Lumpy Virus Cases Rise : ‘राज्यात ‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव आणि फैलाव रोखण्यासाठी लसीकरण युद्ध पातळीवर करण्याबरोबरच सर्व पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाव पातळीवर सतर्क राहून गोवर्गीय पशुधनावर लक्ष केंद्रित करावे,’’ अशा सूचना पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांनी दिल्या.
‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी टास्क फोर्सची बैठक पशुसंवर्धन आयुक्तालयात गुरुवारी (ता. १७) झाली. या वेळी मुंडे यांच्यासह आयुक्त हेमंत वसेकर, अतिरिक्त आयुक्त शीतलकुमार मुकणे, ‘एनआयव्ही’चे शास्त्रज्ञ डॉ. डोंगरे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संशोधक डॉ. एथॉल, बंगलोरच्या राष्ट्रीय पशू साथरोग शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान (निवेदी) संस्थेच्या डॉ. मंजुनाथ रेड्डी, ‘माफसू’चे संशोधक संचालक डॉ. नितीन कुरकुरे, विस्तार संचालक अनिल बिकाने, विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि संशोधक उपस्थित होते.
सद्यःस्थितीत राज्यात ७ हजार ३४१ पशुधन बाधित आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर लसीकरण वेगात करत १०० टक्के लसीकरण युद्धपातळीवर करा. पशुधन आजारी पडू नये म्हणून गावपातळीवर ग्रामपंचायतींच्या सहकार्याने जनजागृती मेळावे घेण्यात यावेत. आजारी पशुधनाला इतरांपासून वेगळे करून त्यावर प्रभावी वैद्यकीय उपचार करावेत आदी सूचना मुंडे यांनी दिल्या.
राज्यात सद्यःस्थितीत ७ हजार ३४१ पशुधन बाधित असल्याचे पशुसंवर्धन विभागाद्वारे सांगण्यात आले. तर सुमारे ५८ टक्के (सुमारे ८० लाख) पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पशुधनाच्या लसीकरणासाठी युद्धपातळीवर काम करावे, अशा सूचना मुंडे यांनी दिल्या.
‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पावसाळ्याच्या दिवसांत गोठ्याच्या परिसरात पाणी साठणार नाही, या पाण्यात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची कटाक्षाने काळजी पशुपालक शेतकरी आणि ग्रामपंचायतींनी घ्यावी, अशा सूचना संशोधक शास्त्रज्ञांनी केल्या. गोठा आणि परिसरात कीटकनाशकांची फवारणी सातत्याने करावी.
गाय किंवा बैलांना अशक्तपणा, ताप आला असल्यास तातडीने स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घ्यावेत. आजारी पशुधनाला इतर पशुधनापासून दूर बांधावे. गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले.
‘‘सुधारित पशुवैद्यकीय उपचारांची मार्गदर्शक सूचना जारी करणार आहोत. मागील सूचनांची अंमलबजावणी सुरूच आहे. युद्धपातळीवर ऑगस्टअखेर १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. लसीकरण केलेल्या पशुधनात ७० टक्के अँटिबॉडीज असल्याचे समोर आले आहे. यामुळे ‘लम्पी स्कीन’ने पशुधन मृत होण्याचे प्रमाण कमी आहे. एकही पशुधन लसीकरणावाचून राहू नये, याची काळजी घेत आहोत.- हेमंत वसेकर, पशुसंवर्धन आयुक्त
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.