Mini Tractor Agrowon
ॲग्रो विशेष

Mini Tractor : दावणीचे बैल गेले, ट्रॅक्टर आलं; पण नंद्या-मोत्याच्या आठवणीचं काय?

हाताला भाजलं तरी हात झटकून परत मळायला लागायचं. दाणं खाली पडलं की गोंड बाजूला करायचं अन् गरमागरम हुरडा आपल्या हातावर यायचा.

Team Agrowon

मतीन शेख

Rural Story : शेतातल्या जुंधळ्या लगतच गोलाकार अशी आगटी खणायची. अगदी दोन तीन फुट खोलवर. माती बाजूला काढून आजोबा चांगलं कोवळं दाणं भरलेली कणसाची ताटं घेवुन येणार. कणसं मोडून होताच आज्जीने आणलेल्या पाटीभर गवऱ्या आकटीत रिचवायच्या.

आगटीला पेटवून चांगला लालबुंद आर पडला की लगेच सर्व आकटीच्या परिघावरुन सगळीकडे ती कणसं थेट खाली त्या विस्तवात रोवायची. काही मिनीटात ती भाजून झाली कि वर काढायची अन् आजोबांनी, वडिलांनी थेट हातावरच मळायची.

हाताला भाजलं तरी हात झटकून परत मळायला लागायचं. दाणं खाली पडलं की गोंड बाजूला करायचं अन् गरमागरम हुरडा आपल्या हातावर यायचा.

ते संपताच आजोबा दुसरी मुठ हातावर सोडायचे. हुरड्याच्या सोबतीला तोंडी लावायला शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, गुळ. अस्सल चवीच्या हुरड्या सह हे खाणं किती ताकद वाढवणारं आहे हे आजोबांकडून ऐकायचं.

त्यांच्या उमेदीच्या भूतकाळात ऐन पैलवानकीत ते शेरभर हुरडा कसे फस्त करायचे अन् ते पचवायला किती कष्ट उपसायला लागायचे हा किस्सा ऐकतच हुरड्याचे दाणे तोंडात टाकायचे...

नंद्या - मोत्या नावाची बैलजोडी होती आमच्याकडे. बरेच दिवस दोघं ही राबली शेतात. शेतात कुळव सुरु असताना कुळवावर बसण्यासाठी आजोबांकडे हट्ट करायचो. मग खांद्यावर चाबूक टाकून मोठ्या ऐटीत औतावर बसायचो. बैलानांही हाकायचो मी.

मज्जा यायची. काही वर्षा पुर्वी दिवाळीच्या सणातच मोत्याला साप चावला अन् तो गेला. एकट्या नंद्याला काही दिवसात विकुन टाकलं आजोबांनी अन् आमचा बैलबारदाना संपुष्टात आला. बाभळीच्या झाडाखाली लावलेली बैलगाडीच जू कायमचं जमिनीला टेकलं.

बैलांच्या खिळा सापत्या ही हरवून गेल्या. लागलीच दुष्काळ पडला परत बैलबारदाना उभारणं शक्य झालं नाही. भाड्यानं मशागत सुरु होती.

आमची द्राक्षेची शेती. द्राक्षेची फवारणी हे मोठं जोखमेचं काम. वडिलांना हे त्रासदायक ठरायला लागलं.

म्हणुन यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर हे ट्रॅक्टरचं पिल्लू घेतलंय. हे पिल्लू द्राक्षेच्या बागेतून फवारणी करत सहज पळतंय. सोबतीला इतर कामं ही होतील.

बार्शीला कॉलेजसाठी असताना दोन हजाराची ॲटलास सायकल माझ्या नावे घेतली होती. त्यानंतर ही दुसरीच वस्तु आपल्या नावावर आहे.

आता आपल्या पत्रकारितेच्या पगारावर याची फेड कशी होणार हा महत्त्वाचा भाग.

बाकी शेतकरी बाप कष्टाच्या जीवावर असे दहा ट्रॅक्टर शेतात उभे करेल अशी धमक त्यांच्याकडे आहे.

यंत्राने कष्टाला पर्याय दिला असला तरी दावणीला गुरं ढोरं, खिलार बैलं, वस्तीवर कारवानी एक दोन कुत्री असणं हेच शेती मातीचं प्रतिक आहे. शेवटी हे ट्रॅक्टरचं पिल्लू दावनीला आलं असलं तरी नंद्या-मोत्याची आठवण कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: केळीला उठाव कायम; कापूस दर नरमले, गव्हाला उठाव, गवारचे दर तेजीतच तर मका कणसाचे भाव टिकून

Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकांवर; विरोधकांचा जोरदार निषेध

Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात संततधार कायम; अनेक भागांत पूरस्थिती

Shirala Rain: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला

Kolhapur Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद 

SCROLL FOR NEXT