Vinay Hardikar with Sharad Joshi Agrowon
ॲग्रो विशेष

Vinay Hardikar : शेतकरी चळवळीतील विनय हर्डीकर

Journey of Vinay Hardikar : लेखक, समीक्षक, पत्रकार, शिक्षक-प्राध्यापक, शेतकरी चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते अशी बहुआयामी ओळख असलेले विनय हर्डीकर हे २४ जून २०२४ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्या निमित्ताने शेतकरी चळवळीतील त्यांच्या योगदानाला दिलेला हा संक्षिप्त उजाळा.

Team Agrowon

राजीव बसर्गेकर

Contribution to Farmer Movement : विनय हर्डीकर ‘इंडियन एक्स्प्रेस’ची नोकरी सोडून पूर्ण वेळ शेतकरी संघटनेचे काम करत होते, त्या काळातील हा प्रसंग आहे. ते शरद जोशींबरोबर दिल्लीला गेले होते. तिथे पत्रकार विनोद दुआ शरद जोशींची मुलाखत घेण्यासाठी येणार होते. जोशींना ऐनवेळी दुसरीकडे जावे लागल्याने त्यांनी आपल्या ऐवजी हर्डीकरांची मुलाखत घेण्यास सांगितले. तासाभराची मुलाखत झाली.

मुलाखतीनंतर विनोद दुआ हर्डीकरांना म्हणाले, ‘‘यार मुझे भी ऐसे कुछ आंदोलन मे शरीक होना है.’’ हर्डीकर यांनी त्यांच्यासमोर एक कोरा कागद ठेवला आणि म्हटले, ‘‘लिखो आपका इस्तिफा और शामिल हो जाओ.’’ दुआ काही काळ स्तब्ध झाले. हर्डीकर म्हणाले, ‘‘क्या हुआ? कन्विक्शन (खात्री) नही है, या करेज (धैर्य) नही है?’’ दुआ म्हणाले, की कन्विक्शन नही है. आणि मग स्वतःच म्हणाले, ‘‘सच कहूं तो करेज भी नही है.’’

विनय हर्डीकर यांचा शेतकरी चळवळीमधला सहभाग कसा सुरू झाला, त्यामागची त्यांची भूमिका काय असावी, त्याचे प्रतिबिंब या प्रसंगात दिसते. देशाच्या प्रश्‍नांबद्दलची कोणतीही चळवळ उभी राहिली असेल तर तिथे जायचे, निरीक्षण, अभ्यास करायचा आणि चळवळीतील व्यक्तींशी संवाद साधायचा; तो विचार पटला तर त्या चळवळीत स्वतःला झोकून द्यायचे, अशी त्यांची पद्धत होती.

याच पद्धतीनुसार त्यांनी महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या शेतकरी चळवळीचा वेध घेतला. हा विचार आणि चळवळ देशाच्या दारिद्र्याच्या प्रश्‍नावर निर्णायक घाव घालण्याची क्षमता असणारी आहे, याची त्यांना खात्री पटली आणि त्यांनी या चळवळीत स्वतःला झोकून दिले.

हर्डीकरांचा जन्म मुंबईच्या एका उपनगरामध्ये मध्यमवर्गीय घरातला. शालेय शिक्षण मुंबईत आणि त्यानंतरचे शिक्षण पुण्यात झालेले. त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांचा शेतीशी अर्थार्थी काही संबंध नव्हता. त्यांचे कोल्हापूरचे मामा हे इनामदार, काही शेतीवाडी असलेले.

त्यामुळे सुट्टीत आजोळी गावातील शेतकरी येऊन काय बोलतात, कसे बोलतात हे निरीक्षण एवढाच काय तो संबंध. पुढे ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिक्षक आणि कार्यकर्ते असताना १९७२ च्या दुष्काळात गावोगावी कूपनलिका तयार करण्याच्या मोहिमेत व्यवस्थापक म्हणून काम केलेले होते. त्यांना संगीत, साहित्याची आवड होतीच. साहित्यात असलेले शेतकरी जीवनाचे प्रतिबिंब याचे वाचनही चालू होते.

आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत आणीबाणीमध्ये सत्याग्रह आणि तुरुंगवास, तुरुंगातून बाहेर पडल्यावर निवडणुकीत जनता पक्षाच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभाग हे टप्पे होते. जनता पक्षाच्या राजवटीतच शेतकऱ्यांमधील असंतोष, शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस पेटवून देणे, चाकण आणि पिंपळगाव बसवंत येथे उभे राहिलेले कांद्याचे आंदोलन याकडेही ते डोळसपणे पाहत होते.

‘इंडियन एक्स्प्रेस'मध्ये फिरते पत्रकार (Roving Correspondent) ही जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांची शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशींशी ओळख झाली. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे २० सप्टेंबर १९८१ रोजी शेतकरी संघटनेचा एक मेळावा झाला. हर्डीकरांनी पत्रकार म्हणून खास व्यवस्थेने जाऊन नव्हे, तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर प्रवास करून या मेळाव्याला हजेरी लावली. त्यानंतर शरद जोशींबरोबर त्यांचा संवाद सुरू झाला.

हर्डीकरांनी सुरुवातीची तीन-चार वर्षे शेतकरी चळवळीत सहयोगी पत्रकार म्हणून योगदान दिले. या काळातच शेतकरी प्रकाशनाने शरद जोशी यांची ‘शेतकरी संघटना ः विचार आणि कार्यपद्धती’, ‘प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश’ आणि ‘भारतीय शेतीची पराधिनता’ ही पुस्तके प्रसिद्ध केली. या पुस्तकांचे पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशन व्हावे, असे ठरले. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना बोलावण्याचे घाटत होते. विनय हर्डीकर आणि पु. ल. देशपांडे यांची ओळख असल्यामुळे त्यांनी पु.लं.ना कार्यक्रमासाठी राजी करावे, असा प्रस्ताव त्यांच्याकडे आला.

हर्डीकर त्यावर म्हणाले, की पु. ल. देशपांडेंचा या विषयाशी काय संबंध आहे? आपण या कार्यक्रमासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांना बोलवावे, असे त्यांनी सुचवले. वि. म. दांडेकर आणि शरद जोशी हे त्या वेळी अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील प्रमुख द्वंद्व मानले जायचे. दांडेकरांची एकूण भूमिका लक्षात घेता त्यांना या कार्यक्रमासाठी पटवण्याचे आणि उभयपक्षी सन्मान राखून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याचे शिवधनुष्य हर्डीकरांनी उचलले. २० फेब्रुवारी १९८३ ही तारीख धरली. कार्यक्रम जोरदार झाला. प्रल्हाद पाटील कराड, माधवराव खंडेराव मोरे, वि. म. दांडेकर आणि शरद जोशी यांची भाषणे झाली. टिळक स्मारक मंदिराचे मोठे सभागृह ओसंडून वाहत होते. या कार्यक्रमातील भाषणांवर आधारित ‘शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र : खंडन-मंडन’ असे पुस्तकही निघाली.

देशात १९८४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीच्या हौतात्म्यामुळे सहानुभूतीची लाट होती. तरीही महाराष्ट्रामध्ये कॉँग्रेसच्या पुढाऱ्यांना गावबंदी आणि शेतीमालाच्या भावाच्या प्रश्‍नावर उमेदवारांना प्रश्‍न विचारणे हा कार्यक्रम दिसून आला. अनेक मतदार संघांत त्याचा प्रभाव पडला. वर्ध्यामध्ये वसंत साठे यांचे मताधिक्य २५ हजारांहून कमी होते, रामटेकमध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांना अनेक ठिकाणी प्रश्‍नांना सामोरे जावे लागले.

छत्रपती संभाजीनगर परिसरात साहेबराव पाटील डोणगावकर विजयी झाले. विनय हर्डीकर यांनी या निवडणुकीचे विश्लेषण ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये केले होते. या विश्‍लेषणातील ‘Sanghatana Factor' या उपशीर्षकाखालील दोन परिच्छेदांतून शेतकरी संघटनेचा प्रभाव हर्डीकरांनी देशभर पोहोचवला होता.

याच काळात फिरते पत्रकार म्हणून विनय हर्डीकर यांची चार प्रांतांत भ्रमंती चालू होती. महत्त्वाच्या चळवळींकडे त्यांचे लक्ष होते. संबंधितांशी प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू होत्या. छत्तीसगड मुक्ती मोर्चाचे शंकर गुहा नियोगी यांच्याशी हर्डीकरांची भेट झालेली होती. त्यांनी शंकर गुहा नियोगींचे काम प्रत्यक्ष जाऊन पाहिलेले होते.

अशा व्यक्तींची शरद जोशींबरोबर भेट झाली पाहिजे, काहीतरी देशव्यापी फळी उभी राहिली पाहिजे, हाही हर्डीकरांचा ध्यास होता. त्यांनीच शरद जोशी आणि शंकर गुहा नियोगी यांची भेट घडवून आणली. शरद जोशी १९८३ ते १९८८ या काळात शेतकरी संघटनांची आंतरराज्य समन्वय समिती तयार व्हावी, या प्रयत्नात होतेच. त्याचबरोबर भारतवादी गैरशेतकरी संघटनांची सुद्धा एक फळी तयार व्हावी असाही त्यांचा प्रयत्न होता.

या कामी विनय हर्डीकर यांचा फार मोठा हातभार होता. पुढे १९८५ मध्ये जेव्हा शेतकरी संघटनेची मोठी कार्यकारिणी तयार झाली, त्यात ‘इतर संघटना संपर्क’ या विभागाचे प्रमुख म्हणून विनय हर्डीकर यांचा कार्यकारिणीमध्ये अंतर्भाव झाला. गैरशेतकरी संघटनांच्या फळीमध्ये शंकर गुहा नियोगी, स्वामी अग्निवेश, सुरेंद्र मोहन, उत्तराखंड मुक्ती मोर्चाचे समशेर सिंह बिश्त, अरुण शौरी, आसाम गणपरिषदेचे कार्यकर्ते अशी बरीच मंडळी होती.

त्यांच्याशी हिंदी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधण्याच्या कामी आणि एकूणच ही फळी उभारण्यामध्ये हर्डीकर यांचा मोठा वाटा होता. शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये विविध बाजू मांडून चर्चा बहुरंगी करण्यावर हर्डीकर यांचा कटाक्ष असायचा आणि शरद जोशींना सुद्धा ते आवडत होते. कार्यकर्त्यांनी शरद जोशींना विचारलेही होते की विनय संघटनेचे नेमके काय काम करतो? त्यावर शरद जोशींचे उत्तर होते, ‘‘तो आपण शत्रू पक्षात सोडलेला माणूस आहे.’’

शेतकरी संघटनेचे कार्यक्रम, त्यांच्या प्रचाराचे साहित्य तयार करणे, नवनवीन घोषणा तयार करणे यावर ‘ब्रेन स्टॉर्मिंग' कायम चालू असायचे. त्यातही विनय हर्डीकर यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या आधीच्या आयुष्यातील ओळखी, संपर्क, त्यांच्याबद्दल असलेले विविध व्यक्तींचे प्रेम हे सर्व शेतकरी संघटनेसाठी त्यांनी उपलब्ध करून दिले.

हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग धोरणाचा निषेध करण्यासाठी १२ डिसेंबर १९८५ रोजी शिवाजी पार्क येथे कामगार नेते दत्ता सामंत आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राजीवस्त्र होळी' हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच सभा घेण्यात आली.

या वेळी बाबू गेनूंच्या महाळुंगे पडवळ या गावातून शिवाजी पार्कपर्यंत हुतात्मा ज्योतयात्रा काढण्यात आली. त्याचे संयोजन आणि नेतृत्व विनय हर्डीकर यांनी केले होते. १९८६ मध्ये चांदवड येथे अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन झाले. या अधिवेशनाची जागा ठरवणे, त्याचे प्रचार साहित्य तयार करणे, अधिवेशनाचे संयोजन या सर्वांमध्ये हर्डीकरांचा पूर्ण सहभाग होता.

हर्डीकरांनी १९८६ मध्ये इंडियन एक्सप्रेसचा राजीनामा दिला आणि पुढील काही वर्षे मुख्यत्वे करून शेतकरी संघटनेचे काम केले.

या काळात त्यांनी शेतीच्या अर्थशास्त्राबद्दल काय मांडणी करावी, यासंदर्भात शरद जोशी यांच्याशी चर्चा केली. शरद जोशींचे त्यावर उत्तर होते, ‘‘शेतकरी संघटना हा संपूर्ण विचार आहे. त्यामुळे अर्थशास्त्रच नव्हे, तर सर्व बाजूंनी त्याकडे बघता येईल. तू वाङ्‍मयाचा माणूस आहेस, वाङ्‍मयात ‘भारत - इंडिया’ दुभागणीचे काय प्रतिबिंब आहे हे तू बघू शकतोस, त्यावर बोलू शकतोस.’’ यानंतर विनय हर्डीकर यांनी ‘शेतकरी आणि साहित्य’ हा भाषण विषयच तयार केला.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या विषयावर त्यांची भाषणे झाली. ही भाषणे आणि शेतकरी संघटना विचाराची एक स्वतंत्र मांडणी इतकी लोकप्रिय होती, की शरद जोशींना जेव्हा कार्यकर्ते विचारायचे की तुम्ही उपलब्ध नसाल तर कोणाचे भाषण ठेवायचे, त्यावर शरद जोशी विनय हर्डीकर यांचे नाव सुचवायचे.

शेतकरी संघटनेने १९८६ मध्ये कापूस आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून ८ ते १२ डिसेंबर, १९८६ या काळात बाबू गेनू सप्ताह पाळण्यात आला. यावेळी चाकणला झालेल्या ‘रास्ता रोको’मध्ये विनय हर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत भाग घेतला होता आणि त्यासाठी त्यांना तुरुंगवासही झाला होता.

अनिल गोटे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असताना हर्डीकर यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या विभागाचे कामकाज त्यांच्याकडे होते. या जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटनेचे काम तुलनेने कमी होते. या जिल्ह्यांत प्रचंड भ्रमंती करून त्यांनी अनेक कार्यकर्ते, मित्र जोडले आणि संघटना वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

या सर्व कालावधीत विनय हर्डीकर यांचा राज्यभरातील शेतकऱ्यांशी संपर्क आला. ते अनेक शेतकरी कार्यकर्त्यांच्या घरातले एक सदस्य झाले आणि अजूनही हे ऋणानुबंध टिकून आहेत. यात वर्ध्याचे रवी काशीकर, कोपरगावचे भास्करराव बोरावके, परभणीचे ॲड. अनंत उमरीकर यांसारख्यांची तर घरे होतीच;

पण अनेक गरीब सामान्य कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांचीही घरे होती. बबन शेलार, मोहन उबाळे, शिवानंद दरेकर यांच्यासारख्या अनेकांच्या घरचेच ते झाले होते. शेतकऱ्यांचे अकृत्रिम प्रेम आणि जिव्हाळा हर्डीकरांच्या वाट्याला आला. कधी कुणा शेतकऱ्याच्या घरचे जेवण त्यांना आवडल्यावर, पुढच्या वेळच्या सभेला तो शेतकरी घरून जेवणाचा डबा घेऊन यायचा आणि सभेनंतर त्यांना तो द्यायचा.

विनय हर्डीकर यांची नंतरच्या काळामध्ये द्राक्षगुरू प्रा. श्री. अ. दाभोळकर यांच्याबरोबर मैत्री वाढली. दाभोळकरांचे प्रयोग आणि शास्त्रीय दृष्टिकोन यांचे मर्म त्यांनी जाणले होते. दाभोळकरांचे विचार इंग्रजीत येण्यासाठी त्यांचे ‘Plenty for all’ हे पुस्तक आकाराला येण्यामध्ये हर्डीकरांचा मोठा सहभाग होता.

आज शेतकरी संघटनेचे अनेक तुकड्यांत विभाजन झालेले आहे, नवीन काही आंदोलने उभी करण्याचेही प्रयत्न चालू आहेत, या सर्व ठिकाणी विनय हर्डीकर यांचे स्वागत असते; त्यांनी या प्रयत्नात योगदान द्यावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. हर्डीकर यांनी शेतकरी संघटनेवरती केलेले लेखन तटस्थ, निरपेक्ष चिकित्सा करणारे आहे. संघटनेचा प्रभाव बऱ्याच अंशी शाबूत होता, अशा काळात त्यांनी लिहिलेला ‘जग बदल घालून घाव!’ हा लेख ‘विठोबाची आंगी’ या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे; तर शरद जोशींच्या निधनानंतर साप्ताहिक साधनाच्या दिवाळी अंकात लिहिलेला ‘सत्य आम्हां मनी...’ हा लेख ‘व्यक्ती आणि व्याप्ती’ या पुस्तकात आहे. शेतकरी संघटनेचा प्रवास समजून घेण्यासाठी हे दोन्ही लेख अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

आज सुद्धा विनय हर्डीकर जेव्हा राष्ट्रीय प्रश्‍नांकडे बघत असतात, त्यावर बोलत असतात, तेव्हा देशातील आर्थिक विषमता एका मर्यादेपर्यंत दूर झाल्याशिवाय, विचार प्रणाली- तत्त्व प्रणाली या देशातील बहुसंख्य नागरिकांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, अशी मांडणी ते करतात. आणि ही आर्थिक विषमता दूर करण्याची ताकद शेतकरी संघटनेच्या विचारांमध्ये आहे हे त्यांच्या मनात असतेच.

(लेखक पॉलिमर तंत्रज्ञ असून, दीर्घ काळ शेतकरी चळवळीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT