि त्यातून तयार झालेले ढगाळ हवामान व पाऊसाचा द्राक्ष बागांवर मोठा परिणाम दिसून येत आहे.  
  • हवामान अंदाजानुसार पीक पद्धतीत बदल  

  • हवामान बदलाच्या परिणामाने शेती क्षेत्र पूर्णतः ग्रासले आहे. नुकसानीची पातळी अधिक असल्याने शासनास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे भाग पडले. शेती व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला आहे.  
  • लांब पल्ल्याच्या पावसाचे अंदाज आणि पीक पद्धतीत बदल

  • येणाऱ्या हंगामात पाऊस कमी पडण्याची शक्‍यता वर्तवल्यास विदर्भात कोरडवाहू कापसाचे क्षेत्र कमी करून त्याऐवजी मका, घेवडा, तूर, सोयाबीन, मूग, मटकी, उडीद, खरीप ज्वारी, धने लागवड करावी. यामुळे कापूस पिकापेक्षा कमी पाणी लागणारी पिके घेणे शक्‍य होईल. दुष्काळी परिस्थितीतही पिकांचे उत्पादन मिळवणे शक्‍य होईल. 
  • मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील कोरडवाहू कपाशीऐवजी कमी कालावधीची पिके घेतल्यास उत्पन्न मिळवणे शक्‍य होईल.
  • पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात बाजरीखालील क्षेत्र वाढवल्यास चारा आणि धान्य उत्पादन करणे शक्‍य होईल. याशिवाय बाजरी+तूर, सोयाबीन+तूर अशा पीक पद्धतींचा म्हणजेच आंतरपीक पद्धतीवर भर देऊन उत्पादनात शाश्‍वतता आणणे गरजेचे आहे. कमी कालावधीच्या पिकाचा समावेशही या पीक पद्धतीत केल्यास उत्पादनाची व दराची हमी निर्माण होईल.
  • २०११ ते २०२० या दशकात चार मोठी दुष्काळी वर्षे झाली. पाण्यावाचून पिके करपून गेली. त्यासाठी पीक पद्धतीत बदल गरजेचा आहे. 
  • महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांचा पूर्व भाग, नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, बीड, धुळे या जिल्ह्यांतील दुष्काळी पट्ट्यात ७५० मि.मी.पेक्षा कमी पाऊस होणाऱ्या भागात कोरडवाहू शेती व्यवस्थापनावर भर द्यावा लागेल. कमी पाण्यावर येणारी पिके व त्यांचे दुष्काळात तग धरणाऱ्या जातींच्या लागवडीवर भर देणे तसेच आंतरपीक पद्धतीचा अवलंब आहे.
  • एकात्मिक शेती व्यवस्थापन

  • एकात्मिक शेती व्यवस्थापनानुसार काही क्षेत्र तृणधान्य व कडधान्य पिके, भाजीपाला, फळबाग पिके आणि काही क्षेत्र चारा पिकाखाली असावे.
  • प्रत्येक शेतकऱ्याकडे कमीत कमी १ गाय किंवा १ म्हैस असते. याचबरोबरीने शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग इत्यादी पूरक उद्योग सुरू करावेत. 
  • मध्यम पल्ल्याचे हवामान  शेती व्यवस्थापनात अंदाजांचा वापर

  • मध्यम पल्ल्याच्या हवामान अंदाजाचा उपयोग करून व त्याचा वापर शेती व्यवस्थापनात करणे गरजेचे आहे. त्यातून शेतीत दररोजचे कामांचे नियोजन केल्यास धोक्‍याची पातळी कमी करणे शक्‍य होणार आहे. 
  •  कीड व रोगांचे नियंत्रण, आंतरमशागतीची कामे व त्याचे नियोजन, तसेच पीक पेरणीपासून काढणीपर्यंतची कामे त्यानुसार करणे शक्‍य होते.
  • सध्या ५२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाऊस हवामान व कृषी सल्ला एस.एम.एस. सेवेद्वारे दिला जातो. याशिवाय वृत्तपत्रे, मासिक व मीडियाद्वारे पावसाचे अंदाज व हवामान अंदाज दिले जातात. त्याचा उपयोग शेती व्यवस्थापनात करायला पाहिजे. 
  • महापूर, पूर परिस्थिती  

  • गेल्या काही वर्षांत महापूर व पूर परिस्थितीत पिकांचे नुकसान होणे, मातीची धूप होणे हे मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. अशा वेळी शेतातील पाणी निचरा करून शेतीतून बाहेर काढणे गरजेचे ठरते. यासाठी शेताची बांधबंदिस्ती आणि मातीची धूप थांबवणे गरजेचे आहे.
  • गारपिटीचा अंदाज मिळताच काढणीस आलेली फळे, भाजीपाला व फुले यांची काढणी करून बाजारात विक्री केल्यास नुकसान वाचवणे शक्‍य होणार आहे.
  • जमिनीची सुपीकता टिकवणे

  • कडधान्य पिकांनंतर तृणधान्य पिके किंवा तृणधान्य पिकानंतर कडधान्य पिकांची लागवड करावी.
  • पिकांची योग्य प्रकारे फेरपालट करावी.
  • मातीची तपासणी करून सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळीची पिके घेऊन ती गाडणे, सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील प्रमाण वाढवावे.
  • पॉलिहाउसमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला, फुलशेती

  • महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यासह जेथे विहिरीतून किंवा कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करणे शक्‍य आहे, तेथे जरबेरा, कार्नेशन, गुलाब फुलशेती किंवा ढोबळी मिरची, टोमॅटो या फळभाज्यांची लागवड करून सध्याच्या उत्पादनापेक्षा दीड ते दोन पट उत्पादन मिळविणे शक्‍य आहे. 
  • प्रत्येक शेतकऱ्याकडे ५ ते १० गुंठे क्षेत्र पॉलिहाउस, शेडनेट इत्यादींचा वापर करून ते शक्‍य होणार आहे. यासाठी शेतकरी वर्गास प्रशिक्षण देऊन बॅंकांकडून कर्जपुरवठा करावा. शेतकऱ्यांचे गट तयार करून शेतीमाल उत्पादक कंपनी स्थापन करून मालाच्या विक्री व्यवस्थापनाचे कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. 
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT