Water Scarcity
Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity Over : पाणीटंचाईचा वनवास संपला

Team Agrowon

Mokhada News : स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोखाडा तालुक्याला प्रति वर्षी पाणीटंचाई भेडसावत आहे. यंदा डिसेंबर २०२३पासूनच मोखाड्यात टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने जानेवारीपासून टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. पहाटेपासूनच पाणीपुरवठा करणारे टॅंकर धरणाची वाट धरायचे. जूनअखेर तालुक्यात मॉन्सूनचे आगमन झाल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तब्बल सात महिने मोखाड्यातील नागरिकांनी पाणीटंचाईचे चटके सोसले आहेत.

जानेवारी महिन्यात सरकारने मोखाड्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. उन्हाच्या तडाख्याने दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या वाढत होती. टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून टॅंकर पळसपाडा आणि अप्पर वैतरणा धरणातून पाणी आणण्यासाठी धावत होता.

नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचा दिलीप सोनार हा कर्मचारी नियोजनबद्ध कारभार पाहत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा टंचाईची तीव्रता अधिक होती. त्यामुळे टॅंकरचालक आणि प्रशासनाला नागरिकांची तहान भागवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे.

दर वर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात मोखाड्यात पाणीटंचाईला सुरुवात होते. यंदा एक महिना अगोदरच डिसेंबरमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या वर्षी २३ टॅंकरद्वारे ७३ गाव-पाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा २६ टॅंकरद्वारे ८८ गाव-पाड्यांना पाणीपुरवठा केला.

तालुक्यातील सुमारे ५० हजार ४९४ नागरिक आणि जनावरांची जूनअखेरपर्यंत टॅंकरच्या पाण्याने तहान भागवली गेली आहे. तब्बल सात महिने मोखाडावासीयांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागले आहेत. आता नियमित पाउस सक्रिय झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील विहिरीतील पाण्याची पातळी वाढल्याने टंचाईचे संकट टळले आहे. दररोज पहाटे ४ वाजल्यापासून धावणारे टॅंकर ३० जूनपासून स्थिरावले आहेत.

या गावांना टंचाईचे चटके

गोळीचा पाडा, धामोडी, स्वामीनगर, कुडवा, कुंडाचा पाडा, तेलीऊंबरपाडा, वारलीवाडी, हट्टीपाडा, हेदवाडी, गवरचरीपाडा, ठवळपाडा, राजेवाडी, जांभुळवाडी, हुंड्याची वाडी, धामणी, तुंगारवाडी, मडक्याची मेट, कोलद्याचा पाडा, चारणगाव, वाकीचा पाडा, ठाकुरवाडी, गोमघर, वासिंद, वाघवाडी आणि शेलमपाडा या गावपाड्यांसह सुमारे ८८ गाव-पाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

Jackfruit Research : फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १ लाख ३७ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Maharashtra Rain Update : पावसाचा जोर; पंचगंगा पात्रा बाहेर, मुंबईत एनडीआरएफची पथके तैनात

Jalgaon ZP : जळगाव जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून प्रशासकराज

SCROLL FOR NEXT