शुन्य मशागत तंत्रासाठी खास यंत्रांची निर्मिती केली जात आहे.
शुन्य मशागत तंत्रासाठी खास यंत्रांची निर्मिती केली जात आहे. 
ॲग्रो गाईड

सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेती

डॉ. मेहराज शेख, डॉ. एच. हरविंदरसिंग सिद्धू

पारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा टप्पा गेल्या दोन शतकांमध्ये विचारसरणी म्हणून रुजत आहे. जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टीने संवर्धित शेती आणि त्यांची मूलभूत तीन तत्त्वे यांचा विचार या लेखामध्ये करूया. भारतामध्ये हरित क्रांतीच्या काळामध्ये विविध पिकांच्या उत्पादनवाढीला चालना मिळाली. त्यासाठी तीन घटक महत्त्वाचे ठरले.

  • पिकांच्या जातीतील आनुवांशिक बदल
  • बाह्य घटकांचा वापर उदा. बियाणे, खते, कीटकनाशके, पाणी इ.
  • यांत्रिकीकरणाद्वारे मशागत.
  • अधिक निविष्ठांचा वापर आणि अधिक उत्पादन दृष्टिकोन रुजत गेला. त्याचा दीर्घकालीन विचार करता पर्यावरण, मातीचे आरोग्य, सजीवांचे आरोग्य याला फटका बसला. पुढे प्रत्येक वर्षी पीक उत्पादनासाठीच्या खर्चात वाढ होत गेली. हा खर्च कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर विचार होऊ लागला. किमान निविष्ठांच्या वापरातून उत्पादनवाढीसाठी संशोधन होत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऊर्जा शेतीची  (एनर्जी फार्मिंग) संकल्पना जोर धरत आहे. रशियासह अनेक देशांमध्ये उभी शेती (व्हर्टिकल फार्मिंग), इटलीसह युरोपमध्ये संपूर्ण सेंद्रिय शेती, तर अमेरिका, युरोप आणि उत्तर आशियामध्ये संवर्धित शेतीचा विकास होत आहे. अर्थात, हे प्रयत्न अद्यापही व्यापक पातळीवर नसल्याने पारंपरिक शेतीही तितक्याच प्रमाणात होत आहे. संपूर्ण जगभरामध्ये मान्य होतील, लागू होतील असे काही संवर्धित शेतीचे निकष ठरलेले नाहीत.  मात्र, स्थानिक हवामान, माती, पिके आणि माती यांचा विचार करून सुपीकता व आरोग्य जपण्याच्या उद्देशाने तत्त्वांची मांडणी केली जात आहे. संवर्धित शेतीची तीन ठळक तत्त्वे मानली जातात. ती ठरविण्यामध्ये जागतिक अन्न परिषदेचा मोलाचा वाटा आहे. त्यामध्ये विविध पीकपद्धती, मातीचे प्रकार यानुसार किंचित बदल केल्यास सर्वत्र लागू पडतात. प्राधान्याने पिकांची फेरपालट, छोटी उपकरणे, कीड व तणांच्या नियंत्रणाच्या पद्धती, अन्नद्रव्यांचे नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन यांचा समावेश होतो.

    संवर्धित शेतीची ठळक तत्त्वे किमान मशागत हे संवर्धित शेतीचे मूळ तत्त्व आहे. मागील लेखामध्ये मातीच्या वर्गवारीनुसार मशागतीच्या मर्यादा, आवश्यकता यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. अलीकडे अनेक ठिकाणी किमान मशागतीमध्येही शून्य मशागतीचा अंगीकार केला जात आहे. अर्थात, तेही सोपे नाही. त्यामागील शास्त्रीय तत्त्वांचा विचार न करता अवलंब करणे अशक्य ठरेल. या पद्धतीसाठी लुधियाना (पंजाब) येथील बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया या संस्थेत विविध उपकरणांची निर्मिती व वापर या संदर्भात अभ्यास व संशोधन सुरू आहे. शून्य मशागत पद्धतीमध्ये सुरवातीची काही वर्षे (दोनपर्यंत) उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येत असल्याचा अनुभव आहे. मात्र, त्यानंतर हळूहळू जमिनीची सुपीकता व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढत गेले की उत्पादनामध्ये वाढ मिळत जाते. कमी उत्पादन खर्चामुळे उत्पन्नाची शाश्वती मिळते. किमान मशागतीचे फायदे :

  • मातीच्या सुपीक थरांमध्ये फारशी उलथापालथ होत नाही.
  • मातीमध्ये सच्छिद्रता निर्माण होऊन वायू आणि पाणी यांचे प्रमाण योग्य ठेवणे शक्य होते.
  • खनिजांच्या अधिभाराची आपआपसात अदलाबदल होते.
  • जमिनीची धूप कमी होते, पाण्याचा योग्य वापर होतो.
  • पारंपरिक मशागतीमुळे सेंद्रिय पदार्थांच्या ऑक्सिडेशनचे प्रमाण वाढत असते. त्याला आळा बसतो. सेंद्रिय पदार्थांची दीर्घकालीन साठवण मातीमध्ये होण्यास मदत होते.
  • मशागतीसाठी लागणारे मनुष्यबळ, ऊर्जा यात बचत होते.
  • स्थिर किंवा अर्धवेळ सेंद्रिय आच्छादन यामध्ये पिकामधील जमिनीचा सर्व भाग कायमस्वरूपी किंवा पिकाच्या अर्धकालावधीपर्यंत सेंद्रिय पदार्थांच्या साह्याने आच्छादित ठेवला जातो. सातत्याने सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या, गांडुळांच्या संख्येत वाढ होते. मातीची रचना सुधारते. जमिनीची धूप रोखली जाते. बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकून राहिल्याने सिंचनासाठी पाण्याचे प्रमाण कमी लागते. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक विविधतेत वाढ होऊन मातीचे आरोग्य सक्षम होते. या सोबतच मातीचे तापमान नियंत्रित राहते. यामध्ये आच्छादनासाठी वापरलेली पिके ही नत्र स्थिरीकरण करणारी असल्यास नत्राच्या उपलब्धतेत वाढ होते. पिकांची फेरपालट केवळ एकाच प्रकारची पिके सातत्याने घेत राहिल्यास जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता भासू लागते. त्याऐवजी पिकांची योग्य प्रकारे फेरपालट करण्याचे तत्त्व वापरले जाते. यामध्ये जमिनीमध्ये जैविक विविधता वाढवण्याचा उद्देश मुख्य असतो. नत्राचे स्थिरीकरण करणारी पिके प्राधान्याने लावली जातात.

    संपर्क : डॉ. मेहराज शेख, ९९७०३८७२०४ (मृदशास्त्रज्ञ, मृदशास्त्रज्ञ पथक, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

    Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

    River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

    Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

    Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

    SCROLL FOR NEXT