Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

Climate Change and Agriculture : वैज्ञानिक देत असलेला हवामान बदलाच्या संकटाचा इशारा आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणारे विविध अजैविक ताण पिकांच्या उत्पादकतेवर ५० ते ७० टक्क्यांपर्यंत विपरीत परिणाम करणारे ठरणार आहेत.
Dr. K. Sami Reddy
Dr. K. Sami ReddyAgrowon

अजैविक ताण म्हणजे नेमके काय?

आपण शेती करतो म्हणजे काय करतो, तर वनस्पती वाढवतो. त्यातून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला,फळे असे अन्नघटक उपलब्ध होतात. त्याच प्रमाणे दूध, अंडी, मांस यांसारख्या अन्नघटकांच्या उत्पादनाच्या अपेक्षेने काही पशुपक्षी यांचे पालन करतो. वनस्पती असो की हे सजीव, त्यांच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर हवामान, त्याचे ऋतू किंवा हंगाम अत्यंत महत्त्वाचे असते.

नियमित वातावरणामध्ये या घटकांची वाढ निरोगी व सशक्त होत असते. पण पर्यावरणातील बदल, स्थानिक तापमानातील बदल (उदा. तापमान वाढ, किंवा कमाल किमान तापमानातील फरक वाढणे इ.), पाऊस व त्यांच्या अनियमितपणा (उदा. पाण्याचा ताण ते दुष्काळ), मातीचे अनारोग्य अशा अजैविक घटकांचा ताण पिकावर पडत असतो. त्याला अजैविक ताण असे म्हणतात.

कोणत्याही वनस्पतीच्या वाढीमध्ये कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळेही ताण निर्माण होत असतो, त्याला जैविक ताण असे म्हणतात. पर्यावरणातील विविध घटकांच्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या अजैविक ताणाचा फटका अन्नधान्य उत्पादनाला बसू शकतो, हे लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी याच विषयावर अभ्यास व संशोधन करणारी आणि अजैविक ताण व्यवस्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणारी एखादी संस्था देशात असावी, अशी शिफारस केली होती.

Dr. K. Sami Reddy
Climate Change : बदलांकडे गांभिर्याने पाहा...

त्यानुसार २००६ मध्ये केंद्राने अजैविक ताण व्यवस्थापन संस्था (बारामती), जैविक ताण व्यवस्थापन संस्था (रायपूर) आणि कृषी जैवतंत्रज्ञान संस्था (रांची) अशा तीन संस्था उभारणीचा प्रस्ताव पुढे आला.

तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रात बारामतीजवळ माळेगाव बुद्रुक येथे २००९ मध्ये राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेची स्थापना झाली. संस्थेकडे प्रयोग व संशोधनासाठी सुमारे १५० एकर जमीनही उपलब्ध आहे.

हवामान बदल समस्येची तीव्रता वाढतच जाणार आहे, अशा स्थितीत आपली संस्था कशा प्रकारे कार्य करत आहे?

जागतिक पातळीवर सर्वांनाच भेडसावणाऱ्या या समस्येचा फटका आपल्या देशाला व राज्यालाही बसणार आहे. वातावरणातील बदलाच्या स्थितीचा पहिला परिणाम पाणी उपलब्धतेवर होणार आहे. पावसाचे दिवस आता कमी होत जात आहेत.

काही दिवसांत किंवा तासांत भरपूर पाऊस पडणे, पावसाचे मोठे खंड, त्यानंतर टंचाईची स्थिती तयार होणे अशी विचित्र स्थिती यापुढे वारंवार बघण्यास मिळू शकते. दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळे, उष्णतेची लाट किंवा थंडीची लाट अशाही समस्या आपण अनुभवत आहोत. एकूणच तापमान वाढीमुळे बाष्पीभवन वेगाने वाढत असून, जलसाठे आणि मातीमधील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होत आहे.

या साऱ्या घटना पिकांवर अजैविक ताण निर्माण करणाऱ्या आहेत. आपल्या संस्थेमध्ये पिकांवरील अजैविक ताणाचे व्यवस्थापन, संशोधनात्मक कार्यक्रम राबविणे, प्रतिकूल हवामान घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रणाली विकसित करणे, उपयुक्त वनस्पती व प्राणी यांच्यात हवामान किंवा पाण्याचा ताण सहन करणाऱ्या तत्त्वांचा शोध घेणे, व्यवस्थापनासाठी वनस्पतींमध्ये कार्यरत होणाऱ्या जनुकांचा किंवा प्रथिनांचा शोध घेणे याबाबत संशोधन सुरु आहे.

