Sukdara Villagers  Agrowon
ॲग्रो विशेष

Village Rehabilitation : सुकदरा गाव नकाशावरून पुसले

मनोज कापडे

Pune News : माळीण, तळीयेसारखी भूस्खलनाची दुर्घटना घडू नये म्हणून जावळी खोऱ्यातील सुकदरा गावातील शेतकऱ्यांना सरकारने दबाव आणून मायभूमी सोडण्यास भाग पाडले खरे; परंतु, पुनर्वसन न करता वाऱ्यावर सोडलेल्या या शेतकऱ्यांना अखेर नदीकाठी झोपड्या बांधून बेवारश्यासारखे जगावे लागत आहे.

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर ३० जुलै २०१४ रोजी डोंगरकडा कोसळला होता. त्यात १५१ गावकरी मृत्युमुखी पडले. त्यानंतर रायगडच्या महाड भागातील २२ जुलै २०२१ रोजी तळीये कोंढळकरवाडीवर दरड कोसळून ८७ गावकरी मृत्यूमुखी पडले. महाडमधील महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, तळीये दुर्घटनेनंतर सुकदरा गाव कायमचे हलविण्यासाठी प्रशासनावर दबाव आला.

या गावातील २२ शेतकरी कुटुंबांना हलविले गेले. यातील एकाही कुटुंबाचे पुनर्वसन होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, दोष स्थानिक प्रशासनाचा नाही. याबाबत शासनस्तरावरून निर्णय अपेक्षित आहे.

जावळी खोऱ्यातील लांबलचक शिवथर पर्वतरांगेत उंचावर वसलेल्या सुकदरा गावात जमिनीला मोठी भेग पडली होती. तसेच, गावाच्या उत्तर दिशेला असलेल्या पर्वतरांगेतून दरडी पडण्याचाही धोका होता. त्यामुळे सुकदरा अतिदरडप्रवण भागात होता. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना कायमचे हटविणे अपरिहार्य होते.

डोळ्यात पाणी आणत शेतकरी गंगाराम कचरे म्हणाले, ‘‘वडिलोपार्जित गाव आणि शेती कायमची हिसकावली जाणे खूप यातनादायक आहे. आमचे गाव शिवकालीन होते. तळीये दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणा आमच्या मागे लागली होती.

गाव सोडण्यासाठी सतत निरोप येत होते. ‘दरडीखाली मरण्यापेक्षा डोंगरातील गाव सोडा. पठारी भागात आल्यास तुम्हाला जमीन, घरे मिळतील,’ असे आम्हाला सरकारी अधिकारी सांगत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवत आम्ही मायभूमी सोडली. परंतु, नंतर आम्हाला वाऱ्यावर सोडले गेले. आता सर्व अधिकारी गायब झाले आहेत.

सुकदरा गाव आता जगाच्या नकाशावरून पुसले गेले आहे. तीन वर्षानंतरदेखील या शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. आता सारे शेतकरी महाड भागातील काळ नदीच्या उत्तर बाजूला झोपड्यांमध्ये राहात आहेत. सरकारने या गावाचे पुनर्वसन का केले नाही, याबद्दल निश्चित माहिती कोणाकडेही उपलब्ध नाही. या बेघर, भूमिहिन शेतकऱ्यांना आंबेशिवथर गावाने आसरा दिला आहे.

‘सर्वांनी वाऱ्यावर सोडले’

भूमिपुत्र रमेश कचरे म्हणाले, ‘‘जगण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची मुले आता मजूर झालो आहोत. काही जण कोकणात शहराकडे कामाला लागले आहेत. चाळिशी ओलांडलेले शेतकरी कुठे जाऊ शकत नाहीत. ते दऱ्याखोऱ्यात मोलमजुरी करीत आहेत. आमचे पुनर्वसन व्हावे म्हणून आम्ही सरकार दरबारी खूप हेलपाटे मारले. परंतु, आम्हाला सर्वांनी वाऱ्यावर सोडले आहे.’’

पाड्याला दिले सावित्रीचे नाव

सुकदरा गाव कायमचे सोडल्यानंतर काळ नदीकाठी झोपड्यांत राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांनी या जागेचे नामकरण सावित्रीवाडी असे केले आहे. महाबळेश्वर भागातून कोकणाकडे वाहणाऱ्या सावित्री नदीची काळ ही उपनदी आहे. सावित्रीला या भागातील शेतकरी तारणहार समजतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT