Kolhapur News : शेतीप्रश्नांसाठी राज्यात लढणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांना आमदारकीच्या मोहमायेने भुलविल्याचे चित्र आहे. बहुतांशी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी राजकीय पक्षांच्या वळचणीला गेले आहेत. आयुष्यभर विविध पक्षांच्या नेतृत्वावर शिवराळ भाषेत टीकास्त्र सोडून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेले अनेक संघटनांचे धुरंधर आज विविध पक्षांकडे उमेदवारीसाठी याचना करत असल्याचे वेदनादायी चित्र राज्यात आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये शेती प्रश्नांवरून प्रस्थापितांवर जोरदार टीका करत अनेक शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांमध्ये आपलेपणा निर्माण केला. पक्षांच्या मातब्बर नेत्यांवर टीका करून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले.
शेती प्रश्नांवर लढताना लोकांचे पाठबळ मिळाल्यानंतर मात्र हेच नेते आमदारकी, खासदारकीकडे वळले. कधी कधी आपल्याला मदत करणाऱ्या पक्षांशी संधान बांधत या नेत्यांनी खासदारकीपासून आमदारकीही मिळविली. पदे मिळविल्यानंतर अनेक संघटनांचे नेते शेती प्रश्नांवरून दूर गेले. संघटना नावापुरत्या राहिल्या या संघटनांवर राजकीय पक्षांचेच वर्चस्व राहिले.
तडजोडीमुळे अनेक नेते बॅकफुटवरही गेले. विधानसभेचे वातावरण सुरू झाल्यानंतर अचानक शेतीप्रश्न हवेत विरल्यासारखी स्थिती निर्माण झाली. दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याने अनेक संघटनांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. काही संघटना फुटीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत.
राजकीय पक्षांनीही अशा नेत्यांशी संपर्क साधून त्यांना पदाचे आमिष दाखवल्याने काही दिवसांत शेतकरी संघटनांच्या नेत्यांसह कार्यकर्ते राजकीय पक्षांचे सदस्य होण्याची शक्यता आहे. शेतीप्रश्न, तत्त्वे, राजकीय भूमिका हे घटक मागे पडल्याचे अस्वस्थ चित्र निर्माण झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात तर ही बाब प्रकर्षाने दिसत आहे. संघटनांमधून बाजूला होऊन चिखलफेक करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधीही पदासाठी एकत्र येण्याचा विचार करत आहे. पक्षांशी जवळीक असणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महामंडळासारख्या पदांचे आमिष दाखवत संघटनांचा महत्त्वाचा गट फोडण्यासाठीही तंत्र वापरले जात आहे. यालाही कार्यकर्ते बळी पडत असल्याचे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.