Pune News: महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा मुकुंद लड्डा उंटवाल यांची नियुक्ती झाली आहे. परिषदेचे आधीचे महासंचालक रावसाहेब भागडे निवृत्त झाल्यामुळे २०१५ च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) तुकडीतील श्रीमती लड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होत्या.
सांगलीच्या आष्टा येथील श्रीमती लड्डा यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्या आष्टा कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापिका असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून १९९८ मध्ये त्या उपजिल्हाधिकारी झाल्या. पुढे प्रांताधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी, बार्टीच्या प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिले.
पुण्याच्या विभागीय आयुक्तालयात वर्षभर त्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर आयुक्तपदी कार्यरत होत्या. महिला आर्थिक महामंडळ आणि महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) अशा दोन्ही महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालकपद श्रीमती लड्डा यांच्याकडे होते. सरकारी अधिकारी म्हणून काम करताना प्रत्येक विभागात कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे.
राज्याच्या भूसंपादन कायद्याची नियमावली त्यांनीच तयार केली आहे. बार्टीमध्ये त्यांनी राज्याच्या आरक्षण धोरणाची पुस्तिका तसेच अलिबाग येथे रोजगार हमी योजनेची पुस्तिका तयार केली होती. शेती महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यात त्यांचा वाटा आहे.
राज्याच्या महसूल कायदा सुधारणेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत श्रीमती लड्डा यांनी मोलाची भूमिका बजावली. या समितीच्या सदस्य सचिव म्हणून त्यांनी राज्य शासनाला चार अहवाल सादर केले.
त्यात कमाल जमीनधारणा नियम, तलाठी सज्जा पुनर्रचना, तुकडेबंदी कायदा व कुळकायदा अशा अहवालांचा समावेश आहे. श्रीमती लड्डा यांनी गुरुवारी (ता. ३) कृषी परिषदेच्या महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला. राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, कृषी क्षेत्रातील इतर शिक्षण व संशोधन संस्थांमधील वरिष्ठांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.