Farm Mechanization Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Mechanization : गरज शेतीतील यांत्रिकीकरणाची..

Agriculture Mechanization : शेतीमध्ये आपण विविध कामे करत असतो. अशा कामांसाठी सुरुवातीला केवळ मानवी श्रमावर अवलंबून असलेले शेती क्षेत्र पशू ऊर्जेचा वापर करू लागले.

Team Agrowon

डॉ. सचिन नलावडे

Farm Technology : शेतीमध्ये आपण विविध कामे करत असतो. अशा कामांसाठी सुरुवातीला केवळ मानवी श्रमावर अवलंबून असलेले शेती क्षेत्र पशू ऊर्जेचा वापर करू लागले. मात्र पुढे वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यानंतर या वाफेच्या शक्तीचा वापर मोठमोठ्या कारखान्यांप्रमाणे शेतीमध्येही केला जाऊ लागला. पुढे रॉकेल, डिझेल, किंवा पेट्रोल अशा खनिज इंधनांवर चालणारी यंत्रे वापरली जाऊ लागली.

आता तर त्या पुढे जाऊन सीएनजी, सौर ऊर्जा किंवा बॅटरीवर चालणारी यंत्रेही उपलब्ध होत आहेत. आता तर मजुरांची कमतरता ही मोठीच समस्या असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या कामांसाठी यंत्रांची मागणी केली जात असून, त्यांचा वापरही वाढला आहे. थोडक्यात, कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे.

आता यंत्रे किंवा यांत्रिकीकरण हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर ट्रॅक्टर, कंबाइन हार्वेस्टर यांसारखी भलीमोठी यंत्रे उभी राहतात. पण यंत्र म्हणजे नेमके काय?
एखादे अवजड, कष्टाचे काम करण्यासाठी वापरली जाणारी कमीअधिक गुंतागुंतीची रचना म्हणजे यंत्र होय.
शेतीमध्ये मशागतीपासून काढणीपर्यंत आणि काढणीपश्चात अनेक कामांसाठी छोटीमोठी यंत्रे वापरली जातात. या यंत्रामध्ये योग्य त्या अभियांत्रिकी तत्त्वांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. यंत्रामुळे जमिनीची मशागत, पिकांची पेरणी किंवा पुनर्लागवड, सिंचन व्यवस्थापन, शेतीमालाची वाहतूक, साठवण आणि प्रक्रिया अशी कामे सोपी, कमी कष्टाची होतात. या सर्व कामांसाठी यंत्रांचा वापर करणे या गोष्टींचा समावेश होतो. यांत्रिकीकरण ही शेती व्यवस्थापन किंवा तंत्रामध्ये गरजेनुसार बदल करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये यंत्रांच्या वापराचे दुष्परिणाम होणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाते. अर्थात, कोणत्या यंत्र किंवा तंत्रज्ञानाचा वापर शेतात करण्यापूर्वी त्यासाठी योग्य ती आर्थिक, मानसिक आणि सामाजिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते. अशा सर्व गुंतवणुकीसाठी अनुकूलता निर्माण होण्यासाठी शेतकऱ्यांना किंवा समाजाला पुरेसा वेळ द्यावा लागतो.

एखादे यंत्र आले म्हणजे तेथील मजूर किंवा शेतकरी यांचीच हकालपट्टी होईल की काय, अशी भीती कायम निर्माण होत असते. संगणक आले त्या वेळी आपल्या सर्वांच्या नोकऱ्या जाणार म्हणून जगभरातील कामगार संघटना विरोध करत होत्या. संगणकामुळे काही कामे कमी झाली तरी संगणकाशी संबंधित, देखभाल, दुरुस्ती व त्यांच्या संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) बनविणे यातून उलट अधिक रोजगार निर्माण झाला. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्याला, मजुराला शेतातून बाहेर काढण्याचा विचार सुरू असल्याची हाकाटी सातत्याने पिटली जाते. पण खरेतर उलट आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होणार असून, आधुनिक तंत्रज्ञान अलिबाबाच्या दिव्यातून बाहेर येणाऱ्या कामसू नोकराप्रमाणे कायम त्याच्या हाताशी राहणार आहे. सुधारित अवजारे, जनावरांनी ओढली जाणारी अवजारे, इलेक्ट्रकि मोटार, इंजिन, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, कापणी, मळणी यंत्रे, प्रक्रिया आणि वाहतुकीची साधने अशा यांत्रिक सुविधांमुळे शेतीतील अनेक कामांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बदलत्या हवामानाचे आव्हान पेलण्यासाठी...
गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गातील अनियमितता वाढली आहे. हवामानातील हे बदल माणूसजातीसह सर्वच सजीवांसाठी धोक्याची घंटी ठरत आहेत. माणूस कितीही आधुनिक झाला तरी अद्याप अन्नासाठी पर्यायाने शेतीसाठी निसर्गावरच अवलंबून आहे. किंबहुना, निसर्गाचा अविभाज्य भाग असणारी शेती हवामानातील बदलांमुळे बिनभरवश्याची ठरत आहे. वाढणारे तापमान, कुठे दुष्काळ तर कुठे अचानक येणारा पाऊस आणि पूर या साऱ्या बदलामुळे पिके धोक्यात येत आहेत. पिकांवरील कीड-रोगांच्या उद्रेकाच्या स्थिती वारंवार येत आहेत. अशा स्थितीमध्ये पीक व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. पिकांच्या जाती, वाण यांत बदल करण्यासोबत पीक पद्धतीमध्ये बदल करावे लागतील. पाण्याची अनियमितता लक्षात घेऊन कमी अधिक पाण्यामध्ये किंवा कमी काळात जास्त उत्पादन देणाऱ्या तसेच कीड, रोग प्रतिबंधक वाण व तंत्राकडे वळावे लागणार आहे. उपलब्ध पाणी व खतांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या तंत्रांचा शेती व्यवस्थापनामध्ये समावेश करावा लागेल. अशा तातडीच्या स्थितीमध्ये कमीत कमी काळामध्ये कामे उरकणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अशा स्थितीमध्ये वेगाने अधिक काम करणारी यंत्रे आपल्यासाठी नक्कीच लाभदायी ठरणार आहेत, यात शंका नाही.

यांत्रिकीकरणाची तीन मुख्य उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे...
१) शेती कामातील कष्ट कमी करणे.
२) शेत मजुरांची उत्पादकता वाढविणे.
३) वेळेची बचत करताना शेती कामाची गुणवत्ता वाढविणे.

शेतीमधील अनेक कामे ही कष्टदायक, वेळ खाणारी आहेत. त्यातून फारच कमी मोबदला मिळतो. त्यामुळे नवी पिढी शेतीकडे पाठ फिरवून शहरामध्ये रोजगाराचा शोध घेत आहे. त्याला अनेक सामाजिक आणि आर्थिक कारणे आहे. त्यातही मुख्य म्हणजे एका कुटुंबाचा खर्च व्यवस्थित चालवता येईल, इतकी जमीनधारणाही अनेकांकडे राहिलेली नाही. विशेषतः मनुष्य केवळ कष्टाच्या कामातून आजच्या काळामध्ये चांगली मानली जाणारी जीवनशैलीही अवलंबू शकत नाही. एक प्रौढ माणूस साधारणतः १५० वॉट ताकद निर्माण करतो. म्हणजे सतत काम करताना ०.१५ किलोवॉट तास (०.१५ युनिट) ऊर्जा निर्माण करतो. त्याचवेळी एक चांगला ट्रॅक्टर एक लिटर डिझेलमध्ये ३ किलोवॉट तास (३ युनिट) ऊर्जा निर्माण करू शकतो. म्हणजे शक्ती स्रोत म्हणून माणसाचा विचार केल्यास त्याची तुलना ताशी ०.०५ लिटर डिझेलशी होऊ शकते. जर डिझेलचा दर रु. १००/- प्रति लिटर धरला तर माणूस फक्त रु. ५/- प्रति तास पगार देण्याच्या योग्यतेचा मानला जाईल. सुदैवाने यांत्रिकीकरण आपल्या मदतीला येत असल्यामुळे शेतकऱ्यांची, मजुरांची काबाड कष्टातून मुक्तता होण्यास मदत होते. कमी काळात अधिक शक्ती यंत्रांद्वारे कार्य करण्यास उपलब्ध होते.

शेतकरी जेव्हा यंत्रांचा वापर करतात, त्या वेळी त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे पंजाब, हरियाणामधील गहू-भात शेती होय. या उत्पादन वाढीमध्ये सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके, पाणी आणि अन्य निविष्ठांचा सहभाग असला तरी यांत्रिकीकरण हा एक मुख्य घटक ठरला आहे. त्यातून शेतीचे यांत्रिकीकरण प्रति मनुष्य-तास उत्पादकता वाढविण्यास कारणीभूत आहे. म्हणूनच अमेरिकेसारखा देश कमी शेतकरी असतानासुद्धा आपले शेती उत्पादन करू शकतो.
शेतीची काही कामे, पेरणी आणि कापणी करण्यासाठी एक सर्वोत्तम वेळ ठरलेली असते. या वेळेच्या जवळपास आपली कामे पूर्ण झाली तरच पिकांचे उत्पादन जास्तीत जास्त मिळते. ही कामे वेळच्या वेळी करण्यासाठी सामान्यतः शेतकऱ्याला मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून राहावे लागते. ज्यांच्याकडे जास्त मजूर किंवा जास्त क्षमतेची यंत्रे उपलब्ध असतात तेच ही निर्णायक कामे योग्य वेळेमध्ये पूर्ण करू शकतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाकडे वळण्याशिवाय फारसा पर्यायच राहिलेला नाही. अर्थात, यांत्रिकीकरणामुळे शेती कामाची गुणवत्तासुद्धा वाढते. उदा. पूर्वी वापरल्या जाणाऱ्या लाकडी नांगरापेक्षा फाळाच्या नांगराने खोल आणि परिपूर्ण नांगरणी करता येते.

यांत्रिकीकरणातील अडथळे
वरील प्रमाणे अनेक फायदे दिसत असले तरी भारतीय शेतकरी आणि धोरणकर्त्यांसमोर यांत्रिकीकरणासंदर्भात अनेक अडथळे आहेत.
१. लहान शेती - आकाराने लहान व विखुरलेली शेते.
२. यंत्राच्या जादा व सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या किमती.
३. शेतकऱ्यांची गरिबी.
४. यंत्रांची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी योग्य माणसे आणि व्यवस्था उपलब्ध होत नाहीत.
५. पारंपारिक शेतीचा अवलंब, कुशल यंत्रचालक मिळत नाहीत.
६. ओढकामाच्या जनावरांची संख्या.
७. संशोधन संस्था, उत्पादक आणि शेतकरी यांच्यातील समन्वय कमी असणे.

या सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी शेतकरी आणि सरकार दोघांनीही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या यांत्रिकीकरणाच्या सुरुवात ही लहानात लहान यंत्रांपासून सुरू करून किमान त्याला भाडेतत्त्वावर तरी अनेक यंत्रे अवजारे उपलब्ध होतील, या दिशेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच एकूणच ग्रामीण भागाचा विकास आणि समृद्धीला चालना मिळेल.
-----------------------
डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jowar Procurement: सात-बारावर पीकपेरा नसतानाही ५३८४ क्विंटल ज्वारीची खरेदी

Farmer Support: पशुपालनाला आता ‘कृषी’च्या धर्तीवर सवलतीत वीजपुरवठा

Agriculture Department: कृषी विभागातील अकार्यकारी पदे घोषित

Sugarcane Price: उसाला ३३०० रुपये दर निश्चित

Commercial Farming: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रुजविला व्यावसायिक शेती पॅटर्न

SCROLL FOR NEXT