Seema Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Bullock Cart Race : तळेगाव- बैलगाडा शर्यतीत त्याचे नाव महिलांचा सहभाग हे मुख्य आकर्षण

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Women Participation of Bullock Cart Race : अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील तळेगाव हे सुमारे २० हजारांवर लोकसंख्या असलेले गाव बैलगाडा शर्यतीसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट. बैलजोड्या शर्यतीत भाग घेण्यासाठी तळेगावचे शेतकरी एका गावात गेले.

पण काही कारणांवरून आयोजकांनी तुमच्या गावच्या बैलांना पटात सहभागी करून घेणार नाही असे सुनावले. हे शब्द जिव्हारी लागलेल्या व निराश होऊन परतलेल्या शेतकऱ्यांनी गावातील (कै.) महादेव उपाख्य नानासाहेब देशमुख यांच्या कानावर ही गोष्ट घातली.

त्यातून अंगार फुलला. स्वाभिमान जागा झाला. त्यातून मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर आपल्याच गावात बैलगाडा शर्यती (शंकरपट) भरविण्यास सुरुवात झाली. पटाच्या मैदानावरील पुरातन महादेव मंदिरात पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला.

शर्यतीची परंपरा

सुरुवातीला पटात बैलजोडींसह अश्‍वही सामील व्हायचे. गावगाडा पद्धतीने पट खेळला जायचा. वीस मैल परिसरातील शेतकरी सहभागी व्हायचे. नंतरच्या काळात पटाचे महत्त्व मोठे होत गेले. सन १९३५ मध्ये नानासाहेब देशमुख यांचे निधन झाल्यावर शंकरपट आयोजनाची जबाबदारी (कै.) बापूसाहेब देशमुख यांनी स्वीकारली.

ते पुरोगामी विचाराचे प्रयोगशील शेतकरी होते. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी उभारलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे ते संस्थापक अध्यक्षही होते. कृषी क्षेत्रात नव तंत्रज्ञानाचा अवलंब होण्याच्या उद्देशाने स्वतंत्र भारताचे पहिले शिष्टमंडळ अमेरिका, हंगेरी येथे गेले होते. त्याचे नेतृत्व बापूसाहेबांनी केले होते. परदेश दौऱ्याहून परतल्यावर त्यांनी शंकरपटाचे स्वरूप पालटून टाकले.

सोबतच कृषी प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना उपयोगी साहित्याची उपलब्धता होऊन गर्दीही वाढली. बापूसाहेब सहकार व शिक्षण क्षेत्रात व्यस्त झाले. त्यांनी ही परंपरा टिकविण्याची जबाबदारी रावसाहेब देशमुख यांच्या खांद्यावर टाकली. शंकरपट म्हणजे पुरुषांची मक्‍तेदारी असलेला खेळ या जुनाट विचाराला फाटा देत देशाच्या इतिहासात प्रथमच महिला शंकरपटाची सुरुवात केली. त्यांच्यासाठी दोन दिवस यात्रेचे आयोजन करून त्यांना बैलगाडा शर्यतीत सहभागाचा मान रावसाहेबांनी मिळवून दिला. आजही परंपरा कायम आहे.

शर्यतीचे स्वरूप

कृषक सुधार मंडळातर्फे शर्यतीचे आयोजन होते. शेख भुरू, महम्मद इस्माईल, रामचंद्र बगाडे, दामाजी चुटे, लक्ष्मण रोहिले यांनी सुरुवातीच्या काळात त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर दादासाहेब बगाडे, अनंत बगाडे, मधूभाऊ बनसोड, नामदेव अंबासा गुजर यांची साथ मिळाली. आज ही सूत्रे शिवाजी बापूसाहेब देशमुख सांभाळतात.

आधुनिकतेचे स्वरूप देताना शर्यतीची वेळ अचूक मोजण्यासाठी डिजिटल घड्याळ व स्पर्धेवर लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर होतो. शर्यत, कृषी व बैल सजावट साहित्य व्यवहारातून कोट्यवधीची उलाढाल होते.

शर्यतीसाठी १५० मीटर अशी विदर्भातील सर्वांत मोठी धावपट्टी आहे. दो दाणी (जोडीपैकी सर्वांत आधी विजयी रेषेला स्पर्श करणारा बैल), एक दाणी (जोडीतील एकल विजेता) व महिला आरक्षित बैलगाडा अशी पद्धत असते. ५१ हजार रुपयांचा पुरस्कार असतो. आसरा ग्रुप, धामनगाव रेल्वे यांच्या वतीने प्रायोजकत्व दिले जाते. शासनाच्या नियमांनुसारच शर्यतीचे पालन होते.

दुग्धोत्पादनाला चालना

गावात आज पटासाठी म्हणून ४५ ते ५० जातिवंत बैलजोड्या आहेत. दूध, लोणी, बदाम आदी पौष्टिक आहार त्यांना देण्यात येतो. जोडीला दुग्धोत्पादनावरही भर देण्यात आला आहे. गीर, गवळाऊ अशा जाती आहेत. गावातील दूध संकलन १८०० ते २००० लिटरवर पोहोचले आहे. तीन संकलन केंद्रे सुरू झाली. त्यातून रोजगार निर्मिती झाली आहे.

शर्यतीचे शौकीन राठोड

मध्य प्रदेशातील बैतुलचे शेतकरी रामप्रसाद राठोड ७२ वर्षे वयाचे आहेत. ते तळेगावातील बैलगाडा शर्यतीत दरवर्षी बैलजोडी घेऊन सहभागी होतात. सन १९८२ च्या सुमारास त्यांना शर्यतीचा छंद लागला. तेव्हापासून शर्यतीत जिंकणाऱ्या बैलांची खरेदी ते करू लागले. ते सांगतात, की बैलांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत.

पाच ते सहा लाख रुपयांना बोली लागते. माझ्याकडे शर्यतीसाठी म्हैसूर खिलारी जातीचे सहा बैल (तीन जोड्या) आहेत. त्यांना महिन्याला बदाम, गाईचे किंवा शेळीचे दूध, पिठाचा उंडा असा खुराक दिला जातो. त्यावर मोठा खर्च केला जातो. सहा कामगार तैनात करावे लागतात. शर्यतीच्या ठिकाणापर्यंत बैलांच्या वाहतुकीसाठी ट्रक घेतला आहे.

पहिल्या महिला धुरकरी

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगापूर (ता. खामगाव) येथील सीमा पाटील राज्यातील पहिल्या महिला धुरकरी (शर्यतगाडाचालक) असाव्यात. तळेगावच्या बैलगाडा शर्यतीत त्या आवर्जून सहभागी होतात. त्या सांगतात, की १९९३ मध्ये पहिल्यांदा पटात सहभागी झाले. त्या वेळी लोकांचे टोमणे सहन करावे लागले. हा खेळ मर्दानी आहे. महिलांनी सहभागी होऊ नये असे म्हटले जायचे.

त्या वेळी ४.३५ सेकंदांत पट सर करून विजयी झाले. मग उत्साह वाढला. आता दरवर्षी ३०० ते ४०० पटांत सहभागी होते. या शर्यतीत शरीराचा व्यवस्थित समतोल राखावा लागतो. अंगी कौशल्य विकसित करावे लागते. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेववे लागते. स्फूर्ती असावी लागते. मला जिंकायचेच आहे याच जोशाने मैदानात उतरावे लागते.

संपर्क : सीमा पाटील, ९७६३०८६३५५

माझ्याकडे २८ दुधाळ जनावरे आहेत. २१ एकर शेती आहे. पटाचे तीन गावरान बैल आहेत. नुकताच गावरान बैल साडेचार लाख रुपयांत खरेदी केला असून, त्याचे ॲपल नाव ठेवले आहे. पटात खेळणे हा छंदच मला जडला आहे. हौसेला मोल नसते अशी माझी धारणा आहे.
नीलेश मुटकरे, ९७३०४३२७५४
बैलगाडा शर्यतीत महिलांना सहभागी करून घेणारे तळेगाव हे एकमेव गाव आहे. सुरुवातीला जोखीम म्हणून यात कमी महिला-मुली सहभागी व्हायच्या. आता संख्या वाढली आहे. यंदा गावातील सात, तसेच राज्याच्या अन्य भागांतूनही महिला सहभागी झाल्या.
आशा ठाकरे, ७४९८१४२१७७

आनंद देशमुख, ९८३४६४१२३३ (सदस्य, कृषक सुधार मंडळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT