Agricultural Tradition Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Culture : मध्य आशियापासून भारतापर्यंत पशुधन संस्कृतींचा प्रवास

Agricultural Tradition : कास्पियन समुद्रापासून चीनपर्यंत पसरलेल्या मध्य आशियात तियान शान पर्वतरांग, कारा कुम, किझिल कुम, ताक्लामकान ही वाळवंटं आणि स्टेप्प्स म्हणजे वृक्षरहित गवताळ पठारं वा मैदानं आहेत. तिथं पावसाळा नाही.

Team Agrowon

Indian Agriculture :

पशुपालकांचे देश आणि प्रदेश

कास्पियन समुद्रापासून चीनपर्यंत पसरलेल्या मध्य आशियात तियान शान पर्वतरांग, कारा कुम, किझिल कुम, ताक्लामकान ही वाळवंटं आणि स्टेप्प्स म्हणजे वृक्षरहित गवताळ पठारं वा मैदानं आहेत. तिथं पावसाळा नाही. हिंदुकुश, तियान शान, पामीर, काराकोरम या पर्वतांवरील बर्फ हा तिथल्या नद्यांच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे.

हा प्रदेश रुक्ष आणि कोरडा आहे. तिथे केवळ पशुपालन शक्य होतं. फरगाना व्हॅली सुपीक होती आणि आजही आहे. मात्र तिच्या पूर्वेला आणि पश्‍चिमेला वाळवंटं आणि बर्फाळ प्रदेश आहेत. तिथले मानवी समूह केवळ पशुपालनावरच निर्भर होते. घोडे, शेळ्या, मेंढ्या, याक, उंट अशा विविध पशूंचं खिल्लार ते बाळगायचे. लोकर, कातडी, मांस, दूध, लोणी, पनीर यांच्या बदल्यात ते शेतकऱ्यांकडून अन्नधान्य घ्यायचे. हा होता आदिम वस्तुविनिमयाचा व्यापार, त्याचं विकसित रुप म्हणजे रेशीम मार्ग.

वसंत, ग्रीष्म, शरद आणि शिशिर हे चार ऋतू आहेत मध्य आशियात. पावसाळा वा मॉन्सून नाही. त्यामुळे वर्षा आणि हेमंत हे दोन ऋतू तिथे नाहीत. वसंत, ग्रीष्म व शरद ऋतूत जनावरं पोसायची आणि शिशिराचा हिवाळा निभावून न्यायचा या प्रकारची जीवनपद्धती होती. साहजिकच जनावरांची खिल्लारं घेऊन ते सतत हिंडत असायचे. पूर्वेकडून पश्‍चिमेकडे आणि पश्‍चिमेकडून पूर्वेकडे. त्यांचा आणि शेती संस्कृतीचा जैव संबंध नव्हता. घोड्यावर स्वार होऊन विविध पशूंची खिल्लारं ते हाकायचे. बॅक्ट्रियन उंट म्हणजे दोन मदारी असलेले केसाळ उंट मालवाहतुकीसाठी वापरले जायचे.

पूर्वीच्या काळी शेतकरी केवळ एकच पीक घेत नसत. ज्वारी वा बाजरी, डाळी, तेलबिया, भाजीपाला अशी अनेक पिकं एक शेतकरी घ्यायचा. जेणेकरून एखादं पीक हातून गेलं तर दुसरं हाती लागावं. पशुपालकही शेळ्या, मेंढ्या, घोडे, याक, गायी, बैल अशी अनेक जनावरं पाळायचे. त्याशिवाय कोंबड्या, बदके. बर्फाळ हिवाळ्याची तरतूद आधीच करून ठेवावी लागायची. कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिझीस्तान, ताजकीस्तान, अफगाणिस्तान, आजचा इराण, चीन आणि पाकिस्तानचा काही प्रदेश मिळून बनलेला मध्य आशिया असा होता.

तिथून हिंदुस्तानात आलेले आर्य पशुपालक होते. अफगाण, मंगोल वा मुघल, उझबेक, ताजिक, इराणी, तुर्की हे सर्व पशुपालक याच प्रदेशातून हिंदुस्तानात आले. निसर्गावर ताबा मिळवणं, जमीन पादाक्रांत करणं या त्यांच्या स्वाभाविक प्रेरणा होत्या. शेती आणि पशुपालन यांच्यातील सहजीवनाची जाण त्यांना नव्हती. मॉन्सूनच्या प्रदेशात आल्यानंतर या पशुपालकांच्या संस्कृतीत आमूलाग्र बदल झाले.

हिमालय ओलांडला की मॉन्सूनचा प्रदेश सुरू होतो. हिमालयातील पशुपालक उन्हाळ्यामध्ये उंच पर्वतांवरील कुरणांकडे रवाना व्हायचे आणि हिवाळ्यात पर्वतांच्या पायथ्याशी परतायचे. पावसाने मातीची धूप झालेली शेतं शेळ्यामेंढ्यांच्या शेणाने कसदार व्हायची. हिमालयाच्या पर्वतरांगांमधले पशुपालक उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थलांतर करतात. शेतकरी आणि पशुपालकांचं सहजीवन मॉन्सूनच्या प्रदेशात होतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Policy: ‘बांबू धोरण २०२५’ राबविण्याचे आदेश

Mahavistar App: कोणत्या हंगामात काय पेरायचं, कधी विकायचं?

India Russia Relations: पंतप्रधान मोदी दबावाला बळी न पडणारे नेते

Sugar Mills: कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

SCROLL FOR NEXT