Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Competition 2024: राज्यस्तरीय पीकस्पर्धेत सुरेखा शेणवी, गोपाळ पाचकवडे, सोपान करांडे प्रथम

Agriculture Department Competition: कृषी विभागाने २०२४ मधील खरीप हंगामात घेतलेल्या राज्यस्तरीय पीकस्पर्धेत सर्वसाधारण गटात कोल्हापूरच्या शेतकरी श्रीमती सुरेखा शेणवी यांनी भात, तर तूर उत्पादनात पुण्याचे गोपाळ पाचकवडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

मनोज कापडे

Pune News: कृषी विभागाने २०२४ मधील खरीप हंगामात घेतलेल्या राज्यस्तरीय पीकस्पर्धेत सर्वसाधारण गटात कोल्हापूरच्या शेतकरी श्रीमती सुरेखा शेणवी यांनी भात, तर तूर उत्पादनात पुण्याचे गोपाळ पाचकवडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सर्वसाधारण गटात मक्यात पुण्याचे सोपान करांडे, तर सोयाबीन उत्पादनात कोल्हापूरचे सर्जेराव पाटील राज्यात अव्वल ठरले आहेत.

राज्यस्तरीय समितीकडून छाननी

राज्यस्तरीय पीकस्पर्धेत प्रथम बक्षीस ५० हजार रुपयांचे, दुसरे ४० हजारांचे तर तिसरे ३० हजार रुपयांचे आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालील निकाल समितीने पीकस्पर्धेतील प्रस्तावांची अंतिम छाननी केली. त्यानंतर विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी यांनी राज्यस्तरीय विजेत्यांची नावे जाहीर केली. भात, खरीप ज्वारी, खरीप बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशा ११ पिकांमधील उत्पादनासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती.

त्यासाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात आला. राज्यातील सर्व तालुक्यांमधील उत्पादकतेची तुलना करीत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना त्यांच्या विक्रमी पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन दिले जात असते. त्यांच्या कष्टाचा गौरव झाल्याने इच्छाशक्ती आणखी वाढते. आणि ते उमेदीने नवतंत्राचा वापर करीत प्रयोगशील शेतीला आणखी पुढे नेतात, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

जिल्हा, तालुक्याचे निकाल लवकरच

स्‍पर्धक शेतकऱ्यांची उत्पादकता तालुक्यामधील पिकांच्‍या सरासरी उत्पादकतेच्या (त्‍या पिकाची मागील पाच वर्षांची सरासरी उत्‍पादकता) दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक असावी, अशी मुख्य अट होती. केवळ या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. राज्यस्तरीय निकालात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विजेत्या शेतकऱ्यांना वगळून जिल्हास्तरीय पीकस्पर्धेचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

जिल्हास्तरीय निकाल समित्या आता त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून जिल्हास्तरावरील पीकनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गटाकरिता प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित करणार आहेत. तालुक्याचे विजेते निवडण्यासाठी पुन्हा राज्य आणि जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते वगळून तालुकास्तरीय पीकस्पर्धांमधील विजेते निवडले जातील. त्यामुळे संबंधित समित्यांकडून जिल्हा व तालुका स्तरावरील निकाल लवकरच जाहीर होतील, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले.

भात गटात शेणवी, जरग, आढाव विजेते

भात सर्वसाधारण गटात कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील सोनारवाडीच्या शेतकरी महिला सुरेखा गणपती शेणवी यांनी हेक्टरी १४४.९२ क्विंटल उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळवला. याच तालुक्यातील म्हसवे येथील शेतकरी कृष्णात महादेव जरग यांनी १०४.३४ क्विंटल उत्पादन घेत दुसरा क्रमांक मिळवला. तिसरा क्रमांक गगनबावड्यातील वेतवडे गावचे शेतकरी आनंदा दादू आढाव (७६.४० क्विंटल) यांनी मिळवला. भाताच्या आदिवासी गटात प्रथम क्रमांक सुरेश सखाराम विणरक (९५.६६ क्विंटल, मु.पो.दिग्गद, ता.आंबेगाव, जि. पुणे) यांनी मिळवला. दुसरा क्रमांक सुदाम हरिभाऊ सरोगदे (८३.२४ क्विंटल, मु.पो.खंडकुंब्रे, ता.जुन्नर,जि.पुणे) तर तिसरा क्रमांक तुंगा काळू चौरे (७८.४८ क्विंटल, मु.पो.करोबानगर, ता.सटाणा,जि.नाशिक) यांनी मिळवला.

शिंदे, मुळगावकर, चौधरींची ज्वारीत आघाडी

खरीप ज्वारीच्या सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक मिळवणारे वसंत भास्कर शिंदे नाशिकच्या जळगावच्या रावेर गावातील वाघोदा खुर्दचे शेतकरी आहेत. त्यांनी ३५.४४ क्विंटल उत्पादन घेतले आहे. ज्वारीत दुसरा क्रमांक विठ्ठल बाबूराव मुळगावकर (२८.३७ क्विंटल, मु. पो. शिंदेवाडी विंग, ता. कराड, जि.सातारा) यांनी तर तिसरा क्रमांक जगन भबुता चौधरी (१९.३८ क्विंटल, मु.पो.चौपाळे, ता.जि. नंदुरबार) यांनी मिळवला. ज्वारीच्या आदिवासी गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे कागड्या राण्या नाईक नंदुरबारच्या तळोदामधील कोठार गावचे शेतकरी आहेत. त्यांनी ३२.८८ क्विंटल उत्पादन घेतले आहे. ज्वारीत पिकात दुसरा क्रमांक श्रीमती मुरीबाई रूपसिंग मोरे (३१.६३ क्विंटल, मु. पो. खर्डी खुर्द, ता.तळोदा, जि.नंदुरबार) यांनी, तर तिसरा क्रमांक रमेश सोमद्या तडवी (२३.३३ क्विंटल, मु. पो. शोभानगर, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांनी मिळवला आहे.

बाजरी गटात चोपडे, तांबवे, मुळीक यांची बाजी

खरीप बाजरीच्या सर्वसाधारण गटात हेक्टरी ७७.१० क्विंटल उत्पादन घेत साताऱ्याच्या खंडाळा भागातील पाडळीचे शेतकरी शिवाजी बाळू चोपडे यांनी पहिला क्रमांक पटकवला. दुसरा क्रमांक जगन्नाथ अप्पा तांबवे (७२.०२ क्विंटल, मु. पो. लोणंद, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी, तर तिसरा क्रमांक तुकाराम बजाबा मुळीक (७१.३३ क्विंटल, मु. पो. सासकल, ता. फलटण, जि. सातारा) यांनी मिळवला आहे. खरीप बाजरीच्या आदिवासी गटातील पहिला क्रमांक २३.२४ क्विंटल उत्पादन घेत सोमनाथ गणपत माळी (मांची, ता. संगमनेर, जि.अहिल्यानगर) यांनी प्राप्त केला. दुसरा क्रमांक निर्मलाबाई सरदार पावरा (२० क्विंटल, मु.पो.भोईटी, ता.शिरपूर, जि. धुळे) यांनी तर तिसरा क्रमांक जगदीश महाऱ्या पावरा (१९.५० क्विंटल, मु. पो. हाडाखेड, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी मिळवला आहे.

नाचणीत सुरेश चांदेकर प्रथम

नाचणी सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे शेतकरी सुरेश बाबू चांदेकर कोल्हापूरच्या चंदगड भागातील कुर्तनवाडीचे आहेत. त्यांनी ७९.१८ क्विंटल उत्पादन घेतले आहे. नाचणीत दुसरा क्रमांक रावजी बाबू गोरल (६४.२४ क्विंटल, मु.पो.करंजगाल, ता.चंदगड, जि.कोल्हापूर) यांनी, तर तिसरा क्रमांक आनंदा अप्पाजी डवर (५८.२७ क्विंटल, मु.पो.तारळे खुर्द, ता.चंदगड, जि.कोल्हापूर) यांनी मिळवला आहे.

नाचणी आदिवासी गटात रायगडचे कळंब गाव चमकले आहे. या गावातील शेतकरी प्रकाश काळूराम निरगुडा (२५.७६ क्विंटल, मु.पो.कळंब, ता.कर्जत, जि.रायगड) यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. दुसरा क्रमांक मनु धाऊ सराई (२५.३२ क्विंटल, मु.पो.कळंब, ता.कर्जत, जि.रायगड) यांनी, तर तिसरा क्रमांक गणपत जैतू निरगुडा (२३.५७ क्विंटल, मु.पो.कळंब, ता.कर्जत, जि.रायगड) यांनी मिळवला आहे.

मका उत्पादनात सोलापूरची आघाडी

मका सर्वसाधारण गटात हेक्टरी २१३.२५ क्विंटल उत्पादन घेत सोलापूरच्या सांगोल्यातील डिकसळ गावचे शेतकरी सोपान कृष्णा करांडे यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसरा क्रमांक सूरज वसंतराव पवार (१८६.७५ क्विंटल, मु.पो.वेळवी, ता.जत, जि.सांगली) यांनी, तर तिसरा क्रमांक गायत्रीदेवी तात्यासाहेब शिंदे (१८४.७९ क्विंटल, मु.पो.अकोला, ता.सांगोला, जि.सोलापूर) यांनी मिळवला आहे. मका आदिवासी गटातील पहिला क्रमांक ८६.८५ क्विंटल उत्पादन घेत कौतिक सोनू चौरे (मु. पो.जयपूर, ता.कळवण, जि.नाशिक) यांनी प्राप्त केला. दुसरा क्रमांक राजाराम भगवाल गातवे (६७.१० क्विंटल, मु.पो.दोघेश्वर, ता.सटाणा, जि.नाशिक) यांनी तर तिसरा क्रमांक शांताबाई हर्षवर्धन घोडे (६५.२० क्विंटल, मु.पो.देवळाणे, ता.सटाणा, जि.नाशिक) यांनी प्राप्त केला आहे.

तुरीमध्ये सोलापूरचे पाचकवडे प्रथम

तुरीच्या सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे शेतकरी गोपाळ गहिनीनाथ पाचकवडे हे सोलापूरच्या बार्शी भागातील खांडवीचे आहेत. त्यांनी ६१.३१ क्विंटल उत्पादन घेतले आहे. दुसरा क्रमांक अशोक कोंडिबा गांगर्डे (६०.४३ क्विंटल, मु. पो. नीमगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर) यांनी तर तिसरा क्रमांक कुर्मदास नरहरी सुपेकर (५६.५८ क्विंटल, मु.पो.कुळधरण, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर) यांनी मिळवला आहे.

तुरीच्या आदिवासी गटात अमरावतीच्या वरुड भागातील सुरळी गावाचे शेतकरी अमित संपत कुकडे (२६.५० क्विंटल) यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. दुसरा क्रमांक गौतम दौलत गेडाम (२२.१२ क्विंटल, मु.पो.आमनेर, ता.वरुड, जि.अमरावती) यांनी मिळवला आहे.

मुगात ढवळे, कोरडे, ढगे आघाडीवर

मुगाच्या सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक मिळवणारे शेतकरी औदुंबर दत्तात्रेय ढवळे हे धाराशिवच्या वाशी भागातील सटवाईवाडीचे आहेत. त्यांनी ३२.१२ क्विंटल उत्पादन घेतले आहे. दुसरा क्रमांक सचिन गोविंद कोरडे (२७.७६ क्विंटल, मु.पो.वाशी, ता.वाशी, जि.धाराशिव) यांनी तर तिसरा क्रमांक रत्नाकर गंगाधर ढगे (२६.२० क्विंटल, मु.पो.सायाळ, ता.लोहा, जि.नांदेड) यांनी मिळवला आहे.

उडदात दक्षिण सोलापूरकरची आघाडी

उडीद सर्वसाधारण गटात हेक्टरी ६३.६४ क्विंटल उत्पादन घेत दक्षिण सोलापूरच्या शंगिडगावचे शेतकरी चंद्रकांत आवाण्णा कोरे यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसरा क्रमांक शरणप्पा शविप्पा भीमनवरू (५९.०५ क्विंटल, मु.पो.शंगिडगाव, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर) यांनी, तर तिसरा क्रमांक श्रीशैल आप्पाराव पुजारी (४०.४१ क्विंटल, मु.पो.वोळकवठे, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर) यांनी मिळवला आहे. उडीद आदिवासी गटातील पहिला क्रमांक ९.७८ क्विंटल उत्पादन घेत रमेश लक्ष्मण पवार (मु.पो.वेरुळे, ता.कळवण, जि.नाशिक) यांनी प्राप्त केला. दुसरा क्रमांक सकुबाई धीरजी गावित (७.८० क्विंटल, मु.पो.बोरपाडा, ता.नवापूर, जि.नंदुरबार) यांना मिळाला आहे.

पाटील यांनी घेतले सोयाबीनचे विक्रमी उत्पादन

सोयाबीन सर्वसाधारण गटात हेक्टरी ७४.५७ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेत सांगलीच्या वाळवा भागातील नेर्ले गावचे शेतकरी सर्जेराव गुंडा पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसरा क्रमांक गणेश हंबीरराव साळुंखे (७३.५० क्विंटल, मु.पो.नागठाणे, ता.सातारा, जि.सातारा) यांनी तर तिसरा क्रमांक परमेश्वर रामजी चव्हाण (७३.४०क्विंटल, मु.पो.दहेली, ता.किनवट, जि.नांदेड) यांनी मिळवला आहे. सोयाबीन आदिवासी गटातील पहिला क्रमांक ४५.२५ क्विंटल उत्पादन घेत सुभाष विश्वनाथ यलसटवाड (मु.पो.पाटनूर, ता.अर्धपूर, जि.नांदेड) यांनी प्राप्त केला. दुसरा क्रमांक कोंडाबाराव प्रभू भरकाडे (३८ क्विंटल, मु.पो.खैरखेडा, ता.पुसद, जि.यवतमाळ) यांना व तिसरा क्रमांक दिगंबर गंगाराम जगताप (३७.३२ क्विंटल, मु.पो.धानोरा बुद्रुक, ता.उमरी, जि.नांदेड) मिळाला आहे.

भुईमुगात खोत, शेनोळकर, पाटील चमकले

भुईमुगात सर्वसाधारण गटात हेक्टरी ६२.०१ क्विंटल उत्पादन घेत सांगलीच्या कवठे महांकाळ भागातील लोणारवाडीचे शेतकरी नवनाथ दत्तू खोत यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसरा क्रमांक संतू रामू शेनोळकर (५९.६७ क्विंटल, मु.पो.करेकुंडी, ता.चंदगड, जि.कोल्हापूर) यांनी तर तिसरा क्रमांक भैरवनाथ धोंडिराम पाटील (५७.५१ क्विंटल, मु.पो.चंद्रे, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर) यांनी मिळवला आहे.

सूर्यफुलात सांगोला राहिला आघाडीवर

सूर्यफुलाच्या सर्वसाधारण गटात हेक्टरी ३३.७० क्विंटल उत्पादन घेत सोलापूरच्या सांगोला भागातील शेतकरी गंगाराम वगरे यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसरा क्रमांक सीताराम शंकर राऊत (३०.१० क्विंटल, मु.पो.सावे, ता.सांगोला, जि.सोलापूर) यांनी तर तिसरा क्रमांक मिलिंद बळवंत कुलकर्णी (२९.९३ क्विंटल, मु.पो.डिकसळ, ता.सांगोला, जि.सोलापूर) यांनी मिळवला आहे.

राज्यस्तरीय पीकस्पर्धेत उत्पादकता मुख्य समजली जाते. सर्वाधिक उत्पादकता गाठलेल्या शेतकऱ्यांचा यानिमित्ताने गौरव होतो व त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते.
रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT