Sesame Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Sesame Rate : विदर्भात तिळाचे दर पोहोचले १२ हजारांवर

Team Agrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर ः तिळाचा हंगाम संपला असताना दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केलेल्या तिळाची बाजारात आवक होत आहे. अमरावती बाजारात ही आवक जेमतेम २३ क्‍विंटलपर्यंत असून तिळाला सध्या ११००० ते १२००० रुपयांचा दर मिळत आहे.

नागपूरच्या कळमना बाजार समितीत तिळासह भुईमूग या तेलबियावर्गीय शेतीमालाची आवक होत होती. पंधरवड्यानंतर आता मात्र आवक ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांकडे तीळ आणि भुईमूग नसेल किंवा दरवाढीची अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून कळमना बाजारात हा शेतीमाल पाठविला जात नसेल, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली. अमरावती बाजारात मात्र २० ते २३ क्‍विंटल इतक्या प्रमाणात तिळाची आवक नियमित होत आहे. हंगाम संपल्यानंतर होणारी ही आवक असून याला ११००० ते १२००० रुपयांचा दर मिळत आहे. यापूर्वी आवक चांगली असल्याने दर काहीसे दबावात होते. ११८०० पर्यंत अमरावती बाजारात तिळाचे व्यवहार झाले.

यवतमाळ जिल्हा हा तीळ लागवड आणि उत्पादनाचे हब मानला जातो. विदर्भात सर्वाधिक तिळाची लागवड यवतमाळ जिल्ह्यात होते. पूर्वी या भागातील शेतकऱ्यांची भुईमुगाला पसंती होती. मात्र या पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांनी तिळावर भर दिला. दारव्हा तालुक्‍यात तिळाची लागवड करणारे शेतकरी सर्वाधिक आहेत. लागवड क्षेत्र वाढल्याने बाजारात आवकही वाढती राहते, असा अनुभव आहे. नागपूर भागातील खरेदीदारदेखील यवतमाळ बाजारात येतात, असे सांगितले जाते. सध्या या बाजारात तिळाला ११००० ते ११७०० रुपयांचा दर मिळत आहे. ११५०० रुपयांनी देखील या बाजारात व्यवहार झाले. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी १२००० रुपयांचा दरदेखील तिळाला मिळाला. यापुढील काळात तिळाचे दर १२००० रुपयांवर स्थिर राहतील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. मात्र त्याकरिता आवक नियंत्रित असण्याची गरज आहे, असेही सांगण्यात आले. कारंजा (जि. वाशीम) येथील बाजारात ही तीळ आवक होत असून ती अमरावतीच्या तुलनेत अधिक आहे. ५० क्‍विंटल इतकी रोजची तिळाची आवक या ठिकाणी होत आहे. ११३०० ते ११९२५ असा दर तिळाला येथे मिळत असून या ठिकाणी देखील दर लवकरच १२ हजारांवर जातील, अशी शक्‍यता आहे.

विदर्भातील कारंजा (वाशीम) बाजारात भुईमूग शेंगाही येत असून याची आवक ८०० क्‍विंटलवर आहे. ५२१० ते ५९०० असा दर शेंगांना मिळत आहे. सिंचन सुविधांत वाढीच्या परिणामी या भागात उन्हाळी भुईमुगाची लागवड वाढली आहे. त्यामुळे हंगामात भुईमूग शेंगांची आवक बाजारात वाढती राहते, असे बाजार सूत्रांनी सांगितले.

सोयाबीन ४२०० रुपयांवर स्थिर
कापसानंतर विदर्भात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन लागवड होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या सोयाबीनचे व्यवहार ४०९० ते ४२७० रुपयांनी होत आहेत. सोयाबीनला पाच हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळेल, अशी अपेक्षा उत्पादकांना होती. मात्र खाद्यतेल तसेच सोया पेंडची आयात या कारणामुळे सोयाबीनचे दर गडगडले आहेत. यापुढील काळात त्यात वाढीची कोणतीच शक्‍यता नसल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT