Mahatma Jyotiba Phule Agrowon
ॲग्रो विशेष

Mahatma Jyotiba Phule : ज्ञानसूर्य जोतीराव फुले

Indian Reform Movement : महाराष्ट्राच्या समाज विकासाचा पाया क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांनी घातला. एक भारतीय समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजप्रबोधक, विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते अशा रूपांत त्यांनी जीवनभर समाज विकासासाठी कार्य केले.

Team Agrowon

विद्येविना मती गेली

मतीविना नीती गेली

नीतीविना गती गेली

गतीविना वित्त गेले

वित्ताविना शूद्र खचले

एवढे अनर्थ

एका अविद्येने केले

म्हणून समाजाचा मोठा भाग असणाऱ्या स्त्रियांना आणि मागास जातींच्या लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. बहुजन समाजाचे अज्ञान, दुःख, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारली पाहिजे. यासाठी समाज शिक्षणावर त्यांनी भर दिला. जोतिबा यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबा यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.

जोतिबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षांतच त्यांनी आपला शालेय अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी युवा वयात अनेक वैचारिक पुस्तके वाचली. जागतिक विचारवंतांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन व्हावे यासाठी त्यांनी मोठे काम केले.

ते म्हणत सुशिक्षित कुटुंब सामाजिक गतिमानतेचे आणि राष्ट्रीय प्रगतीचे लक्षण आहे. स्त्री जर शिकली तर तिच्या शिक्षणानेच सर्वांगीण विकासाचे मार्ग खुले होतील. माणसाला माणसासारखे जगता आले पाहिजे. त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि हक्क शिक्षणामुळे प्राप्त होतो.

ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घ्यावे, ही कल्पनाच समाजाला मान्य नव्हती त्या काळात महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिकविण्याचा निर्धार केला. स्त्री शिक्षणाच्या कार्याची सुरुवात महात्मा फुले यांनी आपल्या घरातून केली. भारतामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावे, हा विचार त्यांनी प्रथम मांडला. त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडे वाड्यात सुरू केली.

मुलींना शिकविण्यासाठी त्यांना शिक्षक मिळाला नाही, म्हणून त्यांनी स्वतः काही दिवस हे काम करून पत्नी सावित्रीबाईं यांना शिक्षण देऊन अध्यापनासाठी पात्र बनवले. संकटांवर मात करून जोतिबांनी मुलींसाठी एकामागून एक अनेक शाळा उघडल्या.

अस्पृश्य मुलांसाठीही शाळा उघडल्या. शिक्षणाचे सक्तीचे सार्वत्रीकरण व्हावे, असा त्यांचा आग्रह होता. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी म्हणून त्यासाठी बक्षिसे, शिष्यवृत्ती योजना राबवावी, असा त्यांचा विचार होता. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर पुढे उच्च शिक्षण घेता आले पाहिजे, याविषयी ते आग्रही होते.

शिक्षण आणि ज्ञानाने समाजाचा विकास होईल, हे त्यांनी आपल्या लेखनातून आणि कार्यातून लोकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. जोतिबा फुले यांनी आपल्या प्रत्येक कार्यात पत्नी सावित्रीबाई यांना सामावून घेतले. सावित्रीबाईंनी पतीला समर्थ साथ दिली. समाजापुढे फुले दांपत्य म्हणजे आदर्श पती-पत्नींचे उदाहरण आहे.

बहुजन समाजाच्या विकासासाठी तसेच गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी जोतिबांनी १८७३ मध्ये ‘सत्यशोधक समाज’ची स्थापना केली. ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. बालविवाह, सती पद्धत, केशवपन यावर बंदी घालणारे कायदे इंग्रज सरकारकडून पास करून घेतले.

समाजातील विधवा स्त्रियांना आधार देण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधगृह तसेच विधवा आश्रम काढले. एका विधवेचा मुलगा यशवंत यांस त्यांनी दत्तक घेऊन आदर्श घातला. त्याला डॉक्टर बनवून समाजसेवेसाठी तयार केले. ब्राह्मण-पुरोहिताविना विवाह विधी सुरू केला. त्याला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली.

जोतीराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा, तृतीय रत्न ही क्रांतिकारी आणि सुधारणावादी विचार असणारी पुस्तके लिहिली.

महात्मा जोतिबा आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने ‘कृषी कायदा’ मंजूर केला. धर्म, समाज आणि परंपरा यांचे सत्य समोर आणण्यासाठीही अनेक पुस्तके लिहली. कोणताही धर्म ईश्‍वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे. असे विचार रोखठोकपणे त्यांनी मांडले. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे.

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले. सत्यशोधक समाजाच्या विचाराने प्रभावित होऊन पुढे अनेक संस्थांनी आणि मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांनी संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी कार्य केले गेले. शिक्षण आणि समता या दोन्ही गोष्टींसाठी त्यांनी जीवनभर कार्य केले. त्यांची समाजसेवा पाहून १८८८ मध्ये मुंबईत एका विशाल सभेत समाजाने त्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. २८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

९१५८७७४२४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन उभारावे

Electricity Departments Action: सिंगल फेज वापरणाऱ्या १९२ जणांवर कारवाई

Wildlife Protection: वाहनांसह बचाव साहित्य वन विभागाकडे सुपूर्द

Kharif Season Planning: खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध : शंभूराज देसाई

HTBT Seeds Illegal Sale: एचटीबीटी कपाशी बियाणे विक्री विरोधात कारवाई करा

SCROLL FOR NEXT