Dr. K. Sami Reddy
Climate Change : वाळवंटीकरण वाढवेल समस्येची तीव्रता

अजैविक ताणांचा नेमका कसा आणि कोणता फटका शेतकऱ्यांना तत्काळ बसेल असे वाटते?

दुष्काळासारख्या अजैविक ताणाचे तोटे सामान्यतः वेगवेगळ्या परिणामातून दीर्घ मुदतीनंतर लक्षात येतात. परंतु वातावरणीय घटक उदा. उष्णतेची लाट, थंडीची लाट, पूर, चक्रीवादळे, गारपीट यांच्यामुळे ताण पडल्याने पीक उत्पादनात ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. हा तत्काळ होणारा तोटा आहे. मुळात राज्यातील ६६ टक्के शेती ही पावसावर अवलंबून असून, अवर्षणग्रस्ततेची शिकार आहे.

बहुतेक भागात पर्जन्याचे प्रमाण कमी असून, त्यातही पुन्हा पावसाचे मोठमोठे खंड दिसून येतात. त्यामुळे मातीचा ओलावा वेगाने कमी होतो. या भागामध्ये संरक्षित जलसिंचनाची वानवा असल्याने उत्पादनामध्ये मोठी घट होते. दुसऱ्या बाजूला कमी दिवसांत जास्त पाऊस अशीही स्थिती राज्यात अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. त्यामुळे शेतीत पाणी निचऱ्याची समस्या उभी राहते. तिसरी बाब म्हणजे बेमोसमी पावसाचे वाढलेले प्रमाण.

राज्यात कांदा हे वर्षभर वेगवेगळ्या हंगामात घेतले जाते. या पिकाला दुष्काळ, बिगरमोसमी पाऊस, कमी पाऊस व जास्त पाऊस अशा टप्प्यात नुकसानीला सामोरे जावे लागते. अजैविक ताणामुळे शेतकऱ्यांच्या गळीतधान्य, कडधान्य, तृणधान्य अशा सर्व प्रकारच्या पीक उत्पादनाला फटका बसतो. फळबागांमध्येही आर्थिक फटका बसतो. पशुपालक शेतकऱ्यांनाही तोटा होतो.

गेल्या १५ वर्षांत शेतकऱ्यांसाठी या संस्थेने नेमके काय केले?

कोणत्याही नवीन संस्थेच्या वाटचालीमध्ये आर्थिक, कुशल आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता अशा अनेक समस्या येतच असतात. अशा स्थितीतही आमच्या शास्त्रज्ञांनी आपल्या ठरलेल्या उद्दिष्टांवर नेटाने काम सुरू ठेवले आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळामध्ये आमच्या संस्थेने केवळ अजैविक ताणाचे धोके शोधले नाहीत, तर त्याच्या व्यवस्थापनाचे नावीन्यपूर्ण मार्गदेखील शोधले आहेत.

आम्ही वातावरण, पाणी, माती यासंबंधीचे ताण जाणून घेऊन पीक, फळ उत्पादनाचे नुकसान कमी करण्यासाठी व्यवस्थापन पद्धतींचा शोध घेतला आहे. सोबतच पशुपालन, मत्स्यपालनातील नुकसान कमी करण्यासंदर्भात प्रयत्न केले आहेत. या संशोधनात्मक कामांसोबत अजैविक ताणांसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जाणीव निर्मिती आणि व्यवस्थापनाच्या पद्धतींचा प्रसार प्रचार अशा विस्तार कार्यावरही आमचा भर आहे.

त्यासाठी संस्थेच्या दीडशे एकर खडकाळ जमिनीमध्ये दुष्काळाशी कसे लढावे, याचे पहिले आदर्श प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी २६ शाखांमध्ये शास्त्रज्ञ काम करत असून, अजैविक ताण व्यवस्थापन पद्धती, तंत्रांचा शोध घेतला जातो. तंत्र विकसित केल्यानंतर त्याचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना दिले जाते. राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शैक्षणिक सहली येथे येऊन गेल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com