Sapians Book Review Agrowon
ॲग्रो गाईड

Sapians Book Review : सेपियन्स ः मानवजातीचा संक्षिप्त इतिहास

सतीश कुलकर्णी

- सतीश कुलकर्णी

सेपियन्स ः अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाईंड
लेखक ः युवाल नोवाह हरारी
अनुवाद ः वासंती फडके
प्रकाशन ः डायमंड पब्लिकेशन्स.
पाने ः ७१२
मूल्य ः पेपरबॅक आवृत्ती ४२० रुपये (ई-बुक २८३ रुपये)
किंमत वेगवेगळ्या वेबसाइटवर वेगवेगळी आहे.
----------------------------
Sapians By Yuval Noah Harari : आपण आज जगतो, तो वर्तमानकाळ. त्याचे उद्या त्वरित भूतकाळामध्ये रूपांतर होते. भूतकाळाचे आपल्याही नकळत इतिहासामध्ये. इथे आपण म्हटल्यामुळे तुम्हाला आपण कोणीतरी राजे, महाराजे किंवा सम्राट असल्याचा आभास झाला असला तर नवल नाही! कारण आपण जो काही इतिहास अभ्यासक्रमामध्ये शिकत आलो आहोत, तोच मुळी या राजेरजवाड्यांचा.

त्यातही प्रामुख्याने राजामहाराजांच्या कार्यकाळांचा व त्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि त्याच्या सनावळ्या यांचाच अभ्यास म्हणजेच इतिहास हा आपल्या शिक्षणपद्धतीने रुजवलेला समज. या इतिहासाच्या व्याख्येमध्ये सामान्य माणसांचा आवाज फारसा येताना आढळत नाही. मग सामान्य माणूस कसा कसा विकसित होत गेला, याविषयी आपल्याला माहिती तरी कोठे मिळणार?

गुयेल्फच्या गुहेमध्ये आपल्या हाताचे ठसे उमटविणाऱ्या प्रथम माणसांला काय सांगायचे होते, हे आपल्या कधी कळणार नाही. भटक्या वृत्तीच्या माणसांनी आपल्या कळपामध्ये किंवा गटामध्ये बसविलेल्या विविध पद्धतीचा केवळ अंदाज घेणेच शक्य आहे. हा अंदाज घेतला तो प्रामुख्याने उत्खननामध्ये आढळणाऱ्या हाडांवरून, भांड्यावरून किंवा शस्त्रांवरून. कारण काळाच्या ओघात याच बाबी टिकलेल्या असतात.


२५ लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील अॅस्ट्रेलोपिथिकस (अर्थ दक्षिणेकडील महावानर) या प्रजाती मानव प्रथम उत्क्रांत झाला. त्यापैकी काही स्त्री पुरुषांनी २० लाख वर्षांपूर्वी जन्मस्थान सोडून उत्तर आफ्रिका, युरोप आणि आशियाकडे स्थलांतर केले. त्या ठिकाणी असलेल्या हवामानानुसार आवश्यक असलेल्या क्षमता त्यामध्ये विकसित होत गेल्या. युरोप आणि पश्‍चिम आशियातील होमो निअॅंडरथेलेन्सिस (निअॅंडर खोऱ्यातील माणूस), आशियाच्या अतिपूर्वेकडील होमो इरेक्टस (ताठ कण्याचा माणूस) हा जवळ जवळ वीस लाख वर्षे जम बसवून होते.

इंडोनेशियातील जावा बेटावर होमो सोलेन्सिस (सोलो खोऱ्यातील माणूस) राहत होता. इंडोनेशियाच्या फ्लोरेस या बेटावरील माणसांना खुजेपणाच्या प्रक्रियेतून जावे लागले. त्यांची उंच केवळ एक मीटर आणि वजन २५ किलो इतके असे. त्यांना वैज्ञानिकांनी होमो फ्लोरेसिएन्सिस हे नाव दिले. अन्य ठिकाणी मानवाची उत्क्रांती होत असताना आफ्रिकेतही उत्क्रांती सुरूच होती.

तिथे होमो रुडोल्फेन्सिस (रुडॉल्फ तळ्याकाठचा माणूस), होमो इरगेस्टर (कष्ट करणारा माणूस) आणि सर्वांत शेवटी आपली जात होमो सेपियन्स (शहाणा माणूस) अशा जाती उत्क्रांत होत होत्या.

माणसांच्या एकूण सहा प्रजाती पृथ्वीतलावर एकाच वेळी जगत होत्या. त्यातील केवळ एक प्रजाती शिल्लक राहिलेली आहे. ती म्हणजे होमो सेपियन्स. आज पृथ्वीवर जिवंत असलेली सर्व माणसे केवळ याच प्रजातीची आहे. ही प्रजातीसुद्धा का शिल्लक राहिली आणि अन्य प्रजाती का तग धरू शकल्या नाहीत, याचा आढावा घेत जाताना अनेक नावीन्यपूर्ण बाबी आपल्यासमोर युवाल नोवाह हरारी यांनी उलगडल्या आहेत.

ते जेरुसलेम (इस्राईल) येथील हिब्रू विद्यापीठामध्ये इतिहासाचे प्राध्यापक असून, जागतिक इतिहास हा त्यांच्या पीएच.डी. आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यांचे ‘सेपियन्स ः अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाईंड’ (मराठी अनुवाद ः सेपीयन्स ः मानवजातीचा संक्षिप्त इतिहास) हे पुस्तक गेल्या दशकातील जागतिक पातळीवरील विचारवंताच्या चर्चेतील हे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक ठरले आहे. त्याचे जगातील ३० हून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

अन्य प्राण्यांच्या तुलनेमध्ये आकार, ताकद, शारीरिक क्षमता या अत्यंत मर्यादित असूनही या माणसाकडे असे काय वेगळेपण आहे, की तो सर्व प्राणीमात्रांमध्ये वेगळा ठरतो. अन्य मानवजातींशी आणि प्राण्यांशी त्याचे पारंपरिक वर्तन कसे राहिले असावे, याचेही वर्णन येते.

आपल्या भटक्या पूर्वजांनी शहरे, राज्ये कशी स्थापन केली? सुमारे ७० हजार वर्षापूर्वी संस्कृती नामक रचना कशी विकसित केली? मानवाच्या इतिहासाचा विचार करता तीन क्रांत्या महत्त्वाच्या ठरल्या. त्यातील पहिली ७० हजार वर्षांपूर्वी घडलेली बोधात्मक (कॉग्निटिव्ह) क्रांती, सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी घडलेली कृषिक्रांती आणि पाचशे वर्षांपूर्वी सुरू झालेली वैज्ञानिक क्रांती यांनी मानवावर आणि त्याच्या बरोबर राहणाऱ्या अन्य सजीवांवर काय परिणाम घडवले, याची माहिती या पुस्तकात येते.

केवळ पृथ्वी पादाक्रांत करून माणूस थांबलेला नाही, तर त्याने चंद्रावर पाऊल टाकून, मंगळावर यान पाठवून अन्य ग्रहांवरही आपला दावा ठोकलेला आहे. हे सारे तो कसे करू शकला म्हणजेच मानवजातीचा खरा भूतकाळ, इतिहास, मानववंशशास्त्र आणि विज्ञान जाणून घ्यायचा असेल, तर ‘सेपियन्स’ वाचण्याशिवाय पर्याय नाही, हेच खरे. या पुस्तकाची मांडणी इतकी अंतःप्रेरणेतून आणि सक्षम पुराव्यानिशी येते, की ती इतिहास म्हणून कुठेही कंटाळवाणी होत नाही. अत्यंत रंजक, सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेमध्ये समोर येते.
- सतीश कुलकर्णी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT