Kolhapur Heavy Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Heavy Flood : कोल्हापूर शहरात ४५ फुटांवरच घुसलं पाणी, महापूर येण्यास मूळ कारण काय?

Panchaganga River : पंचगंगा नदीच्या पुरासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने २०२१ च्या महापुरातील ज्या-त्या पूरपातळीला कुठे पाणी येते याची यादी तयार केली.

sandeep Shirguppe

Kolhapur Flood Water Level : कोल्हापूरच्या इतिहासात सर्वात मोठा समजणाऱ्या २०२१ च्या पंचगंगेच्या महापुरात ज्या पाणीपातळीला शहराच्या काही भागात पूर आला, त्या भागात यावेळी एक ते तीन फूट आधीच पाणी घुसले आहे. त्याला पूरक्षेत्रात विविध कामांसाठी टाकण्यात आलेले भराव व मोठ्या प्रमाणावर झालेली बांधकामे सहायभूत ठरत असण्याची शक्यता आहे. या बांधकामांमुळे पाण्याची जागा व्यापली गेल्याने त्या पाण्याचा दाब इतरत्र तयार होत आहे. त्यातून पूर्वीच्या पातळी अगोदरच येत असलेल्या पुरामुळे स्थानिक नागरिकांचे तर्क फोल ठरत असून नियोजनात गोंधळ उडत आहे

पंचगंगा नदीच्या पुरासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने २०२१ च्या महापुरातील ज्या-त्या पूरपातळीला कुठे पाणी येते याची यादी तयार केली आहे. त्याआधारे यंदाही दलाने वाटचाल चालवली होती. पण शिंगणापूर रस्त्यावर येत असलेल्या पाण्यापासूनच त्याची सुरुवात झाली. दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या पुरावेळीही कमी पातळीला रस्त्यावर पाणी आले. यावेळीही तोच कित्ता गिरवला आहे.

कदाचित एका भागात परिणाम झाला असेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण कसबा बावडा ते शिये हा रस्ता ४५ फूट पाणी पातळी झाल्यानंतर बंद व्हायचा तो रस्ता ४२ फूट पातळीलाच बंद झाला. तब्बल तीन फूट अगोदरच रस्ता पाण्याखाली गेला. यामुळे यंदाचा पूर पूर्वीच्या पातळीपेक्षा लवकर येऊ लागला असल्याचे स्पष्ट होत होते.

धोका पातळीनंतर विविध नागरी वस्तीत पाणी शिरते. त्यावेळीही जवळपास एक फूट अगोदरच पाणी आले. व्‍हिनस कॉर्नर परिसर या जयंती नाल्यालगतच्या परिसरात २०२१ च्या आकडेवारीनुसार ४६ फूट पाच इंचाला पाणी येते. पण यावेळी ४५ फूट दोन इंचावरच पाणी आले. त्यानंतर ४७ फूट पाणी पातळीनंतर ज्या भागात पाणी येते, तिथे तर ४५ फूट सहा इंचापासूनच पाणी यायला सुरूवात झाली. त्यात पंचगंगा तालीम परिसर, शाहूपुरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत, मलयगिरी अपार्टमेंट, कसबा बावडा रेणुका मंदिर या भागाचा समावेश होता. पूर्वीचा अनुभव असलेले नागरिक या अगोदरच आलेल्या या पुरामुळे गोंधळून गेले आहेत. लवकर पाणी आल्याने त्याच्या नियोजनासाठी गडबड उडाली आहे.

पूरक्षेत्रातच होताहेत विकासकामे

पावसाचा जोर, राधानगरीसह विविध धरणांतील विसर्ग, कळंबा तलावातून बाहेर पडून शहरातून पुढे जाणारे पाणी या साऱ्यांचा विचार करता पूर्वीप्रमाणेच आहे. तरीही लवकर पाणी येण्यास पूरक्षेत्रात होत असलेली विकासकामे कारणीभूत असल्याची चर्चा पर्यावरण अभ्यासक तसेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून होत आहे.

यासाठी ज्या विभागाकडे जबाबदारी आहे, त्यांच्याकडे संबंधित बांधकामाबाबत महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून पत्रव्यवहारही केला आहे. पूरक्षेत्रातील बांधकामे, त्यांच्यासाठी टाकलेले भराव यामुळे तेथील पाण्याची जागा गेली आहे. या पाण्याचा दाब इतरत्र वाढला गेला हेच शहरात आधीच आलेल्या पुरासाठी कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT