डोंगरभागातील जल,मृद संधारणामुळे शेतीला पाणी उपलब्ध होते.
डोंगरभागातील जल,मृद संधारणामुळे शेतीला पाणी उपलब्ध होते. 
ॲग्रो गाईड

लोकसहभागातून जलसंधारणाचा वारसा

डॉ. उमेश मुंडल्ये

देवरायांचा उपयोग जलव्यवस्थापन करण्यासाठी केला तर स्थलानुरूप उपाय करून, कमी खर्चात, सुयोग्य रीतीने जलसंधारण करता येते. यात नैसर्गिक उतार, प्रवाह, भूभाग यांमध्ये फारसे फेरफार न करता काम केल्यामुळे हे अयशस्वी होण्याची फारशी भीती नाही. यात लोकसहभाग असल्याने हे वर्षानुवर्षं यशस्वीपणे चालू आहे. मागील लेखात आपण जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाचे ऐतिहासिक उपाय पाहिले. यात प्रत्यक्ष कामात लोकसहभाग आणि कामाला सधन लोक, राजे, इत्यादी लोकांचं आर्थिक पाठबळ या गोष्टी यश देण्यासाठी उपयोगी होत्या. पण, असे उपाय सर्वच ठिकाणी करता येणे ही जवळपास अशक्य गोष्ट आहे; कारण आर्थिक पाठबळालाही मर्यादा आहेत. मग हे जल संधारण आणि व्यवस्थापन यशस्वी कसं करायचं? तेव्हा समाजातील जाणत्या लोकांनी काय उपाययोजना केल्या, या गोष्टींचा अभ्यास केला तर काही उद्बोधक गोष्टी समोर येतात. जलसंधारण करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना जमेल, आवडेल आणि प्रत्यक्ष वापरता येईल असा एक उपाय आपल्या पूर्वजांनी योग्य जागा बघून वापरात आणला. या उपायात कायद्याच्या भीतीपेक्षा लोकांमध्ये असलेल्या श्रद्धेचा उपयोग करून घेऊन स्थानिक पातळीवर योग्य उपाय योजण्याची एक सोपी, परिणामकारक योजना आखली गेली. श्रद्धेचा उपयोग करून, देवाच्या नावाने जंगलांचे पट्टे राखून त्याच्या साह्याने जल आणि मृदसंधारण करण्याची ही योजना खूप यशस्वीपणे राबवली गेली. लोकांच्या दैनंदिन जीवनात ही गुंफली गेल्यामुळे याचा परिणामकारक वापर होऊन जंगल, माती आणि पाणी या गोष्टींचे संरक्षण झाले. जल, मृदसंधारणात देवराई महत्त्वाची आपल्या पूर्वजांनी निसर्ग, पर्यावरण यांच्या समतोलाचं महत्त्व जाणून घेऊन, लोकांच्या श्रद्धेचं महत्त्व लक्षात घेऊन निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचे संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी, इत्यादी गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यान्‌पिढ्या  केले. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 'देवराई'. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेले असल्याने याची तोड होत नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यान्‌पिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचे जंगल आहे त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतेही झाड तोडायचे नाही या ठाम भावनेने या देवरायांचे संरक्षण केले जाते. श्रद्धा आणि भावना यांच्या मदतीने संरक्षण आणि संवर्धनाचे काम होत असल्याने देवराई संकल्पना चांगली रुजली. पण दुर्दैवाने, आजपर्यंत 'पाणी' या दृष्टीने देवराई या संकल्पनेचा अभ्यास म्हणावा तितका झालेला नाही.

  •  महाराष्ट्राचा विचार केला तर सह्याद्रीच्या घाटाच्या दोन्ही बाजूंच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर देवराया अस्तित्वात आहेत. तसेच, सातपुडा डोंगररांगा, यवतमाळ, नांदेडजवळील आदिवासी भाग, भंडारा, गडचिरोली भागांत जेथे आदिवासी वस्ती आहे त्या भागात देवराया आढळतात.
  • मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात देवरायांची संकल्पना आढळत नाही किंवा त्याबद्दल काही नोंद नाही.
  • आपण जर नीट पाहिले तर लक्षात येईल की, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात देवराई ही संकल्पना नाही तिथे जंगल पट्टा कमी आहे, एकूणच झाड-झाडोरा कमी आहे आणि पाण्याचे दुर्भिक्ष्यसुद्धा आहे. म्हणजेच देवराई असलेल्या ठिकाणी पाण्याचे स्राेत चांगले राहतात किंवा पाण्याचे स्राेत चांगले राहण्यासाठी देवराया राखल्या गेल्या आहेत.
  •  बहुतांश देवरायांमध्ये पाण्याचा एक तरी स्राेत असतो. अनेकदा तो झरा असेल, काही ठिकाणी विहीर असेल, तलाव किंवा पुष्करणी असेल, काही वेळेला ओढा असेल, क्वचित नदी असेल. खरंतर असा निष्कर्ष काढावासा वाटतो, की देवराई संकल्पना ही पाण्यासाठीच तयार केली गेली असावी. उत्तम राखलेले जंगल, त्यात लोकांचा फार कमी वावर आणि चांगल्या जंगलामुळे होणारे जलसंधारण आणि मृद्संधारण.
  • राखलेले जंगल आणि देवराईमधून काहीही बाहेर न नेण्याची प्रथा असल्याने साठून, तिथेच कुजलेला पालापाचोळा, जुने वृक्ष, या आणि इतर गोष्टींमुळे होणारे सेंद्रिय पदार्थाचे विघटन, त्यामुळे वाढलेला मातीचा कस आणि वाढलेली जलधारण क्षमता, जोमाने वाढणाऱ्या वनस्पती आणि या सर्वांमुळे त्या भागात वाढलेले जमिनीतील पाणी. हे दृश्य बहुतांश चांगल्या राखलेल्या देवरायांमध्ये बघायला मिळते.
  •  आजही अनेक देवराया अशा आहेत, की गावातल्या विहिरी आटतात पण गावापेक्षा उंच असलेल्या देवराईमध्ये वर्षभर पाणी मिळते. कित्येक ठिकाणी संपूर्ण गाव त्या एकाच स्राेतावर अवलंबून असते.
  • अनेक देवारायांमध्ये असलेल्या स्राेताचे पाणी हे गावापर्यंत नेलेले दिसते. त्या गावातील लोकांना माहिती असते की जोपर्यंत देवराई आहे तोपर्यंत पाणी मिळणार आहे. त्यामुळे गाव देवराई संरक्षण जास्त काळजी घेऊन करते. देवराई जर गावापेक्षा उंच ठिकाणी असेल तर त्या भागात जमिनीखालील पाण्याचा स्तर चांगला असतो आणि परिणामी गावातील विहिरी जास्त काळ पाणी देतात असाही अनुभव आहे.
  • दापोली तालुक्यातील कुडावळे, आसूद, कर्दे, अशा आणि त्याव्यतिरिक्त अनेक गावांमध्ये, देवराईमधून असलेल्या स्राेताचे पाणी घडवलेल्या दगडांचा पाट बांधून आणि उताराचा वापर करून डोंगरातून गावापर्यंत आणले गेले. या पाण्याचा वापर करून गावातील १५० ते २०० हेक्टर जमीन बागायतीखाली आली आहे. येथील शेतकरी नारळ, सुपारी, आंबा, फणस, मसाला पिकांची लागवड वाढली आहे. त्याचप्रमाणे, पिण्याचे पाणी कोणतीही ऊर्जा खर्च न करता वर्षभर गावाला मिळते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, इत्यादी जिल्ह्यांमध्ये देवराईमधील पाण्याच्या स्राेतांचा उपयोग करून गावाला मिळालेली समृद्धी पाहायला मिळते.
  • पाण्यासाठी राखा देवराया देवरायांचा उपयोग जलव्यवस्थापन करण्यासाठी केला तर स्थलानुरूप उपाय करून, कमी खर्चात, सुयोग्य रीतीने जलसंधारण करता येते. गावामागची टेकडी किंवा डोंगरावर असलेली देवराई राखायची, तिथलं पाणी पाटाने किंवा पाइपने गावापर्यंत उताराने आणायचं आणि पिण्याचं पाणी आणि बागायतीसाठी, दुसऱ्या पिकासाठी पाणी आणून त्यातून गाव समृद्ध करायचे, अशी सोपी वाटणारी मांडणी. यात नैसर्गिक उतार, प्रवाह, भूभाग यांमध्ये फारसे फेरफार न करता काम केल्यामुळे हे अयशस्वी होण्याची फारशी भीती नाही, यात काही नुकसान होण्याची भीती नाही. त्याचप्रमाणे, यात लोकसहभाग असल्याने आणि स्थानिक लोकांचा फायदा होत असल्याने हे वर्षानुवर्षं यशस्वीपणे चालू आहे. - डॉ. उमेश मुंडल्ये,९९६७०५४४६० (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT