Village Education Agrowon
ॲग्रो विशेष

Village School Education : गावच्या शाळेत मिळावे जागतिक दर्जाचे शिक्षण

Team Agrowon

शिवाजी काकडे

Education System : शाळा ही मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. कुटुंबानंतर मुलांचे सामाजिक जीवन खऱ्या अर्थाने शाळेपासून सुरू होते. आजपर्यंत शाळा ही समाजाची एक छोटी प्रतिकृती आहे, असे म्हटले जायचे. ज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये वेगाने बदल होत आहे. नवी पिढी उपजत जागतिक समुदायाची सदस्य बनत आहे.

त्यामुळे आता शाळा म्हणजे जगाची छोटी प्रतिकृती आहे असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईन. व्यक्ती, समाज, देश आणि जगाच्या हितासाठी आपल्या देशातील समृद्ध प्रतिभा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याकरिता उच्च दर्जाचे सार्वभौमिक शिक्षण हा भविष्यासाठी सर्वांत चांगला मार्ग आहे.

माझी शाळा, सुंदर शाळा

सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत पाच ऑक्टोबर २०२३ रोजी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

शाळांना भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, स्वच्छता, आरोग्य, कला - क्रीडा गुणांचा विकास यातून शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्पर्धात्मक स्वरूपाचे हे अभियान सुरू करण्यात आले.

यात तालुका ते राज्यस्तर क्रमांक मिळविणाऱ्या शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाने यापूर्वी यशस्वी कामगिरी केली होती. अलीकडील काळात कोणतेही अभियान समाज पातळीवर यशस्वी होताना दिसत नाही..

सरकारी नव्हे, माझी शाळा

ग्रामीण भागात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यात जिल्हा परिषद शाळांचे मोठे योगदान आहे. गाव तिथे शाळा यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आली. यामुळे सर्वांना शिक्षणाची संधी मिळाली. याच शाळेत शिकून अनेकांचे भविष्य घडले.

सार्वजनिक शिक्षण व्यवस्था हा सक्रिय लोकशाही समाजाचा पाया आहे आणि राष्ट्रासाठी सर्वोत्तम शैक्षणिक निष्पत्ती मिळविण्यासाठी तिच्या कार्यपद्धतीत परिवर्तन व सशक्तीकरण करणे आवश्यक आहे. लोककल्याणकारी राज्यात शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहेच पण सरकारी शाळा म्हणजे केवळ सरकारची शाळा असेही होऊ नये.

सरकारी शाळा ही गावाची शाळा व्हावी. प्रत्येकाला माझी शाळा वाटावी. जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी आधुनिक साधने व सुविधा या शाळांमध्ये हव्यातच. शिक्षक, विद्यार्थ्यांना सुरक्षित, सर्वसमावेशक आणि प्रभावी अध्ययन वातावरण असावे. शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ व आकर्षक जागा, वीज, संगणकीय उपकरणे, इंटरनेट, ग्रंथालये आणि खेळांची व करमणुकीची साधने शाळांना असावी.

जिथे शिकण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा आणि उपयोगी संसाधने उपलब्ध असते, ती चांगली शिक्षण संस्था असते. सरकारी शाळांमध्ये या सुविधांच्या बाबतीत फारसे समाधानकारक चित्र नाही. आपली मुले हीच आपली संपत्ती आणि भविष्यही आहे. त्यांना चांगले शैक्षणिक अनुभव मिळावे यासाठी गावाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

ज्या गावातील नागरिकांना गावातील शाळा माझी शाळा वाटली तिथे शाळांचा कायापालट झाला. शिक्षक, पालक आणि गावाच्या सहकार्यातून हा कायापालट झाला. शौचालये, पाणी, वीज, स्वच्छता, परसबाग, खेळाचे मैदान या सुविधांची उपलब्धता ग्रामपंचायत स्तरावरून तसेच पालक, समाज सहभाग यातून सहज शक्य आहे. पालकांच्या सक्रिय सहभागामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढ होते. शिक्षकही तिथे आनंदाने काम करतात.

एक चांगली कार्यसंस्कृती यातून उभी राहते. कार्यसंस्कृती उभी राहिली की काय बदल होतो याचे शेगाव हे उत्तम उदाहरण आहे. शेगाव येथील गजानन महाराज मंदिर संस्थानाचा राज्यात स्वच्छतेच्या बाबतीत नावलौकिक आहे. शेगाव येथे गेल्यावर स्वच्छतेचे नियम न पाळणारी व्यक्ती जेव्हा संस्थान परिसरात जाते तेव्हा स्वच्छतेचे नियम पाळते.

याचे कारण तेथील कार्यसंस्कृती. प्रत्येक गावाने शाळेची अशी शैक्षणिक कार्यसंस्कृती उभी केल्यास शाळा आणि गाव यांचे नाते घट्ट होईल. अशा ठिकाणी ना शिक्षकांची गावाविषयी तक्रार असेन ना गावाची शिक्षकांविषयी. गावाचा शाळेला आधार आणि शाळेला गावाचा अभिमान असावा. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान कागदावर न राहता प्रत्येक गावाने सक्रिय सहभाग घेऊन यशस्वी केले तरच शाळांचा कायापालट होईल.

माजी विद्यार्थी स्नेहमिलने

शालेय जीवनात सोबत शिक्षण घेतलेले वर्गमित्र एकत्र येऊन शाळांमध्ये स्नेहमिलने घेत आहेत. बालपणीच्या रम्य आठवणी आणि शाळेप्रति कृतज्ञता असा दुहेरी संगम असलेली ही स्नेहमिलने असतात. आज शहरात राहणारे मध्यमवर्गीय नोकरदार, अनेक उच्चपदस्थ यांचे शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत आणि नंतर खासगी अनुदानित शाळेत झालेले आहे.

कारण त्या काळी आजच्या सारखा शिक्षणाचा ‘बाजार’ नव्हता. प्रत्येकाचे कृतज्ञतापूर्व भावबंध शाळा आणि शिक्षकांशी आहे. चांगल्या रोजगाराची, चांगले जीवनमान जगण्याची संधी शिक्षणामुळे मिळते. आपल्या जीवनाला आकार शाळा आणि शिक्षकांमुळेच मिळाले हेच या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमातून दिसून येते.

आपण शिकलो त्या शाळेच्या, गावाच्या विद्यार्थ्यांना देखील चांगले शिक्षण मिळावे यासाठी अशा स्नेहमिलनाच्या कार्यक्रमातून शाळेला आवश्यक भेटवस्तू दिल्या तर तेथील शिक्षक, विद्यार्थी यांचा उत्साह वाढेल. स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वतीने बक्षिसे दिल्यास गावातील मुलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

केवळ भौतिक सुविधाच नाही तर आपली मुले शिकतील यासाठी शिक्षक, पालक आणि समाज यांच्यात सुसंवाद असावा लागतो. केवळ महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होत नाही. जागतिक दर्जाची शाळा आणि शिक्षण प्रत्येक शाळेत देणे शक्य आहे. प्रत्येकाला शिक्षण हा प्राधान्याचा विषय वाटला की हे आपोआप होईल.

एकविसाव्या शतकातील समस्या व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षणच उपयोगी ठरणार आहे. शिक्षणातून चिकित्सक, सर्जनशील, निर्णयक्षम, समस्या निराकरण करणारे, सामाजिक, नैतिक, भावनात्मक क्षमतांचा विकास झालेले विद्यार्थी घडतात. यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक आणि समाज या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाची गरज आहे. जागतिक दर्जाची शाळा आणि जागतिक दर्जाचे शिक्षण प्रत्येक गावाच्या शाळेतून मिळण्यासाठी कटिबद्ध होऊया.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT