Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्व काही पक्षासाठी असे सांगत भाजपच्या नेत्यांनी दोन स्वतंत्र पॅनेल उभे केले आहेत. कार्यकर्त्यांवरील प्रेम आणि पक्षनिष्ठेपोटी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे नेतेमंडळी सांगत आहेत. पण पॅनेलमधील उमेदवार पाहता ‘काँग्रेस के बिना भाजप अधुरा’ हेच चित्र पाहायला मिळत आहे.
एकेकाळी सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस तळागाळात रुजली. शहर व ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून पक्षाचा पाया मजबूत केला. त्यातून स्थानिक स्वराज संस्थांसह राज्य व केंद्रात सत्ता कायम टिकविली. परंतु, काँग्रेसची ५० वर्षांची सत्ता उलथून दहा वर्षे राज्यात व देशात भाजपचे कमळ फुलले. त्यामुळे काँग्रेसची देशात आणि राज्यात वाताहत झाली, हे खरेच.
पण स्थानिक स्तरावर सहकार क्षेत्रावर आजही काँग्रेसची पकड मजबूत असल्याचे बाजार समिती निवडणुकीत प्रखरतेने दिसून येत आहे. बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे नेते भाजपच्या तीनही आमदारांना जड जाणार असल्याने आमदार विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसमधील नेत्यांचे अंतर्गत कलह मिटवून
सर्वांना एकत्रित आणत काँग्रेस नेत्यांना भाजपमय करण्यासाठी पॅनेल तयार केले. तर सुभाष देशमुख यांनी पक्षासोबत पुत्रासाठी विंचूरचे बाळासाहेब पाटील, बोरामणीचे धनेश अचलारे, अकोले मंद्रूपचे रमेश आसबे या तीन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पॅनेलमध्ये उमेदवारी दिली. भाजप नेत्यांची सत्ताकारणासाठी सुरू असलेली जुळवाजुळव काँग्रेसशिवाय भाजप अधुरी याचा प्रत्यय येत आहे.
काँग्रेसचे नेते शोधताहेत भाजप प्रवेशाची संधी...
लोकसभा निवडणुकीत प्राणिती शिंदे यांनी जिल्ह्यातील जुन्या-नव्या सर्वच नेत्यांना ॲक्टिव्ह केले. विधानसभेचे स्वप्न दाखवीत त्या खासदार झाल्या. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. भविष्यात डोईजड होऊ शकतील अशा सर्वच नेत्यांचे राजकारण काँग्रेसच्याच नेत्यांनी संपविले.
त्यामुळे काँग्रेसच्या मदतीने मोठ्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार निवडून आले. या पार्श्वभूमीवर संतापलेले काँग्रेसचे नेते भाजप प्रवेशाची संधी शोधत आहेत. परंतु, भाजपमधील नेत्यांना डोईजड होऊ नये, याची हुशारी जाणून असलेले जुने नेते पोटतिडकीने पक्षनिष्ठेचा राग आळवत आहेत.
नेत्यांची करणी आणि कथनी अशी..
निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या. स्वहितासाठी सजग सर्वपक्षीय नेत्यांत एकमत झाले नाही.
काँग्रेससोबत युती करून सहा वर्षे सभापतीपद भोगलेले आमदार विजयकुमार देशमुख यांनी माघार घेतली. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्षाला संधी म्हणून कल्याणशेट्टी पुढे आले.
बाजार समिती निवडणुकीतून वारसाचे भविष्य आजमावणारे सुभाष देशमुख एकाकी पडले. पण ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ असे मानत विजयकुमार देशमुख यांची साथ मिळाली.
काँग्रेसच्या नेत्यांना वैतागलेल्यांना आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून मतदारांना एक तगडा पर्याय देण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे, हे मान्यच करावे लागेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.