Loksabha Election  Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election : सोलापूर, माढा लोकसभेच्या जागांसाठी चुरशीने मतदान

Election Voting 2024 : सायंकाळी पाच वाजेपर्यंत अत्यंत चुरशीने सोलापूरसाठी ४९.८५ टक्के आणि माढा मतदारसंघात ५०.१६ टक्के मतदान झाले. पाचनंतरही मतदान केंद्रांबाहेर रांगा कायम होत्या.

Team Agrowon

Solapur News : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मंगळवारी (ता. ७) काही किरकोळ प्रकार वगळता सायंकाळी पाच वाजेपर्यंत अत्यंत चुरशीने सोलापूरसाठी ४९.८५ टक्के आणि माढा मतदारसंघात ५०.१६ टक्के मतदान झाले. पाचनंतरही मतदान केंद्रांबाहेर रांगा कायम होत्या. कडक उन्हातही मतदारांचा उत्साह कायम होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरस सोलापुरातील शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर या मतदारसंघात तर माढा मतदारसंघात फलटण आणि माळशिरसमध्ये पाहायला मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून, सरासरी ४० अंश सेल्सियसच्यावरच तापमान आहे. गेल्या दोन दिवसांत तर तापमानाने तब्बल ४४ अंश सेल्सियसचा टप्पा गाठला. त्यामुळे मतदारांचा उत्साह कितपत दिसून येईल, याबाबत साशंकता होती. पण कडक ऊन टाळत अनेक भागांत नागरिकांनी शक्यतो सकाळी आणि सायंकाळी मतदान करणे पसंत केले.

त्यामुळे या दोन्ही वेळेत अनेक केंद्रांवर रांगा लागल्या. सोलापूरसह मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, करमाळा या भागांत हे चित्र अधिक दिसले. पण त्याशिवाय दिवसभरही काही केंद्रांवर उन्हातच अनेक ठिकाणी रांगा दिसून आल्या. सकाळी दक्षिण सोलापुरातील गंगेवाडी येथे मतदान यंत्रातील बिघाडामुळे काहीकाळ मतदान थांबले, सोलापुरातही अनेक केंद्रावर मतदान यंत्रातील बिघाडाच्या घटना घडल्या. देगावसह शहरातील अन्य काही भागांत मतदार यादीत नावे नसल्याच्या तक्रारी वाढल्या. काही ठिकाणी मयताची नावेही आढळली. त्यामुळे या केंद्रांवर काहीकाळ गोंधळ उडाला.

सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची सिद्धेश्वर पेटेतील एका केंद्रावर किरकोळ कारणावरुन काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी बाचाबाची झाली. पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण मिटले. तर सांगोला तालुक्यातील महूद येथील मतदान केंद्रावर मतदारांना केंद्रापर्यंत सोडण्याच्या कारणावरुन शेकाप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ४२.३८ टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी मतदान पंढरपुरात ३८.२६ टक्के झाले. पण दुपारनंतर पुन्हा मतदानाचा टक्का वाढत गेला. माढा मतदारसंघात सर्वाधिक माळशिरस आणि फलटणमध्ये चुरस दिसून आली. पाचपर्यंत माळशिरसला ५६ टक्के, फलटणमध्ये ५१.९७ टक्के मतदान झाले.

कांद्याने दाबले बटन

ऐन हंगामात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लादल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादकांच्या मनात सरकारविरुद्ध रोष आहे. कांदा उत्पादक मतदानाच्या माध्यमातून भाजपवर हा राग काढताना दिसले. माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर शेतकऱ्याने चक्क कांद्याने बटन दाबून मतदान केले, याचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांमध्ये फिरत होताच, पण शेतकऱ्याने अशा पद्धतीने व्यक्त केलेल्या रोषाची चर्चाही चांगलीच रंगली.

बागलवाडीत ईव्हीएम मशिन पेटवली

सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील बुथ क्रमांक ८६ वर दुपारी एकच्या सुमारास दादासाहेब चळेकर हा तरुण ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी आणि पाणी, चारा टंचाईच्या प्रश्नावर घोषणाबाजी करत मतदान केंद्रात घुसला आणि त्यानंतर त्याने थेट ईव्हीएम मशिनवर पेट्रोल टाकून ते जाळण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच या मशिनने पेट घेतला, पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करत लगेच आग विझवली. पण तोपर्यंत मशिन बंद पडली. यावेळेपर्यंत येथे ४१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर काही काळासाठी मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. थोड्यावेळाने पुन्हा दुसरे मतदान यंत्र बसवून मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT