Pandaba
ॲग्रो विशेष

Rural Story : गावगाड्यातून कायमचीच हद्दपार होईल पांडोबाची हलगी ?

शाहिराचा जन्म नक्की कधीचा हे त्यालाच माहिती नाही. पण ‘आमच्या वेळी अख्ख्या जिल्ह्यात कराडला अलेक्झांडर नावाचा एकच डॉक्टर होता!' असं पांडोबा जेव्हा सांगतो तेव्हा शाहिरानं केवढी मोठी दुनिया पहिली असेल त्याची कल्पना येते.

टीम ॲग्रोवन

लेखक- ज्ञानदेव पोळ 

पांडोबा शाहीर हलगी वाजवायचाच तसा. पांडोबाची हलगी वाजली की देवळात झोपलेला देवसुद्धा जागा व्हायचा, इतकी अप्रतिम हलगी वाजवायचा शाहीर. गावात जुन्या नव्या पिढीला पांडोबाची खरी ओळख शाहीर म्हणूनच. शाहिराचा जन्म नक्की कधीचा हे त्यालाच माहिती नाही. पण ‘आमच्या वेळी अख्ख्या जिल्ह्यात कराडला अलेक्झांडर नावाचा एकच डॉक्टर होता!' असं पांडोबा जेव्हा सांगतो तेव्हा शाहिरानं केवढी मोठी दुनिया पहिली असेल त्याची कल्पना येते. जुन्या वडाच्या झाडासारखाच गावगाड्याचा साक्षीदार आहे शाहीर. गावकुसाबाहेरच्या मांगवाड्यातला शेवटचा जुना माणूस आहे शाहीर. जुन्या कला टिकल्या पाहिजेत म्हणून लाखभर खर्चून आणलेल्या एखाद्या लग्नाच्या बँडमध्ये शिरून बोटं फुटेपर्यंत हलगी बडवून वरात दणाणून सोडाणारा वल्ली आहे शाहीर.

यात्रा जत्रांच्या काळात पांडोबा शाहीर कुस्तीच्या मैदानात पैलवानांना हलगीवर वाजवत आणायचा. कुस्ती निकाली झाली कि पुन्हा घुमायची पंडोबाची हलगी. प्रत्येक दसर्याला अंबिकेच्या शिलंगनात वर्षानुवर्षे त्याची हलगी घुमणारच. बेंदराच्या सणाला तर सार्या गावभर पांडोबाचीच हलगी आणि सजलेले बैल. गावात कुणाचं लग्नकार्य असलं की पांडोबाची हलगी नाचत गल्ली-बोळात कडाडणारच. मिळेल त्या सुपारीवर त्याची हलगी वाजणार. एखाद्या गरीब घरच्या पोरीच्या लग्नात नुसत्या नारळ-सुपारीवर पांडोबा वाजवणार. यात्रा-जत्रात तर थांबायचीच नाही पांडोबाची हलगी. मध्येच झाला कमी ताल तर रस्त्यातच पाचट पेटवून द्यायचा शाहीर. डांगचिकीsss नांगsss नांगsss करीत पुन्हा नव्याने कडाडायची पांडोबाची तापलेली हलगी. नव्याने आपटायची हलगीवर रक्तानं गच्च भरलेली बोटं. कुणी नवीन घर बांधलेलं असायचं तर कुणाच्या नवीन विहिरीला लागलेलं पाणी देवाला घालायचं असायचं, जिथं तिथं असणारच पांडोबाची हलगी. ती वाजवताना कित्येक प्रकारचे आवाज काढायचा शाहीर. हलगीशिवाय गत्यंतरच नसायचं गावाला. हलगी नसली की वाटायचंच नाही शुभकार्य पार पडल्यासारखं. 

चैत्रात जोतिबावर मोठी यात्रा भरते. हजारो सासनकाठ्यांची मिरवणूक निघते. गुलाल- खोबऱ्याची उधळण होते. दरवर्षी या सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत पांडोबाची हलगी वाजणारच. बावीस इंची सायकलवर पुढच्या बाजूला अडकवलेली हलगी घेऊन दरवर्षी पांडोबाची सायकल जोतिबा डोंगर चढायची. एका यात्रेत तर विजा- वाऱ्यांचा नुसता कल्लोळ उठलेला. सासनकाठ्यांची मिरवणूक निघालेली. तशाच मध्येच डोंगरावर गारांचा पाऊस झोडपून काढत होता. लोकांची डोंगरावर दैना उडालेली. पण पांडोबाला त्याची काय फिकीर. सकाळपासून सलग बारा तास गावाच्या सासनकाठ्यापुढं पांडोबाची हलगी कडाडत होती. बोटं आपटत होती. त्याचे भिंगरीसारखे नाचणारे पाय जमिनीला टकरा घेत होते. हलगी बडवून बडवून त्याची बोटं रताळागत सुजू लागली. मग मात्र गर्दीतून त्याला हलगी बंद करण्याचं फर्मान सोडलं गेलं. पण "मेलो तरी बेहत्तर देव आज ठिविल नाही तर मारील!’ असं पांडोबा गर्दीलाच सांगू लागला.

पांडोबा शाहीर केवळ हलगीच वाजवायचा नाही तर काका आणि चंदू नाईकाला सोबत घेऊन गावोगावी मोरांग्या नाचवायचा. भिंगरीसारखी सायकलवरून दुनिया पालथी घालायचे. मुंबई पर्यंत जायचे. लालबाग परळ भागातल्या चाळीत मोरांग्याचे शो सादर करायचे. चंदू नाईक आणि काका वेगवेगळी सोंगं करून दाखवायची. माणसं हसून हसून बेजार व्हायची. खिसा भरून बक्षिसे मिळायची. पांडोबा शाहीर पोवाडे म्हणायचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची "माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतीया काहिली!’ ही रचना हलगीवर बोटं आपटत अशी सादर करायचा की बघणाऱ्याला दूरच्या मैनेची आठवण आल्यावाचून राहायची नाही.

पांडोबा गरिबीत जन्मला, गरिबीत वाढला, गरिबीतच जगला. हलगी बडवून बैत्याच्या मिळणाऱ्या धान्यावर त्याचं पोट अवलंबून. ते जिवंत ठेवण्यासाठी तर त्याने अनेक उद्योग केले. पण आयुष्यात कधी हार मानली नाही. गावाच्या बाजूने असलेल्या ओढ्या वगळीनं दाट गचपणात पांडोबा भर उन्हाचा घुसायचा. विळ्या कोयत्यानं कचाकचा घायपात तोडायचा. त्याचे बारीक काप करून नदीतल्या डोहात भिजवाण घालायचा. तयार झालेला घायपाताचा वाक गोळा करून गावाबाहेरच्या माळावर बायकोसोबत लाकडी फिरक्या हातात घेऊन दोरखंड वळायचा. कासरे, वेसण, चाबकाचे गोंडे बनवायचा. आठवडी बाजारात नेऊन विकायचा. बेंदराच्या सणाला गावाच्या घरांना आंब्याची तोरणं आणि बैलांच्या गळ्यात वाकाचं गोंडं बांधायचा. पांडोबा केरसुणी तर असा बांधायचा की दोन-दोन वर्षं केरसुणी तुटणार नाही. इतकंच नाही, तर आयुष्यभर पांडोबानं साऱ्या गावाची लाकडं फोडली. 

मागच्या आठवड्यात यात्रेला गावी गेलेलो. ठरवून शाहिराला भेटायचं ठरवलं. सकाळ सकाळीच शाहिराच्या दिशेने पावलं आपोआप वळली. सकाळची कोवळी उन्हं उघड्या अंगावर घेत शाहीर पिपर्णीच्या झाडाबुडी टेकलेला. एकटाच... अबोल. तो रोजच तिथं पत्र्याच्या शेडमध्ये बसून असतो. त्याला सकाळी तिथंच एखादी भाकरी आणि डब्यातून वाटीभर आमटी येते. शंभरीकडे निघालेला आणि अजून दाताने सुपारी फोडणारा शाहीर डोळ्याने सगळी गावची माणसं ओळखतो. त्याच्या जवळ जाऊन बसलो. नव्या-जुन्या गोष्टी उकरून काढल्या. बरेच दिवस अबोल होऊन मुका बसलेला शाहीर थांबायचं नावच घेईना. इतकं बोलायचं असतं त्याला, कोणाला तरी गोष्टी जुन्या सांगायच्या असतात त्याला, पण आपली हलगी बडवायला पुढं कोणीच नाही याची खंतही असते त्याला. नवी पिढी वाजवायलाच तयार नाही हलगी... मानायलाच तयार नाही पारंपरिक कला... शाहिराला नव्याची प्रचंड चीड आहे. जुन्यावर त्याचं आजही तितकंच प्रेम आहे. नव्या गोष्टी एक दिवस गावाचा घात करणार आहेत, असं शाहीर छातीवर हात ठेवून सांगतो. त्याचं खरं की खोटं हे येणारा काळच ठरवेल. पण शाहीर बोलायला लागला की ऐकतच बसावंसं वाटतं. जुन्या झाडासारखाच शाहीर गावगाड्याचा साक्षीदार. शेवटी निघताना राहवेना म्हणून विचारलंच, "अजून हलगी वाजवू वाटते का शाहीर?" पुन्हा इतक्या वर्षांनंतर तेच शब्द कानावर पडले, "देव आता ठिविल नाही तर मारील! पण या साली गावच्या यात्रेत हलगी वाजवणारच बघ!’ पण बसल्या जागी अंगाने लटपटणारा शाहीर शरीराने कुठे आता तरुण राहिला होता. पण बोलण्यात मात्र तीच ऊर्जा होती अजून. 

चार दिवसांत गावची यात्रा भरली. या यात्रेतही जोतिबाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक निघते. गुलालाची उधळण होते. पण या गुलालाची आपल्या त्वचेला अॅलर्जी असल्याने लांबून लांबूनच यात्रेत तरंगत होतो. गर्दीला टाळत होतो. सासनकाठ्यांची मिरवणूक आता रंगात आली होती. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी ठेका धरला होता. सासनकाठ्या आणि देवाच्या पालखीला अंगाखांद्यावर घेऊन वर्षभर वाट पाहणारी गावाची शरीरं आनंदाने नाचत होती. चांगभलंचा गजर घुमत होता. आणि अचानक मधूनच कुठून तरी गर्दीत हलगी कडाडल्याचा आवाज येऊ लागला. वाटलं कोणी तरी नवीनच हलगीवाला वाजवत असेल. थोडंसं दुर्लक्षच केलं, पण काही केला हलगीचा हा ‘डांगचिकीsss नांगsss नांगsss’ आवाज पिच्छा सोडेना. तसाच अंधारातून गर्दीत घुसलो. गर्दीत घुसल्यानं गुलालाची अंघोळ झाली. हलगी वाजवणाऱ्यापाशी पोहोचलो, तर नाचत बडवत ती व्यक्ती क्षणात पाठमोरी झाली. धोतर पटका नेसलेली एक म्हातारी व्यक्ती हलगी दणाणून सोडत होती. पाठीमागून पुढच्या बाजूला गेलो, हलगी वाल्याचं तोंड न्याहाळलं. डोळ्यावर विश्वासच बसेना... शंभरीकडे निघालेला आणि थरथर कापत रोज सकाळी झाडाबुडी बसणारा पांडोबा शाहीर गावच्या यात्रेत बेधुंद होऊन हलगी बडवत होता. अगदी पूर्वीसारखाच. तोच उत्साह. तीच गच्च काठोकाठ भरलेली ऊर्जा.

माणसाला जगण्यासाठी कोणत्या तरी श्रद्धा असाव्या लागतात. नाहीतर निदान कोणत्यातरी प्रेरणा असाव्या लागतात. शाहीराच्या अश्या जगण्याच्या प्रेरणा तरी नेमक्या कोणत्या असतील? आणि नसतील तर तो मला न कळणाऱ्या अशा कोणत्या बळावर अजून तग धरून हलगी वाजवत असेल? कळतच नाही काही... मिळतच नाही उत्तर!

आता न चुकता सकाळी दिवस उगवायच्या आधीच पिपर्णीच्या झाडाला टेकून बसून असतो पांडोबा शाहीर. तो पहिल्यासारखा आता कुणाशी बोलत नाही. अबोल असतो. लोकांनाही वाटतं शाहीर आता मुका झालाय. शाहिरीचा काळ संपलाय. माणूस बसला की संपला. पण गावकुसाबाहेरच्या शेवटच्या वस्तीवर अजूनही कुडाच्या घरात किड्या मुंगी सारखी वळवळ करणारा शाहीर खरंच मुका झाला असेल? की घात करणाऱ्या नव्या माणसापासून ठरवून मुका बनला असेल? पांडोबाला अजून हलगी सोडू वाटत नसेल की हलगीला पांडोबा? शंभरीकडे निघालेल्या पांडोबाची अखेरची थाप नेमक्या कोणत्या दिवशी हलगीवर पडेल? तो दिवस गावगाड्याच्या इतिहासात अजरामर होईल की फक्त पांडोबाच्या घरापुरताच? पुढच्या येणाऱ्या नव्या पिढ्यांना गावगाड्यातला पांडोबा शाहीर ही एक दंतकथाच वाटेल का? त्यांना ते काहीही वाटो? त्यांच्याशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही. पण मला ही काळजी आहे की पांडोबाची माती झाल्यानंतर त्याच्या हलगीचं पुढं काय? होईल का निर्माण हलगीला नवा वारस? की गावगाड्यातून कायमचीच हद्दपार होईल पांडोबाची हलगी...?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT