Ethanol Project Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Projects : साखरेसह इथेनॉल प्रकल्पांना मिळणार बळ

Team Agrowon

Kolhapur News : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील सर्व बंधने काढून टाकल्याने साखरेबरोबर इथेनॉल प्रकल्पांनाही बळ मिळणार आहे. कारखान्यांच्या महसुलात वाढ होणार असल्याने याचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांची देणी वेळेत मिळण्यावर ही होणार आहे.

गेल्या वर्षीची चूक सुधारत कारखान्यांना आणि डिस्टलरींना उसाचा रस, बी आणि सी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाने पुढील हंगामाचा मार्ग सुखकर झाला आहे. याचबरोबर २३ लाख टन तांदळाबरोबर सर्वच कच्च्या मालापासून इथेनॉल निर्मिती करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे इथेनॉल निर्मितीलाही बळ मिळणार आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने गुरुवारी (ता. २९) एक आदेश काढून ही परवानगी दिली. या नंतर साखर व इथेनॉल उद्योगात उत्साह पसरला आहे.

गेल्या काही महिन्यापासून केंद्राने इथेनॉल निर्मितीवर घातलेले बंधन पूर्णपणे हटवावे, अशी मागणी सातत्याने साखर उद्योगातून होत होती. यासाठी साखर उद्योगातील संस्थाकडून साखर टंचाई नसल्याचेही वारंवार स्पष्ट करण्यात आले होते. गेल्यावर्षी साखर उत्पादनात घट होईल या भीतीपोटी इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंधने इथेनॉल निमिर्ती कमी करण्यास कारणीभूत ठरली होती.

गेल्याच महिन्यात साखर उद्योगाने यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी जेवढी शिल्लक साखर गरजेचे आहे त्याच्यापेक्षा जादा साखर शिल्लक असल्याचे सांगत केंद्राला साखरेच्या उपलब्धतेविषयी निश्चिंत केले होते. या सर्वांचा विचार करून केंद्राने दिलासादायक निर्णय घेतल्याने साखर उद्योगातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. आता निर्बंध हटल्याने इथेनॉल निर्मितीला गती येण्याची शक्यता आहे.

१५ कोटी ऊस उत्पादकांना फायदा

या निर्णयाने देशातील १५ कोटी ऊस उत्पादकांना फायदा होणार आहे. आता साखरेबरोबरच पूर्ण क्षमतेने इथेनॉल निर्मिती होणार असल्याने साखर कारखान्यांची व इथेनॉल प्रकल्पांची सांपत्तिक स्थिती सुधारेल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांची देणी वेळेत मिळू शकतील, असे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

कारखान्यांना २४ हजार ७१९ कोटींचा महसूल शक्य

या निर्णयानुसार सर्वच घटकापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे. या हंगामात ४० लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात येऊ शकते. या पैकी २८ लाख टन साखर बी हेवी मोलॅसिसच्या माध्यमातून तर १२ लाख टन साखर उसाच्या रसापासून वळविण्यात येऊ शकते. बी हेवी पासून इथेनॉलचे उत्पादन ३२९ कोटी तर रसापासून ७१ कोटी लिटर इथेनॉल तयार होऊ शकते. सध्याच्या दरानुसार यातून अपेक्षित महसूल २४ हजार ७१९ कोटींचा मिळू शकेल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचा आहे.

इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला बळकटी येणार

जुलैअखेर देशभरात १५९० कोटी लिटर्सची उत्पादन क्षमता तयार झाली आहे. तेल कंपन्यांकडून फक्त ५०५ कोटी लिटर्स इथेनॉलची खरेदी २०२३-२४ मध्ये झाली आहे. ज्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे प्रमाण १३.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. हे प्रमाण २०२५-२६ अखेर २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे केंद्र शासनाचे ध्येय आहे. त्या दृष्टीने झालेला निर्णय इथेनॉल उत्पादन वाढीसाठी आणि त्या प्रमाणात साखरेचा वापर वळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उद्योगात सहकारी आणि खासगी तत्त्वावर पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उसाचा रस, साखरेचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे खरेदी दर गेल्या दहा महिन्यांपासून जाहीर झालेले नाहीत. ते तातडीने जाहीर होणे गरजेचे आहे. जेणेकरून साखर कारखान्यांना त्यांचा उत्पादन कार्यक्रम निश्चित करता येणार आहे. किमान साखर विक्रीदराचा बऱ्याच दिवसांपासून अपेक्षित आहे. त्याचा देखील समाधानकारक निर्णय होण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ प्रयत्नशील आहे.
प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
हा निर्णय इथेनॉल प्रकल्पांना नवसंजीवनी आणू शकेल. भविष्यात ही अशा निर्णयाबाबत पाठपुरावा सुरू राहील.
दीपक बल्लाणी, महासंचालक ‘इस्मा’
यंदाच्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय दिलासादायक आहे. यातून साखर कारखाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल.
पी. जी. मेढे, साखर उद्येाग अभ्यासक
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने २४ जूनला केंद्रीय गृह व सहकार मंत्री तसेच या विषयाच्या मंत्री गटाचे प्रमुख अमित शहा यांना या बाबत पत्र लिहून विनंती केली होती. तद्‌नंतर आम्ही श्री. शहा तसेच पेट्रोलियम विभागाचे मंत्री हरदीपसिंग पुरी आणि अन्न विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या स्तरावर महासंघातर्फे सातत्याने पाठपुरावा केला होता. या निर्णयाचे स्वागत आहे.
हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT