Nanded News : तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र पाच टक्यापेक्षा कमीच असल्यामुळे शेतकऱ्यांचा सर्व जोर खरीप व रब्बीतील पीक घेण्यावर असतो. उन्हाळ्यातील सिंचन सुविधांच्या कमतरतेपायी तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आतापर्यंत ४ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ९०.०७ असून, येत्या १५ मार्च अखेर अंतिम पीक पेरणी अहवाल प्राप्त होईपर्यंत या आकडेवारीत थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात बोधडी, जलधरा, इस्लापूर, शिवणी, दहेली, मांडवी, उमरी बाजार, सिंदगी मोहपूर व किनवट अशी ९ महसूल मंडळे असून, तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ५६ हजार २३२.९२ हेक्टर आहे. तालुक्याचे उन्हाळी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार १७४ हेक्टर असूनसुद्धा गत वर्षी ७ मार्चपर्यंत १० हजार २८० हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती.
यंदा मात्र त्यात घट झाली असून, आतापर्यंत ४ हजार ६६० हेक्टरवर उन्हाळी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. तालुक्यात यंदा तृणधान्यामध्ये आतापर्यंत उन्हाळी भात केवळ ७ हेक्टरवर पेरला गेला असून, त्याचे सरासरी क्षेत्र ९३ हेक्टर आहे. उन्हाळी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ हजार ६७६ हेक्टर असून, यंदा १ हजार २८० हेक्टरवर त्याची पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ७६.३७ येते.
उन्हाळी मका पिकासाठीचे सर्वसाधारणक्षेत्र ९२७ हेक्टर असून,त्याची सरासरीपेक्षा अधिक अर्थात ९७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १०५.५० येते. चारापिकांमध्ये उन्हाळ्यातील ओल्या चाऱ्यासाठी ज्वारी १२९ हेक्टरवर, तर मका ८६ हेक्टर पेरल्या गेला आहे. कडधान्यामध्ये उन्हाळी मुगाची पेरणी केवळ ४ हेक्टरवर झालेली आहे.
तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी उन्हाळी हंगामासाठी गळीत धान्य पेरणीवर जोर दिला असला तरी सरासरीपेक्षा त्याचे क्षेत्र अजूनतरी कमीच आहे. उन्हाळी भुईमुगासाठीचे सरासरी क्षेत्र १ हजार ४७१ हेक्टर असून, त्याची आतापर्यंत ८१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
त्याची टक्केवारी ९२.१४ येते. बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली असून, त्याचे सरासरी क्षेत्र २१ हेक्टर आहे ; पेरा मात्र केवळ १६ हेक्टरवर झालेला आहे. सूर्यफुलाच्या लागवडीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी गत पाच-सात वर्षापासून पूर्णत: पाठ फिरवली आहे.
उन्हाळी तिळाचा मात्र बऱ्यापैकी पेरा झाला असून, त्याचे सरासरी क्षेत्र ९८४ हेक्टर असताना, ९१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ९२.४८ येते. या शिवाय नगदी पिकांमध्ये केळी १४ हेक्टर, ऊस १०७ हेक्टर, टरबूज ८ हेक्टर, धने ३ हेक्टर, मिरची ४२ हेक्टर आणि विविध प्रकारचा भाजीपाल्याची २५९ हेक्टरवर लागवड झाली आहे. १५ ते २० मार्चपर्यंत उन्हाळी पिकांची पेरणी चालू राहणार असून, अंतिम पीक पेरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तालुक्यातील उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरणीचे चित्र स्पष्ट होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.