Vel Amavasya Agrowon
ॲग्रो विशेष

Vel Amavasya : वेळा अमावस्या अर्थात येळवस म्हणजे मातीतला उत्सव

टीम ॲग्रोवन

बालाजी मदन इंगळे

येळवस हा मातीतला (Soil) अस्सल उत्सव आहे. वेळामावस्या (Vel Amavasya) असेही याला म्हणतात. दर्शवेळा अमावस्येला येळवस असते. खरीप हंगाम (Kharif Season) संपलेला असतो. रब्बीची पेरणी (Rabi Sowing) झालेली असते. पीक तरारून वर आलेले असते. म्हणजे रानं हिरवीगार असतात. झाडं-झुडपं बहरून आलेली असतात. बोराची झाडं बोरांनी लगडलेली असतात. मधमाशांनी झाडाझाडावर आपले पोळे तयार केलेले असते. ओल्या पायवाटा सुकत आलेल्या असतात. थंडी अगदी भरात आलेली असते. तूरीच्या शेंगा, हरभऱ्याचे डहाळे लगडून आलेले असतात. अशावेळी येळवस येते. अशा अनुकूल परिस्थितीत आलेली येळवस शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेलगतच्या गावांमध्ये येळवस साजरी केली जाते. कर्नाटकातून आलेला हा उत्सव आहे असे मानले जाते. शेतातील एका मोठ्या झाडाच्या बुडात सहा दगड ठेवले जातात. हे सहा दगड म्हणजे पाच पांडव आणि सहावी द्रौपदी मानले जाते. या सहा दगडांना काव आणि चुना लावून चेहर्‍यासारखे रंगवले जाते. कडब्याच्या पेंढ्यांची वर एक तात्पुरती खोप केली जाते. या पेंढ्यातून वारा आत येऊ नये म्हणून गुलाबी रंगाची एक शाॅल पेंढ्यावरून गुंडाळली जाते.खोपीच्या समोर ऊस आणून लावले जातात शोभेसाठी...

भल्या सकाळी दारापुढे बैलगाडी येऊन थांबते. अगदी पहाटेपर्यंत जागून घरातील स्त्रीयांनी येळवशीचा सर्व स्वयंपाक तयार केलेला असतो. या दिवशीचा स्वयंपाक सुद्धा वैशिष्टय़पूर्ण असतो. यामध्ये दररोजच्या पदार्थांचा समावेश नसतो. भज्जी, बाजरीचे उंडे, खीर, वांग्याचे भरीत, खिचडा, आंबिल, कानवले, दाळ, भात, दुध, तूप इत्यादींचा समावेश असतो. तूरीच्या शेंगा, हरभऱ्याचे डहाळे, वाटाणे, वांगे, भोपळा, गाजर, वरण्याच्या शेंगा, मुळ्याच्या शेंगा, दोडके, चिंच, टमाटर, लसूण, मेथी, पालक, कोथिंबीर,बेसन हे सर्व परिसरात उपलब्ध होणाऱ्या भाज्या व फळभाज्या वापरून भज्जी तयार केली जाते.

अद्रक, मीठ आणि ज्वारीचे पीठ घालून ताक आंबवतात आणि आंबिल तयार करतात. हा येळवशीचा स्वयंपाक ऋतूमानानुसार मानवणारा असतो. आणि यासाठी रानमेवा वापरलेला असतो. म्हणून यादिवशी भरपूर जेवण जातं आणि पचतंही. आजच्या दिवशी पोट मोठं होतं असंही मानलं जातं. हा सगळा स्वयंपाक बैलगाडीत भरला जातो. बाया आणि पोरं बैलगाडीत बसतात. गडीमाणसं चालत शेताकडे निघतात. कोणीतरी एकजण आंबिलाचं गाडगं डोक्यावर घेऊन बैलगाडीच्या पुढे चालत निघतो. पुढे आंबिलाचं गाडगं घेतलेला माणूस आणि मागे बैलगाडी.

शेताकडे जाताना माणसांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. बरेच पोरं मग बैलगाडीतून उतरतात. रस्त्याने इकडे - तिकडे बघत मजा करत निघतात. शेतसस्ते बैलगाड्यांनी आणि माणसांनी फुलून जातात. बैलांच्या गळ्यातील घागरमाळांचा आवाज शिवारभर भरून राहतो. पहावे तिकडे माणसे आणि बैलगाड्या आपापल्या शेताकडे चाललेली दिसतात. दुरून हे दृश्य खूपच छान दिसते.

शेतात पोहोचलं की सर्व स्वयंपाक पांडवापुढे टेकवला जातो. बाया पूजेच्या तयारीला लागतात. पांडवांना भज्जी - उंड्याचाच नैवेद्य दाखवला जातो. शिवारातल्या आसरा, म्हसोबा, विहिरीवरले इंजिन यांची पूजा केली जाते. वार्‍यातसुद्धा पांडवांसमोर पिठाचे दिवे पाजळले जातात. सार्‍या रानभर चर शिपडला जातो. चर म्हणजे येळणीत भज्जी, उंडे, खीर, आंबिल घ्यायचे, एका तांब्यात पाणी घ्यायचे आणि ज्वारीच्या पानाने रानभर पिकातून शिपडत फिरायचे. येळणी मोठ्या माणसाच्या हातात असते तर पाण्याचा तांब्या पोरांच्या हातात असतो. दोघे एकामागे एक चर शिपडत फिरतात. चर शिपडताना आपल्या कुलदैवताच्या नावाचा जयघोष करतात. 'हरभला जो भगतरा हरभला...हर हर हर महादेव...'असा घोष केला जातो.

सर्व पूजा आटोपून चर शिपडेपर्यंत बारा - एक वाजून गेलेले असतात. मग एकेकजण पाया पडतात. पाया पडताना दंडवत घालतात. दंडवत घालून हात पाठीवर मूठ उघडून ठेवतात. त्या हातावर प्रसाद म्हणून कानवला ठेवतात. हातात तसाच कानवला घेऊन उठावे लागते. काही मित्रमंडळींना निमंत्रण दिलेले असते. तेही आलेले असतात. सकाळपासून काहीच न खाल्ल्याने कडाडून भूका लागलेल्या असतात. मग पांडवापुढे रानातच पिकाच्या पातीमध्ये पंगत बसते. वैशिष्टय़पूर्ण जेवणाचा मनमुराद आनंद लुटला जातो. शेतातील या वातावरणात जरा जास्तच जेवण जाते. मग वरून आंबिल प्यायला दिले जाते.

आंबिल पिले की गुंगी यायला लागते. मग गडीमाणसं झाडाची सावली बघून लवंडतात. आणि बाया जेवायला बसतात. रात्रभर जागून आता थोडी सवड मिळालेली असते. म्हणून बाया निवांत गप्पा मारत मनसोक्त जेवण करतात. पोरं मव्हाळं शोधायला जातात. मव्हाळं झाडून आणतात. मव्हाळाचं गोड मध सर्वजणच थोडं थोडं खातात. सायंकाळचे चार वाजून गेले की दुध ऊतू घालतात.

रानशिनी गोवऱ्या गोळा करून त्या पेटवतात. त्यावर दुधाचं लोटकं ठेवतात. आणि ऊतू घालतात. ज्या दिशेला ऊतू जातं त्या दिशेचे रान जास्त पिकते असे मानले जाते. दुध ऊतू जाईपर्यंत आवराआवर होते. काहीजणांना आणखी भूक लागलेली असते. ते आणखी एकदा जेवतात. आणि बैलगाडीतून परत गावाकडे निघतात. मातीतल्या माणसांचा हा मातीचा उत्सव मोठ्या मनाने साजरा होतो. एक दिवसाचा हा उत्सव साजरा करून माणसं पुन्हा मातीत राबवायला तयार होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT