डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
गावात पाणलोट कार्यक्रम राबवला जात असताना त्यात गावातील प्रत्येकाचाच सहभाग निश्चित करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. त्याला ग्रामीण सहभागीत्व असे म्हणतात. ते वाढविण्यासाठी वापरावयाच्या तंत्राची माहिती आपण गेल्या भागापासून घेत आहे. या भागामध्ये पाणलोट कार्यक्रमाविषयी विचार मंथन या तंत्राविषयी जाणून घेऊ.
कोणत्याही पाणलोट विकास कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्र उपचारांव्यतिरिक्त त्या गावातील मत्ताहीन, मजूर, अल्पभूधारक, गरीब अशा प्रवर्गासाठी निधी राखून ठेवावा लागतो. तशी तरतूद मार्गदर्शक सूचनांमध्ये केलेली असते. वेगवेगळ्या घटकांवर खर्च होणाऱ्या निधीची माहिती एकाच तक्त्यात उपलब्ध होते. येणाऱ्या खर्चाची विगतवारी तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या घटकांवर खर्च करण्यात येते.
याकरिता उदाहरण म्हणून तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) गाव डोळ्यासमोर ठेवू. या गावचे एकूण भौगोलिक क्षेत्र २५९६ हेक्टर असून, त्यापैकी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये १००० हेक्टर क्षेत्रावर प्रति हेक्टरी रुपये १५ हजार प्रमाणे पाणलोटसंबंधी उपचार केले जाणार असे मानू. हा दर प्रकल्पातील तरतुदीनुसार ठरलेला असतो. त्यानुसार या गावांत रु.१ कोटी ५० लाख इतका निधी पाणलोट उपचार व उपजीविका सक्षमीकरणासाठी मंजूर होईल. या उपलब्ध झालेल्या निधीचे वर्गीकरणासाठी तक्ता १ पहा.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये घटक निहाय आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार निवडलेल्या गावांमध्ये खर्च करण्यात आला आहे. त्यात तिथे कार्यरत पाणलोट समिती, प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा (शासकीय/ बिगर शासकीय) यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.
या कार्यक्रमातील एका उद्दिष्टानुसार गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी व मत्ताहीन लोकांसाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनुक्रमे १० टक्के आणि ९ टक्के असा एकूण १९ टक्का इतका निधी या प्रकल्पात राखीव ठेवला होता. त्याची माहिती वरील तक्त्यांमध्ये दिली आहे. हा निधी त्या त्या वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वापरण्याबाबत नमूद केलेले आहे.
अशाच प्रकारे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये संबंधित गावासाठी मंजूर झालेला निधी गावाच्या दर्शनी भागामध्ये एका तक्त्याच्या स्वरूपामध्ये मांडणे गरजेचे असते. लाभार्थ्यांच्या त्या त्या गटामध्ये गावातील किती कुटुंबे येतात, याबाबत ग्रामसभेमध्ये विचारमंथन करणे आवश्यक असते. त्यातून एक प्रकारची पारदर्शकता येते. सर्व गावकऱ्यांना त्याबाबत आपुलकी वाटते. त्या वर्गासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी किती निधी वापरला जात आहे, याची तपासणी कोणालाही करता येते. त्यामुळे कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर असून, त्यानुसार गावातील कामे व लाभार्थ्यांना लाभ मिळत आहेत, हे कोणालाही तपासता येते. या प्रक्रियेमुळे गावातील उपलब्ध निधी कोणालाही न डावलता शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते. पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची उद्दिष्टे साधणे शक्य होते.
तंत्र ः गावाचा इतिहास (Time Line)
काळाच्या ओघामध्ये गावामध्ये अनेक बदल घडत जातात. काही बदल हे जाणिवपूर्वक घडवलेले असतात. अशा सर्व सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शेती आणि उपजीविकेच्या साधनांमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास करून त्याची मांडणी करता येते. त्यासाठी आवश्यक तिथे गावातील वयस्कर ग्रामस्थांशी चर्चा करून माहितीचे संकलन करावे.
ही मांडणी लोकांना समजेल अशा भाषेमध्ये, थोड्याशा चित्रांमध्ये, तक्त्याच्या स्वरूपामध्ये सार्वजनिक ठिकाणी लावावी. त्याचे वाचन सर्वांसोबत ग्रामसभेमध्ये करून त्याविषयी अनुकूल वातावरण निर्माण करावे. या मांडणी पांढऱ्या कागदावर रंगीबेरंगी पेनच्या साह्याने तक्त्यामध्ये रेखाटलेली असल्यास लोकांना आकर्षक वाटेल. हाच तक्ता पुन्हा जमिनीवर रांगोळीद्वारे रेखाटावा.
माहिती उपलब्ध करतानाच्या प्रक्रियेमध्ये ग्रामस्थांशी सतत चर्चा करणे, त्यांचे अपेक्षेनुसार बदल करणे यासाठी लवचिक राहावे. आवश्यक तिथे तपासणी सूचीचा वापर करावा. माहितीमध्ये सामान्यतः लोकसंख्या, अन्न, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पर्जन्य, जंगलांची स्थिती, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, जलसंसाधने, मिळणारी मजुरी इ. गोष्टी मांडाव्यात. त्यात काही माहिती संख्यात्मक असेल, तर काही माहिती गुणात्मक असेल. त्यातून गेल्या ६० -७० वर्षांमध्ये गावांत कोणते बदल झाले हे स्पष्ट झाले पाहिजेत.
गाव इतिहास समजावून घेताना गावातील सर्व स्तरातील लोक उदा. विद्यार्थी, तरुण वर्ग, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत आजीमाजी सदस्य, आजीमाजी सरपंच व अन्य पदाधिकारी, वयोवृद्ध मंडळी उपस्थित असावीत. त्यातून. कालानुरूप गावातील झालेल्या बदलांबाबत चर्चा होते. काही आश्चर्यजनक बाबी लक्षात येतात.
उदा. गावाच्या लोकसंख्येमध्ये झालेले बदल, पिकांमधील बदल, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, स्वच्छता, पावसाची बदललेली परिस्थिती (कमी अथवा जास्त), परिसरातील जंगलांची स्थिती व त्यामधील बदल, झाडांमधील बदल, शैक्षणिक प्रगती, कालानुरूप बदललेल्या आरोग्य व्यवस्था, जलसंधारणासाठी केले गेलेले प्रयत्न, गावातून बाहेर होणारे हंगामी/कायमस्वरूपी झालेले स्थलांतर, गरिबीची स्थिती इ.
शेजारी तडसर या गावचा असा तक्ता दिला आहे. तो गावातील सार्वजनिक ठिकाणी लावल्यास ग्रामस्थांमध्ये याबाबत चर्चा घडून येतात. त्यात दिसणाऱ्या समस्या सोडविण्याची इच्छा व प्रेरणा निर्माण होते. त्यातूनच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन (म्हणजेच पाणलोट क्षेत्र विकास कामांप्रति) जागरुकता निर्माण होते. त्यानंतर गावाच्या सद्यःस्थितीतील गरजा कोणत्या व त्या कशा प्रकारे पूर्ण करता येतील, या दृष्टीने विचारमंथनाद्वारे आपण विकास आराखडा तयार करू शकतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.