Monsoon And Politics
Monsoon And Politics Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon IMD: मॉन्सून आणि राजकारण यांचा संबंध काय ?

सुनील तांबे

मॉन्सून (Monsoon) आणि राजकारण (Politics) यांचा जवळचा संबंध आहे. भारतातील वैशिष्ट्यपूर्ण मॉन्सून, इथला भूगोल आणि  पीकपध्दती यामुळे इथल्या समाजमनाची विशिष्ट अशी घडण झाली आहे. मॉन्सून हा केवळ पाऊसपाणी आणि शेतीपुरता मर्यादीत विषय नाही. तर व्यापार, पंरपराप्रियता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक ताणेबाणे, राजकीय प्रक्रिया या सगळ्यांमध्ये मॉन्सून महत्त्वाची भूमिका बजावत असतो.  

मॉन्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दावरून आला. अरब दर्यावर्दी होते. त्यांच्यासाठी मौसिम म्हणजे हंगामी वारे. वर्षातून दोन वेळा दिशा बदलणारे वारे हा मॉन्सूनचा शास्त्रीय अर्थ. भारतीयांसाठी मॉन्सून म्हणजे पावसाळा. कारण ह्या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. पाऊस आकाशातून येतो म्हणून भारतीयांनी त्याचा संबंध नक्षत्रांशी जोडला आणि त्याआधारे ठोकताळे लावले. हवामानाचा संबंध त्यामुळे आपण नक्षत्रांशी आणि वैयक्तिक वा सामुहिक अनुभवाशी लावतो.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department- IMD)  देशाचे ३६ उपविभाग केले आहेत. परिसराची भौगोलिक रचना आणि तिथे पडणारा पाऊस यानुसार हे उपविभाग केले आहेत. पावसाचं प्रमाण आणि भौगोलिक रचना यानुसार त्या परिसरातील जलचक्र निश्चित होतं, तिथली पिकं आणि व्यापारी मार्ग निश्चित होतात, मासेमारी व पशुपालनाचं चक्र, पशुपालकांचे स्थलांतराचे मार्ग आणि काळ निश्चित होतो. त्यानुसार स्थानिक अर्थव्यवस्था आणि समाजरचना व समाजजीवन आकार घेतं. त्यामुळे प्रत्येक प्रदेशाची केवळ भाषा-संस्कृतीच वेगळी नसते तर राजकीय विचाराचीही जडण-घडण होते.  

स्वतंत्र भारतात भाषावार प्रांत रचना करण्याचा निर्णय झाला. परंतु १९७० नंतर निर्माण होणारी राज्यं भाषेच्या आधारावर होत नसून हवामानशास्त्र विभागाने केलेल्या उपविभागांनुसार निर्माण होत असल्याचं ध्यानी येईल. उदाहरणार्थ झारखंड हा उपविभाग आधीपासूनच होता. हवामानशास्त्र विभाग त्याला पूर्वी छोटा नागपूर म्हणत असे. हवामानवृत्तात तटवर्ती आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि रायलसीमा असा हवामानाचा अंदाज पूर्वीपासून दिला जायचा. बंगालची विभागणी दोन उपविभागांमध्ये करण्यात आलीय. सबहिमालयन वेस्ट बेंगाल आणि गँजेटिक वेस्ट बेंगॉल. दार्जिलिंग भागातच स्वतंत्र गोरखा लँण्डचं आंदोलन उभं राह्यलं होतं हे आपण जाणतो. महाराष्ट्रात चार उपविभाग आहेत. गोवा आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा. स्वतंत्र विदर्भाची मागणी जुनीच आहे त्यामध्ये अलीकडे मराठवाड्याचीही भर पडली. मॉन्सून आणि भूगोल यांच्यामुळे भारतातील राजकारण आकार घेतं.

भारताचं जिओपॉलिटीक्स वा भूराजकीय सामरिक नीती, सर्वधर्मसमभाव, परंपराप्रियता आणि राजकारण हे मॉन्सूनचं चतुर्विध रुप भारतीय उपखंडाच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलामुळे निर्माण झालं आहे. आधुनिक विचाराची मांडणी करणार्‍यांना डाव्या वा उजव्या राजकीय प्रवाहांना मॉन्सूच्या या चतुर्विध रुपाचं आणि देशाच्या भूगोलाचं पुरेसं भान नाही.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT