Raigad Crop : अवकाळी पावसामुळे गावठी कडधान्य लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने यंदा उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे गावठी कडधान्याच्या उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाड बाजारपेठेमध्ये यावर्षी कडधान्य खरेदी-विक्रीत मंदीचे वातावरण आहे. गावठी कडधान्यांच्या तुलनेत इतर ठिकाणांहून येणारी कडधान्य स्वस्त असते. त्यामुळे शेतकरी व व्यापारी दोघांनाही मोठा फटका बसतो आहे.
महाड तालुक्यातील गावठी कडधान्याला नेहमीच मोठ्या प्रमाणात मागणी असते. महाड बाजारपेठेत दोन महिन्यांत गावठी कडधान्यांची मोठी उलाढाल होत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनाही रोजगार उपलब्ध व्हायचा. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, एप्रिल व मेमध्ये गृहिणींकडून गावठी कडधान्य भरण्याची लगबग सुरू होते. घाऊक बाजारात या हंगामात तब्बल ५०-६० टन कडधान्ये विक्रीस येतात व कोटीच्या घरात उलाढाल होते, परंतु यंदा हे प्रमाण घटले आहे.
खाडीपट्टा व इतर भागातील शेतकऱ्यांनी यंदा कडधान्य लागवडीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते, तर रस्ता रुंदीकरणांमध्ये अनेकांच्या जमिनी गेल्याने कडधान्य क्षेत्र कमी झाले आहे. कडधान्यांची लागवड कमी प्रमाणात झाल्याने महाड बाजारपेठेत गावठी कडधान्यांचा तुटवडा जाणवत आहे. शहरातील काही व्यापाऱ्यांकडून घाऊक पद्धतीने गावठी कडधान्यांची खरेदी-विक्री होते. दासगाव व बिरवाडीतही गावठी कडधान्यांची खरेदी विक्री होते.
गावठी कडधान्यांमध्ये पांढरा वाल, पावटा, मूग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, तूर याची बाजारात आवक होते. मार्च, एप्रिलमध्ये शेतकरी कडधान्य घाऊक व्यापाऱ्याकडे विक्रीस आणतात.
आदिवासी, बचत गट व स्थानिक शेतकऱ्यांना कडधान्य पिकातून चांगले उत्पन्न मिळत असते. चविष्ट, खतांचा कमी वापर होत असल्याने साठवणुकीला योग्य असतात. मात्र यंदा आवक कमी झाल्याने खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे.
गावठी कडधान्यांचा पुरवठा जास्त होण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक कडधान्यांची लागवड करण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्याचा फायदा शेतकरी व व्यापारी दोघांनाही होईल आणि महाडची गावठी कडधान्याची ओळखही टिकून राहील.
- राजेश शेठ, घाऊक व्यापारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.