Bail Gada Sharyat
Bail Gada Sharyat  Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Bail Gada sharyat: बैलगाडा शर्यतीचा थरार आणि बदललेला गावगाडा

Amit Gadre

Kolhapur Bail Gada Sharyat परवा चार दिवस कामानिमित्त माझ्या आंबा (जि. कोल्हापूर) गावी होतो. गावात जत्रेचा माहोल होता. पहिल्या दिवशी बैलगाडा शर्यतीचे मैदान होते. कोरोना नंतर मोठ्या प्रमाणात जत्रा आणि मैदान असल्याने गावाचा नूर वेगळाच होता.

मग काय गावच्या जत्रेचे मैदान पहायचे ठरवले. त्याचे मुख्य कारण म्हणजे पंचक्रोशीतील जातिवंत खिलार बैलजोड्या पाहायला मिळणार होत्या, माझ्या भावाने शर्यतीचे पाहिले बक्षीस जाहीर केले होते आणि महत्वाचे म्हणजे आमच्या घरची बैलजोडी मैदानात उतरणार होती.

दुपारी भर उन्हात पावले मैदानाकडे वळली. बघतोय तर एक एक जातिवंत खिलार उभे होते. हरण्या, सरपंच, नंदया, बुलेट, सर्जा, नाग्या, बादल, वस्ताद, बाजीगर, सुंदऱ्या... एक एक नाव असणारी हे महाराष्ट्र भूषण नजरेला नजर देत होते. शेजारी मालक प्रेमाने त्याच्याकडे आणि आमच्याकडे बघून मनात खुश होत होता.

तो माहोलच वेगळा होता. कोणी बैलाला मैदान दाखवून येत होता, तर कोणी बैलाला तापवत होता. एका एक बैलाला धरायला किमान सहा गडी तयार होते. शर्यतीचा छकडा जोडण्यात काही जण रमले होते, काही जण यंदा कोणती जोडी मैदान मारणार याचीच चर्चा होती.

मैदानात जाऊ लागलो तर कडेने बर्फाचे गोळे, कलिंगड, भजी, पॉपकॉर्न, पुगळ्या, शेंगदाणे विक्रीची छोटी दुकाने, हातगाड्या आणि त्यांच्या घंटीने वेगळंच वातावरण निर्माण झाले होते. कधी एकदा मैदान सुरू होतय असे झाले होते. जवळपास ५१ बैल जोड्या मैदानात उतरल्या होत्या.

मैदानाच्या स्टेजवरून घोषणा झाली की, आली रे वारूळकर पाटलांची सुंदऱ्या, हऱ्यांची जोडी... झेंडा पंचाने इशारा केला गाडी सुटली... धुरळा उडवत जोडी सुसाट... एक पाठोपाठ नुसता धुरळा...हा वेग पाहून लोक येडे झाले होते... तापलेले बैल ड्रायव्हरचे देखील ऐकत नव्हते. जनावरांची काय ताकत आहे याचा कस लागला होता. लोकांच्या लाटा हेलकावत होत्या.नुसत्या शिट्या... हाकारे आणि धुरळा...

जरा चक्कर मारायला मी आणि माझा भाऊ झेंडा पंच कोण असतो हे बघायला गेलो.हातात एक भगवा झेंडा, डोक्याला टोपी आणि करारी नजर... झेंडा पडला की घड्याळ सुरू... गाडी सुसाट... ड्रायव्हर, बैलजोडी आणि पंच यांच्या नजरेचा खेळ... फक्त १७ सेकंदात ५०० फूट अंतर तोडणारे हे खिलार त्या दिवशीचे राजे असतात... हार, जीत ही वेगळी बाब... खोंड काय पळतोय...लोक चकित होऊन गेलेले...

या दरम्यान पंधरा गाड्या पळल्यानंतर स्टेजजवळ गलका झाला.मैदान आणि गोंधळाचे एक अतूट नाते आहे आणि तसेच झाले... एका मालकाने वेळ नोंदी बद्दल तक्रार केली की, आमची बैलं सुसाट असताना तुम्ही एक सेकंद जास्त लावलाय, तुमचा टायमर बदला नाही तर आमची घड्याळाची वेळ पकडा.

पण स्पर्धेची वेळ मोजणार बिलंदर होता, स्पीकरवर त्याने सांगितले की, आमचे घड्याळ बरोबर आहे, झेंडा पंचाने इशारा केल्यावर आम्ही टायमर लावलाय, जर शंका असेल तर कोणत्या सेकंदाला घोळ वाटतो, तो सेकंद माझ्याकडे घेऊन या, मग सांगतो, चूक की बरोबर ... अजूनही तो बैलगाडीवाला चुकलेला सेकंद शोधत आहे...

दरम्यान ऊन जरा तापल्याने मी आणि भाऊ मैदानाच्या कडेने असलेल्या बांधावर जाऊन बसलो. तेथे पंचक्रोशीतील पाच-सहा वयस्क गावकरी बसले होते. मैदानाची लांबी, पाऊस पाणी , बैल जोडी, थरार असे किस्से रंगू लागले.आम्ही कोणीच एकमेकाच्या ओळखीचे नव्हतो, पण गाव गाड्याच्या गप्पा रंगल्या...

एक तात्या सांगू लागले... तुमच्या वयाचे असताना धोंडी पाटलाच्या रानातून मरणाचा ऊस खालाय.. रायवळ तोडलेत, पण आता ती मजा नाही, त्या डोंगराच्या झऱ्याचे पाणी पीत होतो, तुम्हाला आता बिस्लरी पाणी लागतंया..पाणी नासवलासा पोरांनो...पीक बी नासलय...चव ना ढव...

शाळा मास्तर दिसले, की आम्हाला घाम फुटायचा, आता शिक्षणाचा बाजार कळनासा झालाय. सोसायट्या, एजंट झालेत...कॉलेजातील पोरं गाडी काढून रातच्याला कोठे जातात कळतं नाय, अन विचारायची सोय नाय...बायको म्हणती..

नातवाला काय बोलायचं नाय... काय करावे... ? तो पांडुचा सदा चाळीसाव्या वर्षी लिव्हर खराब होऊन गेला अशी धा जण गावात हैती... हातची पोर चाललीत...काय उपाय हाय का तुमच्याकडं...? पैका येतोय अन जातोय...

तेवढ्यात अण्णा म्हणाले...आमच्या नाथाकडे तीन खिलार जोड्या होत्या , तालेवार शेतकरी पण, पोरं बाद निघाली, शेवटी हा बैल विकून गोठयात रहायला गेला, काय करावे? राजकारणाने तर बांध नव्ह तर डोकी फुटायला लागल्यात.. गाव उसवून निघालंय... आमची डोकी चालनात... पुढं धोका हाय.. पण आमचं ऐकतय कोण?

आमच्या बैलजोड्या लाकडी गाड्या ओढायच्या... झुल, सजविलेली बैल गाडी... नुसता नाद होता...रोमनाड बैल... लाकडी चाक असलेली गाडी धुरळा उडवत पळवून न्यायचे... आता हो तुमचा छकडा... रबरी धावा... नुसता शो... बैलाची ताकद यांना कळलीच नाय... आमच्या लाकडी बैलगाडीची चाकं आता हॉटेल आणि रिसॉर्टच्या दारात शो साठीच तुम्ही उभी केलेली दिसताहेत... कुटं गेला पोरांनो गावगाडा.... ठरवा तुम्हीच...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT