सेंद्रिय शेती : जमीन सुपीकता, सापळा पिकांवर दिला भर
सेंद्रिय शेती : जमीन सुपीकता, सापळा पिकांवर दिला भर 
ॲग्रो गाईड

सेंद्रिय शेती : जमीन सुपीकता, सापळा पिकांवर दिला भर

Gopal Hage

मधापुरी (जि. अकोला) येथील सुधाकर बाणाईत कापूस , तूर, सोयाबीन या पिकांसोबतच भाजीपाला पिकेही सेंद्रिय पद्धतीने घेतात. पिकांची फेरपालट, मिश्रपीक पद्धतीवर त्यांचा भर आहे. सुक्ष्म सिंचन, सापळा पिकांचा वापर करुन त्यांनी उत्पादनात सातत्य ठेवले आहे.   

मुर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी (जि. अकोला) येथील सुधाकर बाणाईत गेल्या पंधरा वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करीत अाहे. शेती व्यवस्थापनाविषयी सांगताना ते म्हणाले, की माझ्याकडे ३२ एकर शेती अाहे. त्यातील सोळा एकर शेती बागायती आहे. माझी जमीन अत्यंत हलक्या प्रतीची अाहे. यात अाम्ही कापूस, सोयाबीन, तूर, व इतर पारंपरिक पिकांची लागवड करतो. सोळा एकरात पाणीपुरवठ्यासाठी दोन विहिरी आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी मी ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करतो. अोलिताची सोय झाल्यानंतर त्यात सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे नियोजन केले. पहिल्यांदा मी शेतीची बांधबंदिस्ती, सुपीकतेवर भर दिला. शेतातील माती पावसामुळे वाहून जाणार नाही या दृष्टीने सोळा एकर शेती सहा भागांत विभागून त्यात ढाळीचे बांध टाकले. बांधावर फळझाडांची लागवड केली. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरू लागले. जमिनीत ओलावा टिकून राहिला. विहिरीची पाणी पातळी वाढली.

पीक फेरपालटीवर भर  : माझ्याकडे दरवर्षी चार एकर कापूस, चार एकर तूर, चार एकर सोयाबीन आणि चार एकर भाजीपाला लागवड असते. भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने काकडी, दोडके, गंगाफळ, कारले या पिकांची लागवड करतो. पिकांची फेरपालट, मिश्रपीक पद्धतीवर मी भर दिला आहे. पडलेला पालापाचोळा जागच्या जागी जमिनीत मिसळणे सुरू केले. प्रत हलकी असल्याने या जमिनीत अोलावा टिकवून ठेवण्यासाठी हे फायदेशीर ठरले. रासायनिक खतांएेवजी मी गांडूळखत, शेणखताचा जास्तीत जास्त वापर सुरू केला. माझ्याकडे आठ जनावरे आहेत. त्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणखत, गांडूळखत तयार करतो. याचबरोबरीने बायोडायनामिक पद्धतीने खत तयार करतो. शेणखतामध्ये जिवाणू संवर्धके, तसेच ट्रायकोडर्मा मिसळतो. फवारणीसाठी गोमूत्र, दशपर्णी अर्क वापरतो. गेल्या दहा वर्षांत सेंद्रिय कर्ब ०.९५ पर्यंत पोचला अाहे. जमीन भुसभुशीत झाली आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारला, पिकांचे उत्पादन वाढू लागले आहे. मी झेंडू, ज्वारी यासारख्या सापळा पिकांची लागवड करतो, तसेच कापूस, तुरीमध्ये मुगाचे आंतरपीक घेतो. शेतात ठिकठिकाणी पक्षी थांबे बसविलेले आहेत, तसेच चिकट सापळांच्या वापर करतो. गरजेनुरास दर आठ दिवसांनी दशपर्णी अर्क, निंबोळीवर आधारित कीडनाशकांचा वापर करतो. मला कपशाची एकरी सरासरी दहा क्विटंल, सोयाबीनचे नऊ क्विंटल उत्पादन मिळते. भाजीपाल्याची विक्री थेट बाजारपेठेत करतो. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद आहे. सेंद्रिय शेती पद्धतीमुळे रासायनिक खते, कीडनाशकांच्या वापरात बचत झाली, जमिनीची पोत सुधारला. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत आहे. उत्पादनात सातत्य आहे. येत्या काळात मी प्रमाणीकरण करणार आहे.

संपर्क : सुधाकर बाणाईत, ९४२१७५१८५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT